पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये वाढत्या संधी...

यंदाच्या जागतिक पशुवैद्यक दिनाचे (World Veterinary Day) ‘पशुवैद्यकाच्या स्थितिस्थापकत्वाचे बळकटीकरण' हे घोषवाक्य आहे. पशुवैद्यकीय समुदायाचे बळकटीकरण करून, आपण भविष्यातील आव्हाने पेलण्याची तयारी करू शकतो. प्राणी व मानवी आरोग्याचे अधिक चांगले संरक्षण करणे शक्य आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. विलास आहेर

पशुवैद्यकीय क्षेत्र (Veterinary Field) हे पशू प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी आणि कनवाळू प्रवृत्ती जोपासणारे क्षेत्र आहे. पशुवैद्यकाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे प्राण्यांची काळजी (Animal Care) घेणे, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य सुनिश्‍चित करणे आणि आजारी जनावरांची काळजी घेऊन त्यांच्या वेदना कमी करून सामाजिक सेवा करणे हे होय. प्राणी त्यांच्या वेदना आणि दु:खाचे तोंडी स्पष्टीकरण देण्यास सक्षम नसल्यामुळे, पशुवैद्यकाला प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करावा लागतो, ज्यामुळे वेदना किंवा असामान्य वर्तनाचे निदान करण्यास मदत होते. दूध उत्पादन वाढ, जनावरांतील शस्त्रक्रिया, अनुवंशशास्त्र, गोवंशातील भ्रूणप्रत्यारोपण आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांतील संशोधनामध्ये भारतीय पशुवैद्यकांचे मोठे योगदान आहे. पशुवैद्यकीय व्यवसाय जागतिक क्षेत्रातील एक अव्वल व्यवसाय मानला जातो. पशुवैद्यकीय फार्मास्युटिकल्स, विपणन, ग्रामीण पशुवैद्यकीय दवाखाना, शहरी पशुवैद्यकीय रुग्णालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठ, संशोधन संस्था, कुक्कुटपालन उद्योग, दूध सहकारी संस्था, वन्यजीव व इतर निगडित संशोधन केंद्रांमध्ये पशुवैद्यक आपली मोलाची कामगिरी बजावत आहेत. भारतीय सैन्य दलातील प्राण्यांसाठी सेवा पुरवण्याची मोलाची कामगिरीसुद्धा पशुवैद्यक पार पाडत आहेत. ‘पशुवैद्यकाच्या स्थितिस्थापकत्वाचे बळकटीकरण' हे यंदाच्या जागतिक पशुवैद्यक दिनाचे घोषवाक्य आहे. आपल्या पशुवैद्यकीय समुदायाचे बळकटीकरण करून, आपण भविष्यातील आव्हाने पेलण्याची तयारी करू शकतो. प्राणी व मानवी आरोग्याचे अधिक चांगले संरक्षण करू शकतो. (World Veterinary Day)

देशातील पशू विज्ञान / मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत निर्माण होणारे मनुष्यबळ प्राणी आरोग्य संशोधनाच्या माध्यमातून पशुधन उत्पादन परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पशुधन क्षेत्राच्या विविधीकरणामुळे, पशुवैद्यकांची भूमिका नेहमीच आव्हानात्मक आहे. या क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. म्हणून विविध स्तरांवर आवश्यक असलेल्या दर्जेदार पशुवैद्यक संसाधनांचा विकास करणे अधिक योग्य राहील. पशुसंवर्धन हा भारतीय शेतीचा अविभाज्य घटक आहे, जो ग्रामीण भागातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोकांच्या उपजीविकेला आधार देतो. जनावरांच्या अन्न उत्पादनांच्या मागणीत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता कृषी विकासाचे इंजिन म्हणून पशुधन क्षेत्र उदयास आलेला आहे.

पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी ः

१) पशुवैद्यकीय क्षेत्राच्या सबलीकरणासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, इतर अद्ययावत सोई-सुविधा आणि नवीन पशुवैद्यक तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व महाविद्यालयीन सुविधा यांचा विचार करणे काळानुरूप योग्य ठरणार आहे. त्याचबरोबर पशू निदानाच्या क्षेत्रात आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा परिचय, पशू उत्पादनात वाढ, पौष्टिक अन्न गरजांमध्ये सुधारणा, शहरी लोकसंख्येच्या उत्पन्नात वाढ आणि पाळीव प्राण्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलल्यामुळे पशुवैद्यकीय व्यवसायाला भविष्यात भरीव संधी उपलब्ध होत आहेत.

२) निदान व उपचार करत असताना नवनवीन जिवाणूजन्य किंवा विषाणूजन्य आजार बळावत आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या आजारास तोंड देत असताना पशुवैद्यकाला स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करावे लागते. गेल्या दोन वर्षांत जनावरांना लंपी स्कीन आजार, क्रिमियन कांगो फीवर आणि बर्ड फ्लू या भयावह संक्रमित आजारांचा प्रादुर्भाव झाला होता. या सर्व संक्रमित आजारावर योग्य पद्धतीने मात करून पशुवैद्यकाने यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवण्याची भूमिका निभावली आहे.

३) शासकीय सेवेत पशू उपचारासोबत पशुधनाची पैदास, पशुजन्य उत्पादन वाढ, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी तांत्रिक मार्गदर्शन, पशुस्वास्थ्य सोबत मानव-पर्यावरण स्वास्थ्य यांची सांगड घालून एक आरोग्य साधण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.

४) पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत आहेत. प्राणी विज्ञानाच्या सर्व क्रियाकलापांचा मूलत: मानवी आरोग्यावर प्रत्यक्षपणे जैववैद्यकीय संशोधन आणि सार्वजनिक आरोग्याद्वारे किंवा अप्रत्यक्षपणे घरगुती प्राणी, वन्यजीव आरोग्यामुळे किंवा पर्यावरणामुळे परिणाम होतो. मूलभूत स्तरावर पशुवैद्यकीय संशोधन ही मानवी आरोग्य क्रिया आहे. पशुवैद्यक शास्त्रज्ञ अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्‍चित करून मानवी आरोग्य आणि कल्याणाचे रक्षण करतात, प्राणी-मानव संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रित करून पर्यावरण आणि परिसंस्थेचे संरक्षण करून व वैद्यकीय संशोधनात काम करून पशुवैद्यक सार्वजनिक आरोग्यास हातभार लावतात.

(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे सहयोगी अधिष्ठाता आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com