
अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा, सूर्यप्रकाशाचा आभाव, ढगाळ वातावरण गोठ्यातील ओलावा चारा व पाण्याची ढासळलेली प्रत या परिस्थितीमुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो. जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्या इत्यादी उद्भवतात. अशा वेळी शक्य असल्यास खुराकाचे प्रमाण वाढवून द्यावे. प्रामुख्याने दुभत्या आणि व्यायला झालेल्या गाई, म्हशींची अन्नघटकांची शारीरिक मागणी पूर्ण करण्याकरिता खुराकाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
फऱ्या हा जिवाणूजन्य आजार असून क्लोस्ट्रीडीयम शेवाय या जिवाणूमुळे होतो. दोन वर्षापर्यंतचे धष्टपुष्ट जनावर या आजारास प्रामुख्याने बळी पडते. हा आजार मुख्यत्वे करून पावसाळ्यात आढळून येतो.
फऱ्या आजाराची लक्षणे कोणती आहेत?
बाधित जनावराला ताप येतो. खांदा पुढील किंवा मागील पायाचा, पोटाचा खालचा भाग व पाठ यावर सूज येते. सूज आलेल्या भागावर दाबल्यास बुडबुडे फुटल्यासारखा करकर आवाज येतो. सूज आलेले स्नायू लालसर, काळपट, कोरडे आणि मऊ पडते. या लक्षणांवरून या आजाराचे निदान करता येते. परंतु अति तीव्र प्रकारात लक्षणे दिसत नसल्याने निदान करणे कठीण जाते. काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघून तसेच जिवाणू संवर्धन करून प्रयोगशाळेत पक्के रोग निदान करता येते. बाधित ठिकाणची कातडी थंड पडून संवेदनाहीन बनते. लक्षणे दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर १२ ते ४८ तासांमध्ये मृत्यू होतो. अति तीव्र प्रकारात या आजाराची अचानक सुरुवात होते. काही जनावरांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. छाती, मान, खांदा आणि मागील पायाच्या जाड स्नायूमध्ये हे जिवाणू वाढत जातात. त्या ठिकाणी अंतर्गत जखमा निर्माण करतात. त्यामुळे बाधित स्नायूमध्ये वेदना होतात. प्रसंगी जनावर लंगडते.
उपाय काय आहेत?
योग्य उपचारा अभावी पशुधन एक ते दोन दिवसात मृत्युमुखी पडते. जनावरांना नेहमीच्या ठिकाणी चरण्यासाठी सोडू नये. या आजारात मृत्यू दर ७० ते १०० % असल्यामुळे आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजने गरजेचे असते. त्यासाठी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यामध्ये पशुधनास पशुवैद्यकाच्या साह्याने लसीकरण करून घ्यावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.