
अमरावती : आजारी मेंढीच्या रक्ताचे नमुने घेऊन अहवाल मात्र शेळीचा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या अनागोंदीमुळे आजारी शेळी दगावल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्याने थेट पोलिस ठाण्यात केली आहे.
चांदूरबाजार येथील शेतकरी रविकिरण पाटील हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी (Goat) व मेंढीपालन (Sheep Rearing) करतात. मेंढी आजारी असल्याने त्यांनी याबाबत पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. पशुसंवर्धन विभागातर्फे अकोला येथील विभागीय प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांकडून मेंढीचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यानंतर पुणे येथील प्रयोगशाळेकडे हे नमुने पाठवण्यात आले.
त्यापूर्वीच शेळीच्या आजारपणाचे निदान होत उपचार सुरू व्हावे, या हेतूने व्हॉट्सॲपवर पाटील यांना अहवाल पाठविण्यात आला. अकोला येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने तपासून अहवाल देण्यात आला होता. मात्र पशुसंवर्धन विभागाने मेंढीचे सोडून त्यांना चक्क सुदृढ असलेल्या शेळीचा अहवाल दिला. परिणामी, आजारी मेंढीवर उपचार करणे त्यांना शक्य झाले नाही. याच दरम्यान ही मेंढी दगावली.
माडग्याळ जातीची ही मेंढी (Sheep) सर्वांत महागडी ओळखली जाते. या मेंढीची किंमत एक लाख रुपये आहे. पशुसंवर्धन विभागाची अनागोंदी मेंढीच्या मृत्यूस कारणीभूत आहे. दोषींवर कारवाई करून भरपाईपोटी एक लाख रुपये मिळावेत, अशी मागणी पाटील यांनी केली.
चांदूरबाजार पोलिस ठाण्यात या संदर्भाने रीतसर तक्रारही नोंदविण्यात आली आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते वर्ग एकचे अधिकारी असल्याने चौकशी शिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे चांदूरबाजार पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
चांदूरबाजार येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. पेठे यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी पाटील यांच्या फार्ममधून कोणत्या जनावरांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या विषयीची माहिती पशुधन अधिकाऱ्याकडून घेतल्यानंतर नेमके सांगता येईल, असे उत्तर दिले.
मुजोर आणि निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांकडून कामात हलगर्जीपणा वाढीस लागला आहे. कसेही काम केले तरी आमचे काहीच कोणी बिघडवू शकत नाही, अशी त्यांची भावना आहे. त्याचाच परिणाम मेंढीच्या रक्ताचे नमुने घेत शेळीचा अहवाल देण्याचा प्रकार घडला.
रविकिरण पाटील, शेतकरी, चांदूरबाजार, अमरावती
रविकिरण पाटील यांच्याकडील मेंढीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. मात्र शेळीचा अहवाल कसा दिला गेला? ही बाब तपासावी लागेल. त्यानंतरच खरे कारण कळेल.
डॉ. श्रीकृष्ण धुळे, सहाय्यक आयुक्त,विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.