डॉ. सचिन राऊत, डॉ. शरद चेपटे Goat Farming Tips: शेळीपालन व्यवसायामध्ये पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने व्यवसाय पूर्णपणे यशस्वी होत नाही. शेळ्यांना आपली शारीरिक वाढ व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा मुख्यत्वे करून लसूणघास, बरसीम अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त चाऱ्यापासून मिळते. प्रजननाचे व्यवस्थापन अशा प्रकारे करावे, की जेणेकरून दोन वर्षांमध्ये शेळीने तीन वेळेस करडांना जन्म द्यावा. यामुळे व्यवसायाला चांगल्या प्रकारे नफा होईल. .शेळ्यांसाठी गोठ्याचे बांधकाम हे कोरड्या जागेवर केलेले असावे, तसेच गोठा हा थोड्या उंच अशा जागेवर बांधलेला असावा.गोठ्याच्या सभोवती पाणथळ किंवा दलदल असू नये. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे, अशा भागांमध्ये गोठा हा थोड्या जास्त उंचीवर बांधलेला असावा. गोठा हा दहा फूट उंचीचा असावा जेणेकरून हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील.नराला बांधण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी. उन्हाळ्यात गोठ्यात चांगल्या प्रकारे सावली राहील अशी व्यवस्था करावी. पिण्यासाठी स्वच्छ, ताजे आणि थंड पाणी भरपूर प्रमाणात मिळेल याची व्यवस्था असावी. गोठ्यात जास्त प्रमाणामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी..प्रकार जागेची आवश्यकता (मीटर२ / शेळी)मोठ्या शेळ्या १.००दूध देणाऱ्या शेळ्या १.६८बोकड ३.४करडे ०.४.Goat Farming Business: शेळीपालनातून ग्रामीण अर्थकारणाला आधार.प्रजोत्पादनासाठी शेळ्यांची निवडखरेदी खात्रीलायक ठिकाणावरूनच करावी.चांगले आरोग्य व उत्तम शारीरिक स्थिती असलेल्या शेळ्या निवडाव्यात. मोठ्या वयात आलेल्या शेळ्या खरेदी कराव्यात.नवीन खरेदी केलेल्या शेळ्यांना ओळखीसाठी क्रमांक असलेले बिल्ले लावावेत. रोगप्रतिबंधकारक लसीकरण करावे.नव्याने खरेदी केलेल्या शेळ्यांना कळपात सोडू नये, त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. साधारणतः पंधरा दिवस निरीक्षणाखाली ठेवावे. त्यांना काही आजार नाही याची खात्री झाल्यानंतरच कळपामध्ये सोडावे..शारीरिक स्थिती चांगली आणि रोगमुक्त असलेल्या शेळ्या,बोकडांना प्रजोत्पादनासाठी निवडावे.व्यवस्थापन करताना शक्यतो शेळ्यांना विण्याचा काळ प्रखर उन्हाळा (एप्रिल, मे) किंवा प्रखर हिवाळा (नोव्हेंबर, डिसेंबर) असू नये.ज्या शेळ्यांचे वय सहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा शेळ्यांना तसेच निरुपयोगी शेळ्यांना कळपातून काढून टाकावे..खाद्य व्यवस्थापनशेळ्यांना झाडे, झुडपांचा पाला खाणे आवडते. त्यामुळे आपल्या प्रक्षेत्रावर झाडे (उदा. सुबाभुळ, बोर इत्यादी) व झुडपे (उदा. गिरिपुष्प) यांची लागवड करावी. आपल्या प्रक्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी.शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासोबतच कोरडा चारा द्यावा.शेळ्यांना आपली शारीरिक वाढ व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा मुख्यत्वे करून लसूण घास, बरसीम अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त चाऱ्यापासून मिळते. एकूण गरजेपैकी २ /३ गरज ही लसूण घास, बरसीम इत्यादी चारा पिकांपासून भागविली जाते. चारा देताना अर्धा भाग लसूण घास किंवा बरसीम द्यावा. उर्वरित अर्ध्या भागात गवत, झाडांची पाने, झुडपे व कोरडा चारा यांचा समावेश करावा..उच्च दर्जाचा हिरवा चारा हा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध नसतो अशा वेळेस शेळ्यांना खाण्यासाठी ढेप (पेंड) उपलब्ध करून द्यावी.करडांना सुरुवातीच्या पाच दिवसांपर्यंत चीक द्यावा. चिकामुळे करडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते. तसेच त्यांचे पोटदेखील साफ होते. पाच दिवसांनंतर थोडे दूध द्यावे व इतर खाद्य देणे सुद्धा सुरू करावे.करडांना वयाच्या पंधरा दिवसानंतर पुरेशा प्रमाणामध्ये प्रथिनयुक्त चारा म्हणजेच लसुणघास, बरसीम, गजराज गवत द्यावे. करडांच्या चांगल्या वाढीसाठी हे आवश्यक आहे..करडांच्या खाद्यामध्ये थोडेसे मीठ द्यावे, यामुळे करडांमध्ये खनिज द्रव्यांची कमतरता जाणवणार नाही. करडांना भरपूर प्रमाणामध्ये पिण्यासाठी पाणी अवश्य द्यावे.बोकड, शेळ्यांना रेतनाच्या काळामध्ये ढेप अवश्य द्यावी. या काळात जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर होतो.शेळ्यांना संतुलित आहार द्यावा. यामध्ये प्रथिने, खनिज क्षार, जीवनसत्त्व इ. योग्य प्रमाणामध्ये असतात..रोग प्रतिबंधक व्यवस्थापनकळपातील शेळ्या, बोकड आणि करडांवर व्यवस्थित लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे उदा. खाणे कमी करणे, ताप येणे, नाकातून किंवा तोंडातून द्रव पदार्थ येणे किंवा आचरणामध्ये काही अनपेक्षित बदलावर लक्ष ठेवावे. ही लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. शेळीस संसर्गजन्य आजाराची बाधा झाली असे लक्षात येताच कळपातून वेगळे काढावे. अशा शेळीची खाण्यापिण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. तत्काळ उपचार सुरू करावेत..Goat Farming Success: शेळीपालनातून आम्ही झालो स्वावलंबी.शेळ्यांना वेळोवेळी जंतनाशकची मात्रा द्यावी. शेळ्यांमध्ये विशेषतः करडांमध्ये जंताची समस्या जास्त प्रमाणामध्ये दिसते. शेळ्यांच्या लेंडयाची तपासणी करून घ्यावी, योग्य औषधोपचार करावा, जंतनाशक देताना एकाच प्रकारची औषधे वारंवार देऊ नये, कारण यामुळे जंतांमध्ये औषधी प्रतिकारक क्षमता निर्माण होतो.शेळ्यांना स्वच्छ, चांगले खाद्य, पाणी द्यावे. यामुळे शेळ्या निरोगी राहतात. निरोगी शेळ्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते..प्रजनन व्यवस्थापनप्रजननाचे व्यवस्थापन अशा प्रकारे करावे, की जेणेकरून दोन वर्षांमध्ये शेळीने तीन वेळेस करडांना जन्म दयावा. यामुळे व्यवसायाला चांगल्या प्रकारे नफा होईल.प्रत्येक पंचवीस शेळ्यांसाठी एक बोकड प्रजननासाठी वापरावा.शेळी माजावर आल्यानंतर बारा तासानंतर बोकड शेळी जवळ सोडावा आणि रेतन करावे. यामुळे शेळी गाभण राहण्याची शक्यता जास्त असते.ज्या शेळ्या व्यवस्थितरीत्या माजावर येत नसतील किंवा त्यांच्यामध्ये गर्भपात होत असेल अशा शेळ्यांची पशुतज्ञाकडून तपासणी करून त्यांच्यावर उपचार करावेत, ज्या शेळ्या उपचारांनाही प्रतिसाद देत नसतील अशा शेळ्यांना कळपातून काढून टाकावे..गाभणकाळातील व्यवस्थापनगाभणकाळात शेळ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नेहमीपेक्षा शेळ्यांना आहार जास्त द्यावा, कारण यामुळे गर्भाची वाढ चांगल्या प्रकार होते. शेळ्यांवर ताण तणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. गाभण शेळ्या शक्यतो बाहेर चरण्यास सोडू नयेत. जर शक्य नसेल तर त्यांना चरावयास इतर शेळ्यां सोबत सोडू नये. विण्यास आलेल्या शेळ्यांना स्वतंत्र गोठ्यामध्ये बांधावे, गोठा हा निर्जंतुक केलेला असावा, या शेळ्यांकडे विशेष लक्ष द्यावे कारण प्रसूती केव्हाही होऊ शकते, शेळी विताना जर गरज असेल तर मदत करावी. शेळी अडवली तर तात्काळ पशुवैद्यकास पाचारण करावे, स्वतः पिलू ओढून काढू नये यामुळे करडू व शेळी दोहोंसही इजा होण्याची शक्यता असते. व्यायल्यानंतर शेळीला गुळाचे पाणी व ढेप द्यावी..करडांचे व्यवस्थापनशेळी व्याल्यानंतर करडाच्या अंगावरचा द्रव स्वच्छ कपड्याने पुसावा. करडाच्या नाका तोंडातील द्रव काढून टाकावा, या द्रवामुळे करडे गुदमरण्याची शक्यता असते.करडाची नाळ धारदार चाकू किंवा ब्लेडने कापावी. त्यावर जंतूनाशक द्रव्याचा बोळा लावावा.करडांचा बाह्या वातावरणापासून संरक्षण करावे. अति ऊन, पाऊस अथवा थंडी करडांना सहन होत नाही.करडांच्या शिंग कळ्यांचा नाश करावा. यासाठी वयाचे पहिले दोन आठवडे हा कालावधी योग्य आहे. शिंगकळ्याचा नाश करण्यासाठी इलेक्ट्रिक डिहॉर्नर किंवा कॉस्टिक पोटॅशचा वापर करावा..नर करडांचे खच्चीकरण करावे यामुळे मांसाची प्रत वाढते.करडांना वेळच्या वेळी रोगप्रतिबंधक लसीकरण करावे.करडांचे दूध वयाच्या आठव्या आठवड्यामध्ये तोडावे.काही करडांची निवड प्रजोत्पादनाकरिता बोकड म्हणून करावी. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे.- डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११(पशुशल्य चिकित्सा व क्ष-किरण विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.