Livestock Nutrition: गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उत्पादन प्रक्रियेतील आव्हाने

Animal Feed Production: शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, चारा निर्मिती, पशुखाद्य निर्मिती असे अनेक व्यवसाय केले जाऊ शकतात. प्रत्येक व्यवसायातील आव्हाने ही खरे तर संधी असतात. परंतु या संधीचे सोने करण्यासाठी विश्‍लेषणाची गरज असते.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

डॉ. लिंबाजी साळवे

Animal Feed Challenges: बारा महिने एकसारख्या चांगल्या गुणवत्तेचा कच्चा माल पशुखाद्य प्रक्रिया उद्योगांना पुरेशा प्रमाणात व योग्य दरात मिळत नाही. हंगामानुसार शेतकरी त्यांच्या शेतात तयार झालेला माल, योग्य प्रक्रिया करून थेट बाजारपेठेत विक्री करतात. हाच माल स्टॉकिस्ट / ट्रेडर्स साठवणूक करतात. कच्च्या मालाचा तुटवडा असताना किंवा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दर लावून विकतात. शेतकरी, पशुखाद्य उद्योग यांनी एकमेकांशी वार्षिक किंवा हंगामानुसार करार करून कच्चा माल व पक्का माल यांची देवाणघेवाण केली तर जो नफा स्टॉकिस्ट, ट्रेडर्स कमवतात तो दोघांनाही विभागून मिळू शकतो.

किमतीतील चढ - उतार

पशुखाद्यात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वर्षातून अनेकदा चढ - उतार येतात. कच्च्या मालाचे दर कमी झाले तर पशुखाद्य निर्माण करणाऱ्या बहुतांशी कंपन्या पशुखाद्याचे दर कमी करतात. कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली असेल तर पशुखाद्य निर्माण करणाऱ्या बहुतांशी कंपन्या पशुखाद्याची गुणवत्ता चांगली ठेवता यावी म्हणून पक्क्या मालाचे दर वाढवतात. वर्षभर कमी जास्त होणारे दुधाचे दर आणि पशुखाद्य निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालांचे दर यामध्ये शक्यतो काहीही साम्य किंवा संबंध नसतो.

फीड फॉर्म्यूलेशन

व्यावसायिक विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी (आरोग्य, दूध, अंडी, मटण, चिकन इत्यादी) गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इत्यादी पशू-पक्ष्यांचे साध्य परिस्थितीत, भौगोलिक परिस्थितीचा तसेच व्यवस्थापन याचा अभ्यास करून त्यांच्या वयोगटानुसार खाद्य तयार करण्यासाठी आवश्यक सर्व कच्चा माल आणि पूरक घटक यांचे प्रमाण निश्‍चित केले जाते.

फीड फॉर्म्यूलेशन अनुसार उत्पादन प्रक्रियेत सुनिश्‍चित मापदंड वापर करून कुशल आणि अनुभवी ऑपरेटर आणि गुणनियंत्रण अधिकारी यांच्या देखरेखीखाली पक्का माल तयार केला जातो.

Animal Husbandry
Animal Feed Management : आहारातील थोडासा बदल उन्हाळ्यातही टिकवून ठेवेल गाय, म्हशीचं दूध

शेतकरी त्यांच्या गोठ्यामध्ये संगोपन करीत असलेल्या विशिष्ट प्रजातींचे खाद्याच्या माध्यमातून योग्य पोषण केले जाईल. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न कमीत कमी खर्चात साध्य होईल हे पहिले जाते.

गोठापातळीवर व्यवसायपूरक आधुनिक ज्ञानाचा अभाव आणि पारंपरिक खाद्याचा आजही अवलंब हे पशुखाद्य उद्योगासमोरील मोठे आव्हान आहे.

परवाने, कायदे, नियम, मार्गदर्शक तत्त्वे

पशुखाद्य व्यावसायिक परवाने, उभारणी, प्रक्रिया, विपणन आणि व्यवस्थापन यासंबंधी बाहेरच्या देशात शासकीय यंत्रणेमार्फत पूर्ण मार्गदर्शन / प्रशिक्षण दिले जाते, वेळेत सर्व मदत केली जाते.

आपल्या देशाचा विचार करता याबाबतची शासकीय धोरणे वेळखाऊ आणि उदासीन दिसतात. उद्योगांना उभारी मिळेल अशा मूलभूत सुविधा आणि त्याबरोबर व्यवसाय प्रक्रियेशी संबंधित शासकीय परवाने, कायदे, नियम, मार्गदर्शक तत्त्वे यांचे शिक्षण / प्रशिक्षण आणि आर्थिक मदत वेळेत मिळणे अपेक्षित आहे.

भेसळ आणि अन्न सुरक्षा

कच्च्या मालामध्ये सहेतुक पैसे कमविण्यासाठी काही लोक / व्यापारी वर्ग भेसळ करतात, असा खराब कच्चा माल गुणनियंत्रण विभाग तपासणी करून नाकारतात.

कच्चा माल प्रक्रिया, साठवणूक व हाताळणी हे शास्त्रीय पद्धतीने होत नाही. पशुधन संगोपन करीत असताना जाणते- अजाणतेपणे प्रतिजैविकांचा अतिवापर, बारा महिने मायकोटॉक्सिनचा प्रादुर्भाव दिसतो.

जागतिक तापमान वाढ होत असल्यामुळे अचानक बदलणारे ऋतू, वाढणारे संसर्गजन्य आजार, पीक लागवड पद्धतीमध्ये होणारे बदल आणि अनियंत्रित कीटकनाशक व तणनाशक यांचा वापर, माणसांच्या जीवनशैलीत झालेले बदल आणि त्यामुळे एकूणच आरोग्यास गंभीर धोके निर्माण होत आहेत. निसर्गातील सजीवांची अन्नसाखळी सुरक्षितता यासाठी वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Animal Husbandry
Animal Feed Management : चांगलं आरोग्य, दूध उत्पादनासाठी जनावरांना द्या गोळीपेंड

वीज, ऊर्जेचा वापर

खाद्य प्रक्रियेमध्ये अनेक यंत्रांचा वापर केला जातो, यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर होत असतो. पशुखाद्य निर्मिती उद्योगांना अखंडित पुरेशी ऊर्जा मिळणे हे मोठे आव्हान आहे.

अनेक प्रगतशील उद्योजक ऊर्जेचा वापर व पर्यावरणाची काळजी म्हणून सध्या सोलर पॅनेल निर्मित ऊर्जा वापर करीत आहेत यामध्ये शासकीय पातळीवरती उद्योगांना उभारी मिळेल व मदत मिळेल अशी धोरणे समाविष्ट करणे गरजेचे आहे.

पशुखाद्य प्रक्रिया, पशुधनाचे आरोग्य

पशुखाद्य प्रक्रियेत गुणवत्ता मानके ठरवून त्या कार्यप्रणालीचा सातत्याने अवलंब केला जात आहे. गुणवत्ता विभाग कायम दक्ष राहून पशुखाद्य प्रक्रियेची काळजी घेत असतात. पशुखाद्य प्रक्रियेत सर्व आवश्यक जैवसुरक्षा उपाययोजनांचा अवलंब केला जातो.

कंपनी बाहेर, रोग प्रसारासाठी संभाव्यतः वाहक म्हणून काम करणाऱ्या सर्व घटकांवर नियंत्रण ठेवणे हे आव्हानात्मक वाटते, परंतु आज प्रगतिशील शेतकरी जैवसुरक्षिततेबाबत जागृत आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहेत, ही खरी जमेची बाब आहे.

जागतिक व्यापार आणि जैवसुरक्षा

आंतरराष्ट्रीय व्यापार जैवसुरक्षेशी संबंधित नवीन नवीन आव्हाने समोर येत आहेत. आयात केलेल्या घटकांद्वारे नवीन रोग आणि दूषित घटक आपल्याकडे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी शासकीय पातळीवर तपास यंत्रणा आणि तपासणीसाठी लागणाऱ्या आधुनिक सुविधा (लॅब) आवश्यक आहेत.

कामगारांची कमतरता

कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया चालण्यासाठी कुशल कामगार आवश्यक आहेत. कामगारांची कमतरता उत्पादन आणि एकूण गुणवत्तेवर परिणाम करू शकते.

शिक्षण (पदवी / पदविका) हे कोणत्याही शाखेचे असले तरी किमान शेवटचे एक वर्ष व्यवसायभिमुख ज्ञान आणि प्रशिक्षण देऊन पात्र विद्यार्थ्यांना पदवी / पदविका प्रमाणपत्र दिले जावे. जेणेकरून कोणी बेरोजगार राहणार नाही आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत राहील.

Animal Husbandry
Animal Husbandry: "स्थानिक पशुजातींचा विकास: महाराष्ट्राच्या पशुपालनाची नवी दिशा"

गुणवत्ता मानके

कोणताही व्यवसाय सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्माण केल्याशिवाय वाढू शकत नाही. पक्क्या मालाच्या गुणवत्तेची मानके सुनिश्‍चित करत असताना त्यास लागणार कच्चा माल पुरवठा / प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना या प्रवाहात आणण्याचे काम झाले पाहिजे तरच अपेक्षित परिणाम भेटू शकतील.

असंघटित क्षेत्र

बहुतांश पशुखाद्य उद्योजक हे एकमेकांस स्पर्धक समजतात. त्यामुळे आधुनिक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान, गुणवत्ता, दर आणि दुग्ध व्यवसायास पूरक अशा सेवा याचा स्थानिक पातळीवर विरोधाभास जाणवतो.

एक गुणवत्ता- एक दर असे सर्वांचे धोरण असणे अपेक्षित आहे. संघटितपणे काही व्यवसायपूरक नियमावली बनवून सर्वांनी एकमताने निर्णय घेतले गेले तर खऱ्या अर्थाने हे क्षेत्र विकसित होईल.

मळी

पशुखाद्य निर्मितीमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे मळी. आज अनेक व्यवसायांसाठी मळी हा मुख्य कच्चा माल आहे. त्यामुळे अगदी साखर कारखाने चालू असतानादेखील पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांना जास्त किंमत देऊनही चांगली मळी मिळणे कठीण होत आहे.

पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांना त्यांच्या वार्षिक आवश्यकतेनुसार (ठरावीक कोटा) मळी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवरती मदत होणे अपेक्षित आहे.

आयात / निर्यात धोरण

कृषी, पशुधन, पशुखाद्य क्षेत्राशी निगडित कच्चा माल आणि पक्का माल आयात - निर्यात धोरणे यामध्ये व्यवसाय पूरक धोरणांमध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. किंबहुना, स्टॉकिस्ट / ट्रेडर लॉबी यांचा मार्केटवरती जास्त प्रभाव जाणवतो.

पर्यावरणावरणावर परिमाण

पशुखाद्य प्रक्रियेतील टाकाऊ आणि उप उत्पादनांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत किंवा तत्सम शासकीय विभागाकडून उद्योगांना विशेष काही मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळत नाही. उद्योग धंद्यातील सांडपाणी, घण कचरा व टाकाऊ पदार्थ यांच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या खाजगी उद्योगांना चालना देऊन पर्यावरणाचे हित साधले जाऊ शकते.

पर्यावरणात होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी सामुदायिक सहभाग व कडक नियमांची अंमलबजावणी आवश्यक वाटते.

अनुत्पादित, कमी उत्पन्न देणारे पशुधन

ज्या पशुधनाची आनुवंशिक उत्पादन क्षमता कमी आहे असे पशुधन आपल्याकडे संख्येने खूप जास्त आहे. अनुत्पादित किंवा कमी उत्पादन देणारे पशुधन यास शासकीय / खासगी गोशाळा अथवा तत्सम सुविधा मिळाल्यास त्यांचे योग्य संगोपन होऊ शकते.

आपल्याकडील जनावरांची दूध उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च याचे गणित जुळत नाही आणि त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे पशुखाद्य मार्केटमध्ये उपलब्ध पूर्णमात्रेत असूनही दिले जात नाही.

परदेशात चांगल्या आनुवंशिक क्षमता, जास्त दूध देणाऱ्या पशुधनाचे चांगले आहार व्यवस्थापन व संगोपन केले जाते. त्यामुळे तो दूध व्यावसायिक बारा महिने चांगला नफा कमवू शकतो.

गुणवत्तापूर्ण दूध निर्मितीसाठी चांगली आनुवंशिक क्षमता असलेले पशुधन, उच्च गुणवत्तेचे पशुखाद्य, हिरवा / सुका चारा, जंतनिर्मूलन, लसीकरण आणि ऋतुमानानुसार योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

पशुवैद्यकीय सेवा

शासकीय नियमाप्रमाणे आज पशुधनाच्या ठरलेल्या संख्येच्या प्रमाणात ग्राम पातळीवरती सेवा देण्यासाठी पशुवैद्यकांची संख्या खूप कमी आहे.

पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण, जंतनिर्मूलन, उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आनुवंशिक सुधार कार्यक्रम, प्रजनन सुधार कार्यक्रम, नवजात वासरू संगोपन, आहार व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, ऋतुमानानुसार गोठ्याचे व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थकारण याची शास्त्रशुद्ध माहिती व अंमलबजावणीची गरज आहे.

डॉ. लिंबाजी साळवे, ८३९०५८३९९९

(लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com