Animal Care: शेळ्यांवरील उष्णतेचा ताण आणि उपाययोजना

Summer Care for Goats: उन्हाळ्यात वाढते तापमान शेळ्यांच्या आरोग्यावर व उत्पादनक्षमतेवर वाईट परिणाम करू शकते. उष्णतेचा ताण टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. अभिजित बाराते, डॉ. चंद्रकांत शेंडे

Heat Stress Management: तीव्र उष्णतेमुळे शेळ्यांमध्ये शारीरिक आणि वर्तणुकीत बदल होतात आणि उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होतो. हे लक्षात घेऊन शेळ्यांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. आहारात सुधारणा करून तंतुमय घटकांचे प्रमाण कमी करावे. ऊर्जा घनता वाढवावी. जीवनसत्त्व क, इ यांचा आहारात समावेश करावा.

उष्ण तापमानात शेळ्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वर्तणुकीत बदल करतात. खाण्याचे प्रमाण कमी होते. जास्त उष्णता निर्माण होऊ नये म्हणून शेळ्या अन्नाचे सेवन कमी होते. पाण्याचे प्रमाण वाढते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त प्रमाणात पितात. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या सावलीत जातात. जास्त श्‍वासोच्छ्वास व लाळ गाळतात. उष्णता कमी करण्यासाठी शेळ्यांचा श्वासोच्छ्वास वाढतो, पण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

उष्णतेचा ताण आल्यावर शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी निष्क्रिय होते. गंभीर परिस्थितीत शेळ्यांच्या हालचालींचा समतोल बिघडतो आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीत शेळी कोसळू शकते. उष्ण हवामानाचा ताण विशेषतः लहान शेळ्यांच्या वाढीवर परिणाम होतो. कमी अन्न सेवनामुळे शरीराला कमी ऊर्जा मिळते. थंड हवामानातील शेळ्यांच्या तुलनेत उष्णतेच्या ताणाखालील शेळ्यांचे वजन कमी असते. दीर्घकाळ उष्ण हवामानात वाढ झाल्यास लहान शेळ्यांना प्रौढ होण्यासाठी जास्त कालावधी लागतो.

Goat Farming
Animal Care : वाढलेले खूर जनावरांसाठी घातक ; अशी घ्या काळजी

प्रजननक्षमतेवर परिणाम

नरांवरील परिणाम : उष्ण हवामानाचा ताण नरांच्या प्रजननक्षमतेत घट करतो. नरांमध्ये शुक्राणूंचे उत्पादन कमी होते. जास्त तापमानामुळे अंडकोषाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि शुक्राणूंची संख्या घटते.शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते आणि ते अंडी फलन करण्यास कमी सक्षम असतात. नर कमी सक्रिय असतात.

मादींवरील परिणाम :

हार्मोनल असंतुलनामुळे मासिक प्रजनन चक्रावर परिणाम होतो. गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. मादीमध्ये अंडी फलनाचे प्रमाण कमी होते. उष्णतेमुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर भ्रूण मृत्यू होण्याची शक्यता वाढते. गाभण मादीमध्ये दूध उत्पादन कमी होते. त्यामुळे पिलांच्या वाढीवर परिणाम होतो.

अंतर्गत शारीरिक बदल :

श्‍वासोच्छ्वास आणि हृदयगती वाढते. उष्णता कमी करण्यासाठी श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो.

उष्णतेचा निचरा करण्यासाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हृदयगती वाढते.

घाम आणि श्‍वासोच्छ्वासामुळे सोडियम, पोटॅशिअम आणि क्लोराइडसारखे महत्त्वाचे खनिज पदार्थ कमी होतात आणि त्यांचे शरीरातील द्रव संतुलन बिघडते.

शरीराचे तापमान ३८.५ ते ३९.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास तीव्र उष्णतेचा ताण येतो, त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात/ मृत्यू होऊ शकतो.

उष्ण हवामानामुळे शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होतात. त्यापासून पेशींना नुकसान होते. कॉर्टिसोल हार्मोन वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो.

Goat Farming
Animal Care : जनावरांच्या नाकातील रक्तस्त्राव, कडव्या आजाराचे नियंत्रण

आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम

उष्णतेमुळे शरीराचा रोगांशी लढण्याचा प्रतिकार कमी होतो. शेळ्यांना न्यूमोनिया, उष्णता थकवा आणि परजीवी संसर्ग अधिक होता.

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने जखमा बऱ्या होण्यास वेळ लागू शकतो.

दूध उत्पादन आणि गुणवत्ता

उष्णतेमुळे चयापचय प्रक्रिया विस्कळीत होते, परिणामी दूध उत्पादन घटते. दुधातील स्निग्धांश आणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते, त्यामुळे दुधाचा पौष्टिकतेवर परिणाम होतो.

सॉमॅटिक सेल काउंट वाढतो. हा दुधातील

जिवाणूंचा परिणाम दर्शवतो, ज्यामुळे दुधाची गुणवत्ता कमी होते.

मांस उत्पादन आणि दर्जा

मांस उत्पादन घटते. कमी वाढीमुळे मांसाचे प्रमाण कमी होते.

मांसाची गुणवत्ता बदलते. स्नायूंमध्ये रासायनिक बदलांमुळे मांस गडद दिसते.

सामू पातळी वाढते: यामुळे मांस लवकर खराब होते.

तणावामुळे स्नायू घट्ट होतात, त्यामुळे मांस कमी मऊ असते.

उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

निवारा आणि सावली

झाडे, झुडपे किंवा गोठ्याचा वापर करून सावली उपलब्ध करून द्यावी. सावलीमुळे उष्णता कमी होते, ज्यामुळे वजनवाढ, दूध उत्पादन आणि प्रजनन कार्यक्षमता सुधारते.

आहार व पोषण व्यवस्थापन

थंड हवामान असलेल्या वेळी चरण्यास सोडावे. योग्य खाद्याची व्यवस्था करावी. आहारात सुधारणा करून तंतुमय घटकांचे प्रमाण कमी करावे. ऊर्जा घनता वाढवावी (सोयाबीन तेलासारखे फॅट सप्लिमेंट्स द्यावे), तसेच जीवनसत्त्व क, इ यांचा आहारात समावेश करावा.सोडिअम बायकार्बोनेट, नायासिन आणि यीस्ट सारखे खाद्य पूरक पदार्थ वापरून पचनक्रिया आणि चयापचय संतुलित राखावे.

पाण्याचे व्यवस्थापन

स्वच्छ, थंड आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची सातत्याने उपलब्धता करावी. पिण्याच्या पाण्याचे ठिकाणे वाढवावीत.

आनुवंशिकता

ताण प्रतिरोधक स्थानिक जातींची निवड करावी. विशेषतः कोरड्या प्रदेशातील स्वाभाविकपणे उष्णतेशी जुळवून घेणाऱ्या जाती निवडाव्यात. उष्णता सहन करणाऱ्या जीनोटायप्स आणि उच्च उत्पादनक्षम जाती यांचे संकरित प्रजनन करून उष्णतारोधक क्षमता सुधारता येते.

शेळ्यांमधील नैसर्गिक क्षमता

काही शेळ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उष्ण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. हलक्या रंगाचे आणि छोटे केस असल्यामुळे उष्णता कमी शोषली जाते. मोठे कान असतात, ज्यामुळे शरीरातून उष्णतेचा निचरा करण्यास मदत होते. गडद त्वचेची संरचना असते, जी सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून संरक्षण करते. चयापचय दर कमी असतो, ज्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो

जाती

उस्मानाबादी

ही जात कोरड्या आणि उष्ण हवामानासाठी उत्तम प्रकारे अनुकूल आहे. उष्णता सहनशील गुणधर्म जसे, की पातळ त्वचा, हलका शरीररचना आणि चांगली पाण्याची साठवण क्षमता. यामुळे ती जास्त तापमानातही चांगली वाढते.

बारबेरी

ही जात विशेषतः उष्ण आणि कोरड्या प्रदेशासाठी योग्य आहे. लहान शरीर, पातळ केस आणि उच्च उष्णता सहन करण्याची क्षमता असते, त्यामुळे ती उष्ण हवामानातही चांगली वाढते.

संगमनेरी

मध्यम उष्णता सहन करू शकते, परंतु ही जात उस्मानाबादी आणि बारबेरी इतकी तग धरणारी नाही. सावली आणि पुरेशा पाण्याच्या व्यवस्थेमध्ये चांगली कामगिरी करू शकते.

कोकण कन्याळ

कोकणातील दमट हवामानासाठी जास्त अनुकूलित आहे, त्यामुळे ती कोरड्या आणि उष्ण हवामानात तुलनेने कमी सहनशील ठरते.

- डॉ. चंद्रकांत शेंडे, ९९७०८३२१०५

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com