Animal Record Keeping : व्यवसायवाढीसाठी जनावरांची नोंदणी महत्त्वाची...

चांगल्या पशुधन व्यवसाय व्यवस्थापनासाठी नोंदी ठेवणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांच्या ओळखीसाठी प्राथमिक नियोजन आवश्यक आहे.
Animal Record
Animal RecordAgrowon

डॉ.जी.एस.सोनवणे, डॉ.विद्या निंबाळकर

प्रत्येक पशुपालकाने यशस्वी दुग्धव्यवसायासाठी (dairy business) वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत. यामध्ये पशुधनाची ओळख, आर्थिक नोंदी, उत्पादन नोंदी, आरोग्य नोंदी, कृषी निविष्ठा, पशुखाद्यांच्या (Animal Feed) नोंदी, दैनंदिन शेतीच्या नोंदी (Agricultural Record), शेतीची अवजारे आणि उपकरणे, कामगार आणि वाहनांच्या नोंदी अत्यावश्यक आहेत.

या सर्व नोंदी आर्थिक नियोजन निर्णयांमध्ये मदत, प्रशासकीय आणि विस्ताराच्या उद्देशांसाठी माहिती प्रदान करण्यासाठी, पशुधन व्यवस्थापन (Animal Management) निर्णयांमध्ये मदत करण्यासाठी आणि डेअरी फार्मच्या (Dairy Farm) एकूण मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त असतात.

सर्व परिस्थितीसाठी कोणतीच सर्वोत्तम नोंदी ठेवण्याची प्रणाली नाही, परंतु, डेअरी फार्मतील नोंदणी प्रणालीतून अचूक आणि आवश्यक माहिती उपलब्ध झाली पाहिजे, फार्मच्या नियोजनामध्ये बसणारी पाहिजे. निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी फार्ममध्ये उपलब्ध असली पाहिजे.

पशुपालन अत्यंत स्पर्धात्मक बनल्यामुळे पशू उत्पादनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी संशोधनावर अधिक भर दिला जात आहे. जनावरांची योग्य निवड ही दुग्धव्यवसायातील पहिली महत्त्वाची पायरी आहे.

पशुधनाची नोंदी, ज्याचा उपयोग डेटा मायनिंगआधारित जनावरांच्या मूल्यमापनात केला जाऊ शकतो, प्रजनन कार्यक्रम किंवा नवीन डेअरीच्या उत्कृष्ट जनावर निवडीचा आधार बनू शकतात.

शाश्वत दुग्धव्यवसायासाठी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, उत्तम आरोग्य आणि चांगली उत्पादकता यासाठी पशुपालन पद्धतींमध्ये सर्वसमावेशक निर्णय प्रक्रिया आवश्यक असते.

१) सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगद्वारे आपल्याला फार्मवरील प्रत्येक जनावराचा समावेश असलेला डेटाबेस तयार करावा. डेटा मायनिंग तंत्र आणि निर्णय प्रणाली वापरून डेटाबेसचा योग्य वापर करावा.

जेव्हा डेअरीमधील महत्त्वाच्या व्यवस्थापन पद्धतीबाबत चर्चा केली जाते, तेव्हा बहुतेक वेळा, नोंदी आणि त्यांची देखभाल याकडे दुर्लक्ष केले जाते.

याची कारणे म्हणजे विविध प्रकारच्या नोंदींची माहिती नसणे, नोंदींची देखभाल आणि एकूण डेअरी फार्मच्या कामकाजाच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबत अंमलबजावणी होताना दिसत नाही.

२) दुग्धशाळा व्यवस्थापनात जनावरांच्या विविध नोंदी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि डेअरी फार्मच्या नफ्यात सुधारणा करू शकतात.

जनावरांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत नोंद महत्त्वाची असते. त्यानंतर ती एक ज्ञानाचा स्रोत म्हणूनही काम करते.

३) मोठ्या कळपात वासराला चिन्हांकित करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे जन्माचा पहिला आठवडा. डेअरी फार्मच्या नोंदी थेट संगणकात ठेवता येतात.

४) जर पशुपालकांकडे जनावरांची संख्या कमी असेल, तर प्रत्येक जनावर ओळखणे आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे ठेवणे शक्य आहे.

मात्र आधुनिक पध्दतीचा अवलंब करणाऱ्या मोठ्या संख्येच्या जनावरांच्या फार्ममध्ये संगोपनासाठी जनावरे ओळखण्यासाठी विशिष्ट पद्धत असणे आवश्यक आहे.

Animal Record
Dairy : रत्नागिरीत शासकीय दूध डेअरी बंद

जनावरांसाठी ओळख चिन्हाचे महत्त्व:

१) जनावरांचे प्रजनन, वासराची नोंदणी, मृत जनावर / वासराचे तपशील, जनावरांचे उपचार, जनावरांच्या दुग्ध उत्पादनाची नोंदणी महत्त्वाची आहे. मोठ्या प्रमाणावर दैनंदिन कामकाजासाठी सर्व प्रकारच्या पशुधनाची ओळख सहज शक्य होते.

२) जनावरांची नोंदणी आणि विमा पॉलिसीसाठी जनावरे ओळखणे आवश्यक आहे.

३) कमीत कमी नफा देणाऱ्या गाई,म्हशींना कळपातून काढण्यासाठी, सर्वात कार्यक्षम उत्पादनासाठी खाद्य, जास्तीत जास्त उत्पन्नासाठी अचूक व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी आणि परतावा देणारे जनावर निवडण्यासाठी नोंद महत्त्वाची ठरते.

कळप बदलणे, प्रजननासाठी सर्वात जास्त आनुवंशिक उत्पादन क्षमता असलेले जनावर निवडण्यासाठी उपयुक्त आहे.

४) डेटा रेकॉर्डिंगसाठी अनेक प्रकारची सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत, परंतु ती सर्वच आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सोईची नाहीत. पशुपालकाने गरजेला अनुकूल असा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम निवडावा.

५) नोंदीमुळे व्यवस्थापनातील मजबूत आणि कमकुवत मुद्दे निश्‍चित करता येतात. ही तुलना त्यांच्या कळप व्यवस्थापनामध्ये सर्वांत जास्त सुधारणा करण्यास फायदेशीर ठरते.

जनावरांना नोंदणी क्रमांक ः

१) सध्या भारत सरकार पशुधनविषयक माहिती संबंधी डेटा बेस तयार करीत आहे. यासाठी राष्ट्रीय गोकूळ मिशन आणि राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाद्वारे पशुधनामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.

केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जवळपास ५० कोटींपेक्षा अधिक पशुपालकांना एक विशेष आयडी दिला जाणार आहे.

२) देशातील प्रत्येक जिल्ह्यातील पशुधनाची माहिती उपलब्ध होण्यासाठी जनावरांची ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून सुरु आहे.

या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इनाफ’ (इन्फॉर्मेशन नेटवर्क फॉर प्रॉडक्टिव्हिटी ॲड हेल्थ) या प्रणालीत जनावरांचे टॅगिंग केले जात आहे. जनावरांची बिल्ले लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

३) प्रत्येक गाय, म्हशींसाठी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक दिलेला आहे. त्याचा फायदा असा होईल, की पशुपालक आपल्या घरी बसून सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या जनावरांविषयी माहिती प्राप्त करू शकतात तसेच जनावरांचे लसीकरण, आरोग्य चिकित्सा इत्यादी सगळ्या प्रकारची कामे करणे फार सोपे होणार आहे.

४) जनावरांच्या कानात पिवळा बिल्ला लावतात. त्यावर १२ अंकी एक विशिष्ट आधार क्रमांक आहे. पॉली युरिथीनपासून बनवलेला हा टॅग वर्षानुवर्षे टिकतो.

संबंधित गाय किंवा म्हशीला एकदा टॅगिंग केल्यानंतर संपूर्ण माहिती संगणकात भरली जाते. संबंधित जनावराची विक्री झाल्यानंतरही नवीन ठिकाणी या जनावरासंदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. गाई, म्हशींनंतर शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठीही हे आधार कार्ड तयार करण्यात येणार आहे.

नोंदींचे फायदे ः

१) जनावरांचे वय आणि जात ओळखणे सोपे जाते.

२) जनावराच्या आजाराची नोंद कळते.

३) खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जनावरांचा मालकी हक्क दाखविण्यासाठी उपयोग करता येतो.

४) या उपक्रमामध्ये देशातील जनावरांची माहिती ऑनलाइन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये संबंधित क्रमांकाच्या जनावराची स्थिती काय आहे? याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

Animal Record
Indian Dairy Festival : कोल्हापुरात शुक्रवारपासून इंडियन डेअरी फेस्टिव्‍हल

देशातील विविध जनावरांच्या नोंदी ः

भारतात पशूंच्या २१२ जाती नोंदणीकृत आहेत. यामध्ये राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन संस्थेकडे देशी गाईच्या ५३, म्हशीच्या २०, शेळ्यांच्या ३७ आणि मेंढीच्या ४४ जाती आहेत.

महाराष्ट्रातील गोवंशाचा विचार करता खिल्लार, डांगी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, कोकण कपिला आणि कठानीचा समावेश आहे. म्हशीच्या जातीमध्ये पंढरपुरी, नागपुरी, मराठवाडी आणि पूर्णाथडी यांचा समावेश आहे.

शेळीच्या उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी आणि कोकण कन्याळ आणि मेंढीची डेक्कनी जातीचा समावेश आहे.

संपर्क ः डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com