
दुग्धव्यवसाय (dairy business) करीत असताना दुधाला चांगला भाव मिळण्यासाठी दुधाची गुणवत्ता (milk quality) चांगली असणे गरजेची असते. दुधाला मिळणारा दर हा दुधातील फॅट (fat) म्हणजे स्निग्धांश आणि एस .एन. एफ (SNF) वर ठरवला जातो. दुधातील या घटकांचे प्रमाण जास्त असल्यास दुधाला चांगला दर मिळतो. अनेक वेळेस दुधातील या घटकांचे प्रमाण कमी असल्यास पशुपालकांना चांगला भाव मिळत नाही. परिणामी दुग्ध व्यवसाय तोट्यात जातो.
दुधात पाणी आणि घन पदार्थ असतात. दुधामध्ये ८४ ते ८६ टक्के पाणी असते. उर्वरित १२ ते १५ टक्के घन पदार्थ असतात. दुधातील घन पदार्थामध्ये फॅट, एस. एन. एफ., लॅक्टोज, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स यांसारखे घटक असतात.
जनावरे खात असताना आहारातील घटक त्यांच्या पचनसंस्थेत जातात. तिथे त्यांचे पचन होऊन रक्तात शोषले जातात. हे रक्त कासेतून फिरत असताना, कासेतील पेशी रक्तातील आवश्यक घटक वापरून त्यापासून दुधाची निर्मिती करत असतात.
दुधातील घटक हे खालील गोष्टींवर अवलंबून असतात.
- आहाराचा प्रकार, त्यातील घटक
- आहार देण्याची पद्धत
- जनावरांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य
- हवामानातील बदल
- आहाराचे पचन
- धार काढण्याच्या पद्धती आणि वेळा
- जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन
- जनावरांचे गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यातील आहार
दुधातील फॅट आणि एस. एन. एफ. चे प्रमाण वाढण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात-
- नवजात वासराचे सहा महिने वयापर्यंत दर महिन्याला जंतनिर्मुलन करावे. त्यानंतर पुढे जाऊन प्रत्येकी तीन महिन्याच्या अंतराने जनावरांचे जंतनिर्मुलन केले पाहिजे.
- जनावरांना आहार देत असताना कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चाराही द्यावा. चाऱ्यामध्ये एकदल, द्विदल चाऱ्याचा समावेश करावा.
- कोरडा चारा उपलब्ध नसल्यास हिरवा चारा वाळवून, त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करून तो द्यावा.
- उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत असल्यास, हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनवून टंचाईच्या काळात तो जनावरांना द्यावा.
- चाऱ्याबरोबरच जनावरांना खुराकही द्यावा, सोबतच खनिज मिश्रणांचा आहारात समावेश करावा.
- धार काढताना पशुपालक सुरुवातीचे दूध काढून झाल्यानंतर शेवटचे दूध वासरास पिण्यास देतात. असे न करता पूर्ण दूध काढून घ्यावे. कारण शेवटच्या धारेमध्ये फॅटचे प्रमाण सर्वाधिक असते.
- धार काढण्याच्या वेळेतील अंतर सारखे ठेवावे. धार काढण्याच्या वेळा बदल्याने दुधातील घटकाचे प्रमाण कमी-जास्त होते.
- उन्हाळ्यात उष्णतेच्या ताणामुळे जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. दुधाला कमी फॅट लागतो. यासाठी उन्हाळ्यात जनावरांवर उष्णतेचा ताण येणार नाही, अशा प्रकारे गोठ्याचे आणि आहाराचे व्यवस्थापन करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.