Animal Health : जिवाणूंकडून प्रतिजैविकांना वाढतोय प्रतिरोध

Antibiotics for Animal : रोगकारक जिवाणू जेव्हा औषधांना अधिकाधिक प्रतिरोधक बनतात, तेव्हा त्यांची वाढ कमी करण्यास किंवा थांबविण्यासाठी प्रतिजैविक औषधे निष्प्रभ होतात.
Animal Health
Animal HealthAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रशांत म्हसे, डॉ. पी. डी. पवार, डॉ. डी. एम. मुगळीकर

Animal Care : जनावरांमध्ये जिवाणूंमुळे अॅक्टिनोबॅसिलोसिस, अॅक्टिनोमायकोसिस, ॲंथ्रेक्स, बॅसिलरी व्हाइट डायरिया, ब्राक्सी, बोटुलिझम, बोट्रिओमायकोसिस, बंबल फूट, संसर्गजन्य गर्भपात, घटसर्प हे संसर्गजन्य आजार होतात.

यातील बरेचसे जिवाणू अन्न साखळी आणि संसर्गाद्वारे मानवामध्ये संक्रमण करतात. जिवाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर सुरू झाला. प्रतिजैविक हा जैव रासायनिक पदार्थ जिवाणूंच्यावाढीस प्रतिबंध करतो. प्रतिजैविकांचा वापर मानवी आणि पशुवैद्यकीय औषधांमध्ये केला जातो.

ही औषधे आजारी जनावरांना तोंड किंवा शरीरामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी दिले जाऊ शकतात. प्रतिजैविकांचा वापर उपचार आणि आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केला जातो. तसेच काही पशू, पक्ष्यांमध्ये शारीरिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी केले जाते.

प्रतिजैविकांचा जिवाणूवरील परिणामकारक प्रभाव आणि त्या अनुषंगाने जिवाणूंमुळे होणाऱ्या आजारांचे नियंत्रण शक्य झाले आहे. प्रतिजैविक प्रतिरोध कार्य प्रणाली समजण्यासाठी प्रतिजैविक जिवाणू विरुद्ध कसे कार्य करते हे जाणून घेणे आवश्यक आहे.

प्रतिजैवक पेशीभित्तिका तयार होण्यापासून प्रतिबंधित करते, प्रथिने संश्‍लेषण प्रतिबंधित करते, न्यूक्लिक अॅसिड संश्‍लेषणात व्यत्यय आणते. आवरण अखंडतेत व्यत्यय येतो. चयापचय मार्गात हस्तक्षेप केला जातो. प्रतिजैविक चयापचयरोधी म्हणून कार्य करते. सल्फा औषधे जिवाणूच्या चयापचयात हस्तक्षेप करतात, फोलेट संश्‍लेषणास प्रतिबंध करतात.

Animal Health
Animal Health : थंडीच्या काळात दुभत्या गाई, म्हशींकडे लक्ष द्या...

जिवाणू प्रतिरोधक क्षमता

जिवाणू जेव्हा औषधांना अधिकाधिक प्रतिरोधक बनतात, तेव्हा सूक्ष्मजीवांची वाढ कमी करण्यास किंवा थांबविण्यासाठी प्रतिजैविक औषधे निष्प्रभ होतात. यामुळे मनुष्य आणि जनावरांमधील संक्रमणांवर उपचार करणे अधिक कठीण होते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जर प्रतिजैविकांच्या योग्य वापरावर वेळीच निर्बंध घातले नाही तर पुढील काही वर्षांत जिवाणूंच्या संसर्गाने आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. जिवाणूमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध आंतरिक (नैसर्गिक) आणि अधिग्रहित (कृत्रिम) प्रकारचा असतो.

नैसर्गिक प्रतिरोध

काही जिवाणू प्रजातींमध्ये प्रतिजैविक प्रतिरोध सहज नैसर्गिकरीत्या व्यक्त होतो.

प्रतिजैविकाच्या एखाद्या वर्गप्रकाराची प्रतिकार करण्याची जिवाणूची जन्मजात क्षमता असू शकते. जिवाणूची स्वसंरक्षणार्थ प्रतिकारामध्ये वापरली जाणारी यंत्रणा कार्यान्वित होते.

बाह्य आवरणाची पारगम्यता कमी होते. त्यामुळे प्रतिजैविक जिवाणूच्या आत जाऊ शकत नाही.

जिवाणू पेशीतील ज्या भागात प्रतिजैविक प्रहार करणार असते त्याच्या संरचनेत जिवाणू बदल घडतात. त्यामुळे प्रतिजैवक निष्प्रभ होतात.

जिवाणूमधील नैसर्गिक क्रिया प्रतीजैविकास पेशी बाहेर फेकण्यास मदत करते.

जिवाणू स्वतःच्या चयापचय पद्धतीत बदल करतात, त्यामुळे काही प्रतिजैवक निष्फळ ठरतात.

अधिग्रहित कृत्रिम प्रतिरोध

नैसर्गिकरीत्या अतिसंवेदनशील सूक्ष्मजीव औषधाने प्रभावित न होण्याचे मार्ग इतर जिवाणू/विषाणूकडून मिळवितात.

जनुकीय परिवर्तन, संक्रमण तसेच जिवाणू स्वत:च्या डीएनएमध्ये उत्परिवर्तन घडवून आणतात.

आनुवंशिक उत्परिवर्तन

जिवाणू त्यांच्या डीएनएमध्ये उत्स्फूर्त उत्परिवर्तन करू शकतात, ज्यामुळे जिवाणूच्या पेशीय घटकांची संरचना किंवा कार्यात बदल होतात. यातून प्रतिकार क्षमता वाढते.

जनूक हस्तांतर

जिवाणू एकतर इतर जिवाणूच्या संपर्काद्वारे प्रतिकारक्षम जनुके हस्तांतरित करू शकतात. या प्रक्रियेत दाता जिवाणूकडून प्रतिरोधक जनुके वाहून नेणारे प्लास्मिड (लहान, वर्तुळाकार डीएनए रेणू) प्राप्तकर्त्या जिवाणूमध्ये हस्तांतरित केले जातात.

जिवाणू वातावरणातून मुक्त डीएनए

घेऊ शकतात, ज्यात प्रतिकारक जनुकांचा समावेश असू शकतो. यातून प्रतिकारक्षमता वाढते.

जिवाणूंना संक्रमित करणारे विषाणूंच्या संसर्गाच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिरोधक जनुकांसह जिवाणूचा डीएनए एका जिवाणूपासून दुसऱ्या जिवाणूपर्यंत नेऊ शकतात.

संयुग निष्क्रियता

प्रतिजैविकामध्ये फेरबदल करता येतील अशी संयुगे जिवाणू तयार करू शकतात किंवा त्यांना संपूर्ण नष्ट करतात, ज्यामुळे ते अकार्यक्षम होते. उदाहरणार्थ, काही जिवाणू बीटा लॅक्टमेस संयुग तयार करतात, जे पेनिसिलिनसारख्या बीटालॅक्टम प्रतिजैवकावर परिणाम करते.

Animal Health
Animal Care : पुणे जिल्ह्यात राबविणार गायी, म्हशीमधील वंधत्व निवारण मोहीम

प्रतिजैविक निर्मूलन

जिवाणूमधील काही उत्सर्जन क्रियेच्या माध्यमातून पेशीतून प्रतिजैविकांस सक्रियपणे बाहेर फेकले जाते. पेशीच्या आत त्यांची साठवण कमी झाल्याने त्यांचा प्रभाव आपोआपच कमी होतो.

पेशीमधील घटकांच्या संरचनेत बदल

जिवाणू प्रतीजैविकाचे लक्ष असणाऱ्या पेशीय घटकांची संरचना बदलू शकतात. प्रथिने किंवा इतर रेणूंच्या संरचनेतील बदलांद्वारे हे साध्य केले जाऊ शकते, ज्यामुळे प्रतिजैविके निष्फळ ठरतात.

बायोफिल्म निर्मिती

जिवाणू एखाद्या पृष्ठभागावर वाढत असताना एकमेकांना चिकटून एक प्रकारचे आवरण तयार करतात याला बायोफिल्म म्हणतात. बायोफिल्म्समधील जिवाणू बऱ्याचदा मुक्त तरंगत्या जिवाणूंपेक्षा प्रतिजैविकास अधिक प्रतिरोधक असतात. बायोफिल्म औषधांचा प्रवेश रोखते.

अनुकूल प्रतिरोध

जिवाणू प्रतिजैविकाच्या संपर्कात येण्याच्या अगोदर तात्पुरती शारीरिक स्थिती बदलून अनुकूल प्रतिकारता दर्शवू शकतात. यामुळे उपचाराचा प्रभाव कमी प्रमाणात दिसतो.

अवस्थेत तात्पुरता बदल

काही जिवाणू अशा अवस्थेत जातात, की त्यांचावर प्रतिजैविकांचा परिणाम दिसत नाही.

‘एएमआर’ समजून घेताना...

जेव्हा जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी यांसारखे सूक्ष्मजीव औषधांशी जुळवून घेतात तेव्हा अँटिमाइक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) दिसून येतो. त्यामुळे ते कमी प्रभावी किंवा पूर्णपणे अकार्यक्षम होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे, की गेल्या काही वर्षात संसर्गाचा वाढता प्रभावामुळे आजारावर उपचार करण्याची आपली क्षमता धोक्यात आली आहे, ज्यामुळे जीवन आणि आरोग्य सेवा व्यवस्था संकटात आहे.

संसर्गास कारणीभूत सूक्ष्मजंतू प्रतिकार विकसित करतात, आपले शरीर नाही. जागतिक आरोग्य संघटनेने ‘एएमआर' ला २०१९ मध्ये महत्त्वाच्या दहा जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक आव्हान म्हणून घोषित केले आहे. एएमआर संक्रमणांवर उपचार करण्यास जास्त वेळ लागतो, वैद्यकीय खर्च जास्त असतो.

एएमआर नैसर्गिक उत्क्रांती आणि आनुवंशिक बदलांमुळे हळूहळू विकसित होते. मनुष्य आणि जनावरांच्यामध्ये आजार संक्रमित होतात. अन्न, वनस्पती आणि पर्यावरण (विशेषत: पाणी आणि माती) दूषित होते. अँटिमाइक्रोबियलचा अतिवापर आणि गैरवापर एएमआरच्या विकासास गती देते.

‘एएमआर' टाळण्याचे उपाय

प्रतिजैविकांचा जबाबदारीने वापर करावा. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापर करावा.

शिल्लक प्रतिजैवक कधीही वापरू नका किंवा सामाईक वापर करू नका. आपले हात स्वच्छ ठेवून संसर्ग टाळावा.

खोकला, शिंकण्याच्या शिष्टाचाराचे पालन करून हानिकारक संसर्गाचा प्रसार रोखावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com