कालवडींचे आजार अन् प्रतिबंधात्मक उपाय

कालवडींना होणारे आजार टाळता आले, तरच संगोपन फायदेशीर होते. यासाठी गोठ्यावर वर्षभर प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. आजारी कालवड ओळखून त्यांना त्वरित उपचार उपलब्ध करून देणे आणि मरतुक टाळणे गरजेचे आहे.
Heifer Decease
Heifer DeceaseAgrowon

जातिवंत गाईची पैदास - भाग : १९

कालवड संगोपनात आजारी कालवड ओळखून त्यावर त्वरित योग्य उपचार होणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कालवडीच्या दूध पिण्याच्या किंवा खुराक खाण्याच्या सवयीत काही बदल झाल्यास ती आजारी तर नाही ना याकडे लक्ष दिले पाहिजे. शेण कसे आहे? लघवी करते का? नाकातून डोळ्यातून काही स्त्राव येतात का? हे पाहावे. त्याचबरोबर ताप किती आहे ते मोजावे. वासरांमध्ये प्रामुख्याने हगवण, फुफ्फुसदाह, नाळेचे आजार, गुढघे सुजणे, इत्यादी आजार होतात. त्यांचे योग्य ज्ञान असल्यास ते टाळणे सहज शक्य होऊ शकेल.

हगवण ः

  • कालवड संगोपनात सर्वांत अधिक तोटा हा हगवण आजारामुळे होतो. हगवण हा एक आजार नसून हे अनेक आजारांचे लक्षण आहे.

  • हगवण कोणत्याही कारणाने झाल्यास त्यात प्रामुख्याने शरीरातील पाणी कमी होते, कारण एकतर जुलाब होत असताना त्यातून पाणी शरीराबाहेर जाते. त्याचबरोबर आतड्यातून पाण्याचे शोषण कमी होते. अशा प्रकारे कालवडीच्या शरीरातील पाणी अधिक अधिक कमी होत जाते, त्याच बरोबर शरीरातील विविध क्षार घटकांचे प्रमाण कमी होत जाते.

  • रक्तातील आम्लता वाढत जाते, कालवडीचे आरोग्य खालावत जाते आणि वेळेत उपचार न मिळाल्यास कालवड दगावते.

असंसर्गजन्य हगवण ः

  • असंसर्गजन्य कारण हे संसर्गजन्य कारणांनी हगवण लागण्यास कारणीभूत ठरतात. असंसर्गजन्य कारणांना नियंत्रित केले नाही तर संसर्गजन्य कारणांनी होणारी हगवण थांबविण्यासाठीचे सर्व उपाय निष्फळ ठरतात.

  • आहारातील कमतरता, वातावरणातील बदल आणि संगोपनातील त्रुटी ही मुख्य असंसर्गजन्य कारणे आहेत.

आहारातील कमतरता ः

  • उत्तम प्रतीचा चीक वासरास मिळाला नाही आणि त्यातून चांगली रोगप्रतिकारक शक्ती तयार न झाल्यास कालवड सहज आजारांना बळी पडते.

  • गाभण काळातील शेवटच्या तिमाहीतील गाईचे आहार नियोजन भविष्यात व्यायल्यावर निर्माण होणाऱ्या चिकाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. उच्च गुणवत्तेचा चीक मिळविण्यासाठी शेवटच्या तिमाहीत जीवनसत्त्व ई व सेलेनियम यांचा अधिकचा पुरवठा करणे आवश्यक असतो. तसेच गाभण काळात वेळोवेळी लसीकरण केले असल्यास चिकातून अधिकची रोगप्रतिकारक कालवडीला मिळते.

प्रतिकूल वातावरण ः

  • कालवडीच्या आजूबाजूचे वातावरण आणि त्यातील बदल हे कालवडीला आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात. कालवडीच्या गोठ्यातील दलदल, गर्दी, एकाच वेळी वेगवेगळ्या गाई एकत्र तसेच अस्वच्छ जागेत व्यायल्यास, आजारी वासरे एकत्र ठेवल्यास वासरे सहज हगवण या आजाराला बळी पडतात.

व्यवस्थापनातील दुर्लक्ष ः

  • जन्मताना कालवड अडणे, ओढून काढावे लागणे, व्यायल्यावर योग्य काळजी न घेतल्यास, दोन तासांच्या आत चीक न पाजल्यास कालवड अनेक आजारांना बळी पडते.

संसर्गजन्य हगवण ः

  • कालवडींना लहानपणी विविध रोगजंतूंचा सहज प्रादुर्भाव होतो, यात प्रामुख्याने जिवाणू, विषाणू, एक पेशीय परोपजीवी, जंत आणि काही बुरशींचा प्रादुर्भाव हगवणीस कारणीभूत होतो.

जिवाणू ः

  • जिवाणूजन्य हगवण हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. तो प्रामुख्याने ई कोलाय, साल्मोनेला आणि क्लोस्ट्रीडीअम जिवाणूंमुळे होतो.

  • ई. कोलाय हे एक अतिशय घातक जिवाणू असून ते निसर्गात सर्वत्र आढळून येतात. कालवडीला १६ ते २४ तासांत हे जिवाणू प्रादुर्भाव करू शकतात. यामुळे वासरांत अचानक हगवण लागण्याचे प्रकार सहज घडू शकतात.

  • साल्मोनेला जिवाणूंमुळे कालवडीच्या जन्मानंतर ६ दिवसांनी प्रादुर्भाव होऊ शकतो. याप्रकारच्या संक्रमणात कालवडीला हगवण लागण्याबरोबरच शेणातून रक्त व मांसाचे तुकडे येणे, ताप येणे आणि कालवड कोमेजून जाणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

  • क्लोस्ट्रीडीअम परफ्रीन्जेस या जिवाणूमुळे जेव्हा कालवड भुकेले असताना अधिक दूध पिते आणि न पचलेले दूध आतड्यात जाते, तेव्हा या जिवाणूंची वाढ तेथे झपाट्याने होते आणि हगवण लागते.

  • कालवड बैचेन होणे, पोटदुखी, पोटात पाय मारणे किंवा जमिनीवर पाय आपटणे याचबरोबर शेणातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे यात दिसून येतात.

विषाणू ः

  • कालवडींना जन्मानंतर विविध विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. चिकातून उत्तम रोगप्रतिकार शक्ती मिळाली नसल्यास विषाणूजन्य हगवण पहिल्या आठवड्यातच लागू शकते.

  • यात प्रामुख्याने रोटा, कोरोना, बोव्हाइन व्हायरल डायरिया आणि इन्फेक्शीअस बोव्हाइन ऱ्हाईनोट्रकाईटीस विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. विषाणूंमुळे संक्रमण झालेले असतानाच जीवाणूंचे संक्रमण झाल्यास अधिक तीव्रतेची हगवण लागू शकते.

एक पेशीय परोपजीवी ः

  • क्रिपटोस्पोरीडिया आणि कोक्सीडीओसीस यांचे संक्रमण झाल्यास १ ते ४ आठवड्यांच्या वासराच्या आतड्याच्या अन्न शोषण करणाऱ्या पेशींमध्ये हे वाढतात.

  • संक्रमण झालेल्या पेशी फुटतात. त्यातून रक्तस्राव होतो. यामुळे लाल रक्तमिश्रित किंवा काळपट हगवण कालवडीला होते.

  • वासरांच्या निवाऱ्यातील अस्वच्छता, गर्दी, अचानक आहारातील बदल त्याच बरोबर कालवडीला इतर प्रकारचा तणाव हा अशा प्रकारचे संक्रमण होण्यासाठी कारणीभूत ठरतो.

जंत ः

  • कालवडीचे वेळेवर जंत निर्मुलन न केल्यास विविध प्रकारच्या जंतांची बाधा होते. चपटे कृमी आणि गोलाकार कृमी आतड्यात वाढतात व पचन बिघडवतात. अनेक वेळेस शेणाबरोबरच जंत बाहेर पडताना दिसून येतात.

  • यकृतातील कृमी यकृताचे काम बिघडवतात, त्यामुळे पचन बिघडते.

बुरशी ः

  • एक पेशीय बुरशी (यीस्ट) किंवा बुरशी हे सुद्धा दुय्यम रोग संक्रमण करून वासरातील हगवणीस कारणीभूत ठरतात.

  • - जेव्हा गरजेपेक्षा अधिक मात्रेत प्रतिजैविके वापरली जातात तेव्हा यीस्ट व बुरशी यांची वाढ होते.

आहारजन्य हगवण ः

  • कालवडीची दूध पिण्याची दैनंदिन सवयीत बदल झाल्यास, किंवा भुकेल्या वासराने अधिक दूध प्यायल्यास आहारजन्य हगवण लागू शकते.

  • गरजेपेक्षा अधिक दूध पाजल्यावर हगवण लागू शकते. यात एकतर अधिकचे दूध न पचता सरळ छोट्या आतड्यात जाते आणि तिथून न पचताच शरीराबाहेर टाकले जाते, नाहीतर अधिकचे दूध रुमेनमध्ये जाते आणि तिथे ते पचण्याऐवजी सडते. यातून कालवडीला हगवण लागू शकते.

  • आहारजन्य हगवणीमध्ये पांढऱ्या रंगाचे शेण किंवा न पचलेले दूध जसेच्या तसे शरीराबाहेर टाकलेले आढळते.

  • कालवड सतर्क असेल आणि मदती शिवाय दूध पिऊ शकत असेल तर उपचाराची गरज पडत नाही. जर कालवड दूध पीत नसेल आणि अशक्त वाटत असेल तर उपचार सुरू करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय ः

  • प्रतिबंधात्मक उपाय हे गोठ्यावर वर्षभर कायम राबवावे लागतात. वासरातील हगवण टाळण्यासाठी विविध बाजूंनी प्रयत्न करावे लागतात. त्यात आहार, नवजात कालवडीची काळजी, गोठ्यातील स्वच्छता इत्यादीचा समावेश करावा.

उपचार ः

  • हगवण कुठल्याही कारणाने होत असेल तरीही उपचार सामान्यतः सारखेच करावे लागतात. यात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील कमी झालेले पाणी भरून काढणे, रक्ताची वाढलेली आम्लता कमी करणे तसेच कमी झालेल्या क्षारांचा पुरवठा करणे.

  • कालवडीच्या शरीरातून पाणी खूपच कमी झाल्यास त्याच्या शरीराचे तापमान कमी होते, अशा वेळेस वासराच्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी त्याच्याजवळ बल्ब लावणे किंवा भट्टी पेटवून ठेवणे यासारखे उपाय करावे.

  • हगवणीबरोबर ताप सुद्धा आला असेल तर प्रतिजैविक पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सुरू करावेत.

  • आहारजन्य हगवणीमध्ये दूध किंवा मिल्क रिप्लेसर पाजणे बंद करावे. कालवडीला गूळ किंवा साखरेचे पाणी पाजू नये ते त्यांना पचत नाही, त्याऐवजी डेक्सट्रोस वापरावे.

क्षार खनिजांची कमी भरून काढण्यासाठी मिश्रण ः

१ चमचा - खाण्याचा सोडा

१ चमचा - मीठ

२५ ग्रॅम - डेक्सट्रोस

४ लिटर - कोमट पाणी

हे मिश्रण ३ तासाला १ लिटर याप्रमाणे कालवडीला पाजत राहावे.

शरीरातील पाणी कमी होण्याच्या प्रमाणानुसार दिसणारी लक्षणे ः

निर्जलीकरण टक्केवारी --- लक्षणे

५ ते ६ टक्के--- कालवड मलूल होते, हालचाल मंदावते, मानेवरील मोकळी त्वचा ओढून सोडल्यास पूर्ववत होण्यास पाच सेकंद वेळ लागतो

८ टक्के --- डोळे खोल जातात, कालवड मलूल होते, त्वचा कोरडी खरबरीत होते, कालवड उभे राहू शकत नाही, मानेवरील मोकळी त्वचा ओढून सोडल्यास पूर्ववत होण्यास पाच सेकंदांपेक्षा अधिक वेळ लागतो व त्याचा तंबू होते.

१२ टक्के ---- मृत्यू

फुफ्फुस दाह ः

  • फुफ्फुस दाह (न्यूमोनिया) हा आजार ४ महिन्यांपर्यंतच्या कालवडींना सहज होऊ शकतो.

  • विषाणूजन्य व जीवाणूजन्य दोन्ही प्रकारचे न्यूमोनिया होऊ शकतात.

  • दूध पिताना किंवा इतर काही द्रव पदार्थ पाजताना ठसका लागून फुफ्फुसात गेल्यास फुफ्फुसदाह होऊ शकतो.

लक्षणे ः

  • - खोकला, ताप, डोळ्यांतून पाणी येणे, नाकातून पाण्यासारखा किंवा चिकट स्राव/ शेंबूड येणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, श्‍वास घेताना आवाज होणे, श्‍वास घेताना पोटाची हालचाल होते.

उपचार ः

  • प्रतिजैविके व इतर आवश्यक उपचार ३ ते ५ दिवस करावे लागतात. फुफ्फुस दाह विषाणूजन्य असला तरी दुय्यम जिवाणूजन्य संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविकांचा वापर करावा लागतोच.

प्रतिबंधात्मक उपाय ः

  • उत्तम प्रतीचा चीक पाजून कालवडीला रोगप्रतिकारक शक्ती मिळवून द्यावी.

  • कालवडीचा निवारा स्वच्छ निर्जंतुक असावा.

  • आजरी वासरे दूर वेगळ्या कप्प्यात ठेवावीत.

  • कालवड ३ महिन्यांची झाल्यावर घटसर्प नियंत्रणासाठी लस द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com