करडांमधील मरतूक (Kids Mortality) हे शेळीपालन (Goat Farming) तोट्यात जाण्याचे प्रमुख कारण आहे. अनेकदा शेळीपालन व्यवसायात मरतुकीचे प्रमाण ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत व त्याहीपेक्षा जास्त आढळून आले आहे. योग्य वयात लसीकरण (Vaccination) , योग्य आहार (Diet) व सुयोग्य व्यवस्थापन इत्यादी व्यवस्थापन प्रणालींचा अवलंब करून करडांमधील मरतूक बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते. करडांची मरतुक टाळण्यात व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा आहे. याविषयी कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जळगाव येथील डॉ. तुषार भोसले आणि डॉ. उल्हास गायकवाड यांनी पुढील माहिती दिली आहे.
१) शेळ्या विण्याची जागा ही स्वच्छ, निर्जंतुक व कोरडी असावी. त्याठिकाणी माश्या, गोचीड, डास, पिसवा इत्यादींचा प्रादुर्भाव नसावा.
२) करडू जन्मल्यानंतर त्याची नाळ पोटापासून १ ते २ इंच अंतर ठेवून नवीन ब्लेडने कापावी व सुती दोऱ्याने बांधावी आणि नाळेला जंतूनाशख लावावे म्हणजे नाळेतून रोगजंतुंचा प्रादुर्भाव होणार नाही.
३) थंडी पासून करडांचे संरक्षण करण्यासाठी हिवाळ्यात व पावसाळ्यात त्यांच्या गोठ्यात २०० वॅटचा बल्ब लावावा. जमिनीवर भुसा, तूस, पोती, गोणी अंथरावीत. थंड वारे किंवा पावसाचे पाणी गोठ्यात येऊ नये म्हणून बाजूला गोणपाटाचे पडदे बांधावेत.
४) करडांना मोठ्या शेळ्यांमध्ये न बांधता वेगळीकडे बांधावे. जेणेकरून त्यांच्यामध्ये खाण्यासाठी स्पर्धा लागणार नाही.
५) करडे वेगवेगळी ठेवताना भरपूर गर्दी टाळावी व मोकळी जागा असावी. म्हणजे एका करडास सर्वसाधारणपणे ३ x ५ चौरस फूट जागा असावी.
६) करडे बांधण्याच्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश असावा, हवा खेळती असावी व मूत्र पडले तर त्याचा निचरा व्यवस्थित व्हावा.
७) करडांना खाद्य देताना ते जमिनीवर न टाकता टोपल्यात किंवा एक फूट व्यासाचा सिमेंट पाईप अर्धा कापून त्याची मोठी पन्हाळ खाद्यासाठी वापरावी म्हणजे खाद्य स्वच्छ राहील.
८) पाणी पाजताना पाणी सांडणार नाही याची दक्षता घ्यावी. भुसा किंवा तूस इ., पाणी सांडल्यास त्याठिकाणी बुरशी तयार होते व त्यामुळे करडांचे आरोग्य बिघडण्याचा संभव असतो.
९) करडे बांधण्याची जागा रोज स्वच्छ करावी व ती कोरडी राहील याची काळजी घ्यावी. गोठ्यातील ओलसरपणामुळे ' कॉक्सीडिओसिस' या रोगाची लागण होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.