Rural Enterpreneurship: छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस खात्यामध्ये कार्यरत असणारे कैलास रामलाल कच्छवा यांनी नोकरी सांभाळून शेती आणि शेळीपालनाची आवड जोपासली आहे. गोळेगाव (ता. खुलताबाद) शिवारात त्यांनी वडील आणि भाचा राहुल पुऱ्हे यांच्या साथीने व्यावसायिक पद्धतीने शेळीपालनाचे मॉडेल उभारले आहे. शेतीमधील आनंद जपत कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव (ता. खुलताबाद) येथील रामलाल कोंडाजी कच्छवा यांना दोन मुले. त्यांपैकी मोठा मुलगा प्रकाश हा बोरगाव (ता. गंगापूर) येथील शाळेत शिक्षक आहे. लहान मुलगा कैलास हा २०१२ पासून छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस खात्यामध्ये कार्यरत आहे. रामलाल यांनी वीस वर्षांपासून घरच्या चार एकर शेतीला गावरान शेळीपालनाची जोड दिली आहे. शेती आणि शेळ्यांच्या संगोपनात लहानपणापासून कैलास हे सातत्याने वडिलांना मदत करायचे. त्यांनी गावरान शेळ्यांसाठी एक छोटेखानी शेड बांधले..शेळीपालनाची जोडसाधारणतः २०१७ पर्यंत रामलाल कच्छवा यांचे छोटेखानी पारंपरिक गावरान शेळीपालन सुरू होते. यादरम्यान त्यांचा मुलगा कैलास यांना आफ्रिकन बोअर शेळीपालनाबाबत माहिती मिळाली. त्यांनी विविध ठिकाणांहून बंदिस्त, अर्धबंदिस्त, मुक्त संचारपद्धतीने शेळीपालनाबाबत माहिती जाणून घेतली. शेळ्यांची चांगली वाढ, बाजारपेठेतील मागणी, दोन ते तीन पिले देण्याची क्षमता, चांगली मिळणारी वजनवाढ यामुळे आफ्रिकन बोअर शेळीपालन फायद्याचे ठरू शकते हे त्यांनी जाणले. रामलाल कच्छवा यांनी २०१७ मध्ये कैलासच्या सल्ल्याने आफ्रिकन बोअर जातीचा एक नर आणि एक मादी विकत घेतली. तेथूनच खऱ्या अर्थाने आर.के. बोअर गोट फार्मचा प्रवास सुरू झाला..Goat Farming : बंदिस्त शेळीपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर.जातिवंत पैदाशीवर भरकैलास कच्छवा यांनी बंदिस्त शेळीपालनात दोनच्या-चार, चारच्या-आठ, आठच्या- सोळा अशा करत टप्प्याटप्प्याने आफ्रिकन बोअर शेळ्यांची संख्या वाढवत नेली. गावरान शेळी तसेच आफ्रिकन बोअर शेळ्यांचे चांगले व्यवस्थापन ठेवले. त्यामुळे वजनदार करडे मिळू लागली. बोकड आणि करडांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांनी उत्तम दर्जाच्या आठ आफ्रिकन बोअर शेळ्या विकत घेतल्या. योग्य पद्धतीने पैदास धोरण राबवत त्यांनी आफ्रिकन बोअर शेळ्यांची संख्या दीडशेपर्यंत नेली आहे..शेळ्यांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी चार एकर क्षेत्रावर मका, मेथीघास, तुती, शेवरी, सुबाभूळ, मारवेल गवत, नेपियर गवताची लागवड केली आहे. मक्यापासून मूरघास तयार केला जातो. शेती बांधावर शेळ्यांना चारा म्हणून उपयोगी पडतील अशा झाडांची लागवड केली आहे. याशिवाय दरवर्षी पंधरा ते वीस टन वाळलेला चारा विकत घेतला जातो..शेळ्यांचे व्यवस्थापनशेळीपालन विस्तारत असताना अतिशय कल्पकतेने पंधरा गुंठ्यांत कच्छवा यांनी ३० बाय ४० फूट आणि ५० बाय ६० फूट शेड उभारली आहे. ३० बाय ४० फुटाचे शेड प्लॅटफॉर्म रूपात आहे. यामध्ये वरच्या बाजूला शेळ्यांचे संगोपन केले जाते. खालच्या कप्प्यात सुमारे १०० गावरान कोंबड्यांचे संगोपन केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार कोंबड्या आणि अंड्यांची विक्री केली जाते..दोन्ही शेड मिळून सुमारे १५ कप्पे आहेत. यामध्ये नर, मादी, आजारी शेळ्या तसेच पिल्लांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. शेडमध्ये पाण्याची सोय केली असून बसण्यासाठी लाकडी फलाट बसवलेले आहेत. शेडच्या बाहेर असलेल्या मोकळ्या कप्पात शेळ्यांना उन्हात बसण्याची सोय केली आहे. दर दोन, तीन वर्षानी पैदाशीचा बोकड बदलला जातो..Goat Farming: शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेळीपालनाकडे वळावे.शेळी, बोकडांची विक्री वीस किलो वजन झाल्यावर केली जाते. सरासरी हजार रुपये किलो या दराने विक्री होते. परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच मुंबई येथील व्यापारी शेळ्या, बोकडांची खरेदी करतात. दर महिन्याला एक लाखांची उलाढाल होते. यातून चारा, खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर खर्च केला जातो..आहार, आरोग्य नियोजनबंदिस्त शेळीपालनात आहार व्यवस्थापन करताना सकाळी मका व गोळी पेंड प्रति शेळी साधारणतः २५० ग्रॅम दिली जाते. त्यानंतर वाळलेला चारा दिला जातो. दुपारनंतर शेळ्यांना पोटभर हिरवा चारा दिला जातो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण केले जाते. योग्य व्यवस्थापनामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले आहे..शेतीमधून मिळते ऊर्जाशेती आणि शेळीपालनातील अनुभवाबाबत कैलास कच्छवा म्हणाले, की आठवड्यातून मिळणारी एक दिवसाची तसेच वर्षातून मिळणाऱ्या एकूण सुट्टीपैकी ८० टक्के सुट्ट्या शेतीकाम आणि शेळीपालनाच्या नियोजनासाठी देतो. सुट्टीच्या काळात आई, वडील आणि भाच्या सोबत शेतीमध्ये राबतो. यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते. नोकरी करताना येणारा ताण घालविण्यासाठी शेती मेहनत महत्त्वाची ठरली आहे. एक दिवसाचे श्रम नोकरीवर परत जाताना ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे अधिक जोमाने आणि आनंदाने कर्तव्य बजावता येते..भाचा सांभाळतो शेळीपालनकैलास कच्छवा हे छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस खात्यातील नोकरी सांभाळत वडिलांना सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ मदत करतात. शेळीपालन विस्तारत असताना २०२१ मध्ये त्यांचा भाचा राहुल लक्ष्मण पुऱ्हे हा त्यांच्या सोबत आला. राहुल हे इंजिनिअर असून खासगी कंपनीत नोकरी करायचे. परंतु नोकरीत त्यांचे मन न रमल्याने त्यांनी आजोबा रामलाल आणि मामा कैलास कच्छवा यांच्या शेळीपालनात पूर्ण वेळ लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेळीफार्मची संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी राहुल यांच्याकडे आहे. कैलास कच्छवा हे नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी गावी येऊन दिवसभर शेतीकाम आणि शेळीपालनाच्या नियोजनात सहभागी असतात. कैलास यांनी परिसरातील शेळीपालकांचा अभ्यास गट तयार केला आहे. यातून माहितीची देवाण घेवाण होते.- कैलास कच्छवा, ८८३०७२७५२४-- राहुल पुऱ्हे, ७०२०४०६१८५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.