Goat Diseases : आंत्रविषार : शेळ्या, मेंढ्यांमधील प्राणघातक आजार

Goat Farming : आंत्रविषार हा जिवाणूजन्य आजार आहे. या आजारात विष तयार झाल्यामुळे आतड्यांच्या दाह होतो. त्यामुळे मृत्यू होतो. ईटीव्ही लस मॉन्सूनपूर्व म्हणजे १५ जूनपर्यंत आणि मॉन्सूननंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत दरवर्षी घ्यावी.
Goat Disease
Goat DiseaseAgrowon

डॉ. वैष्णवी देगलूरकर, डॉ. रणजित इंगोले, डॉ. भूपेश कामडी
Goat Rearing : आंत्रविषार हा जिवाणूजन्य आजार आहे. या आजारात विष तयार झाल्यामुळे आतड्यांच्या दाह होतो. त्यामुळे मृत्यू होतो. ईटीव्ही लस मॉन्सूनपूर्व म्हणजे १५ जूनपर्यंत आणि मॉन्सूननंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत दरवर्षी घ्यावी.

पावसाळी वातावरणात अचानक बदल होऊन आर्द्रता, दमटपणा वाढतो. या वातावरणामध्ये शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार आजार होतो. हा जिवाणूजन्य आजार आहे. आंत्रविषार आजाराचे जिवाणू जनावरांच्या आतड्यात नियमित वास्तव्यास असतात, परंतु ते कमी प्रमाणात विष तयार करीत असल्याने शेळ्या मेंढयांमध्ये आजार उत्पन्न करू शकत नाही. परंतु जिवाणूला पोषक वातावरण मिळाल्यास रोगकरकांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होऊन अधिक प्रमाणात विष उत्पन्न होऊन शेळी, मेंढीचा मृत्यू होतो. दोन आठवड्यांपासून ते मोठ्या वयोगटातील शेळ्या, मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो. परंतु करडांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. निरोगी, धष्टपुष्ट कोकरू, करडे यास अधिक प्रमाणात बळी पडतात. बहुतेक वेळा हा आजार अतितीव्र स्वरूपाचा असल्याने लक्षणे लक्षात येण्याअगोदरच बाधित शेळी, मेंढीचा मृत्यू होतो.

आजाराची कारणे ः
१) हा आजार जिवाणूमुळे होतो.
२) शेळ्या, मेंढ्यांच्या आहारामध्ये अचानक बदल.
३) आहारात जास्त प्रमाणात पिष्टमय, कार्बोदकयुक्त खाद्य उदा. मका, गहू, ज्वारी इत्यादी खाण्यात येणे.
४) पावसाळ्यात उगवलेले हिरवे गवत खूप प्रमाणात जनावरांनी खाल्ले, तर या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हिरवा चारा अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे जनावरांचे पोट गच्च होते. अंशतः पचलेल्या अन्नामुळे आतड्यांमध्ये जिवाणूद्वारे अधिक प्रमाणात विष तयार होते.
५) आतड्यात मोठ्या प्रमाणात न पचलेले किंवा अंशतः पचलेले अन्न असणे.
६) आतड्यामध्ये पट्टकृमीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव.
७) प्रतिकारशक्तीचा नैसर्गिक अभाव. लहान कोकरू, कराडांना जास्त दूध पाजणे.

Goat Disease
Goat Farming : शेळ्या-मेंढ्यांमधील फूटरॉट

...असा होतो आजार
बहुतेक शेळ्या- मेंढ्यांच्या आतड्यात क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स हा जिवाणू कमी प्रमाणात नैसर्गिकरीत्या आढळून येतो. परंतु जिवाणू विष तयार करून बाधा करत नाही. जेव्हा या जिवाणूला पूरक वातावरण मिळते तेव्हा विष तयार करून जनावराला बाधा करू शकतात. आहारातील काही बदल उदा. जास्त प्रमाणात कार्बोदके युक्त खाद्य उदा. मका, गहू, ज्वारी इ. खाण्यात येणे, आतड्यात अडथडे निर्माण झाल्यास जास्त प्रमाणात न पचलेले किंवा अंशतः पचलेले अन्न जमा होणे, तसेच खूप जास्त प्रमाणात वेगाने आहार वाढला तर या जिवाणूला पूरक परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीत जिवाणूची वेगाने वाढ होते, ते शक्तिशाली विष तयार करतात. हे विष आतड्यांमधून शोषले जाते. काही तासांतच शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू होऊ शकतो.

Goat Disease
Goat Disease : शेळी, मेंढीमधील आंत्रविषार

आजाराची लक्षणे ः
१- शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू अचानक होतो. प्रादुर्भाव झाल्यापासून १२ ते २४ तासांत करडांचा मृत्यू होतो.
१) करडांना हिरव्या रंगाची पातळ हगवण होते. जिवाणूच्या विषांमुळे जनावरांच्या आतड्यांच्या दाह होतो. यामुळे हगवणीतून रक्त पडते.
२) बाहेरून चारून आलेली जनावरे अचानक सुस्त होतात. हालचाल कमी करतात.
३) बाधित पिले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात, अडखळत चालतात, जनावरांचा तोल जातो.
४) मोठ्या शेळ्या-मेंढ्यांच्या तोंडातून फेस येणे, लाळ येणे, दात खाणे, श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो.
५) आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, हगवण ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात.

आजाराचे निदान -
१) लक्षणावरून निदान करता येते.
२) मृत्यूनंतर जर त्वरित शवविच्छेदन करण्यात आले, तर प्रामुख्याने हृदयाच्या थैलीमध्ये (पेरीकार्डियल सॅक) द्रव पदार्थांत वाढ झालेली असते. तसेच फायब्रिनच्या गुठळ्या दिसून येतात.
३) फुफ्फुसातील रक्तसंचय आणि द्रवपदार्थात वाढ झालेली दिसते. फुफ्फुसांमध्ये फेस दिसतो.
४) मूत्रपिंडाच्या उती द्रवाने भरतात. मूत्रपिंड मऊ होऊन वेगाने सडण्याची प्रक्रिया चालू होते.

उपचार ः
१) आजार अल्पमुदत आणि अतितीव्र स्वरूपाचा असल्यामुळे प्रभावी उपचार पद्धतीचा अवलंब करणे शक्य होत नाही.
२) आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे.

प्रतिबंधात्मक उपाय ः
१) ईटीव्ही लस मॉन्सूनपूर्व म्हणजे १५ जूनपर्यंत आणि मॉन्सूननंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत दरवर्षी घ्यावी.
२) तीन महिन्यांवरील कोकरे आणि करडांना आंत्रविषाराची लस द्यावी.
३) पशुवैद्यकाकडून गाभण शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे.
४) जनावरांना कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
५) लहान करडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये.
६) शेळ्या मेंढयांना अति कर्बोदके व पिष्टमय पदार्थ युक्त खाद्य (ज्वारी, मका, इ.) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
७) मेलेल्या शेळ्या, मेंढ्यांचे पशुवैद्यकाकडून त्वरित शवविच्छेदन करून घ्यावे. आंत्रविषार या आजाराने मरण पावल्या असल्यास उर्वरित शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार प्रतिबंधात्मक लसीकरण करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

संपर्क ः डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४
(सहायक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुविकृती शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्था, अकोला)कपाशीवरील फुलकिड्यांचे व्यवस्थापन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com