Paithni Saree update : पैठणीचे माहेरघर असणाऱ्या येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे पुरुषांसोबतच काही महिला उत्पादक आणि विणकर म्हणून काम करतात. यामध्ये अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर, महिलांचा समावेश आहे. २०१९ साली महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांना बचतीचे महत्त्व समजले.
महिलांनी स्वयंसहायता गटाच्या निर्मिती करून सुरवातीला प्रतिसदस्य ११० रुपये भरून सदस्यत्व घेतले. प्रत्येक गटात १० सदस्या अशा पद्धतीने बाराहून अधिक महिला बचत गट स्थापन झाले. १२ डिसेंबर, २०१९ रोजी बचत गटातील सदस्या आणि गटाचे बँक खाते उघडले गेले. या माध्यमातून बचत बँकेत जमा करण्यासह देवाण घेवाण सुरु झाली.
आर्थिक बचत, व्यवहारामध्ये शिस्त लागली. ९ सप्टेंबर, २०२० रोजी सर्व समुहांचा एकत्रित यशोदीप महिला उमेद ग्रामसंघ’ स्थापन झाल्याने कामाचा विस्तार वाढला. ग्रामसंघाची स्थापना झाल्यानंतर स्थानिक संधी,अंगभूत असलेली कला यांचा मेळ घालून येवला पंचायत समितीअंतर्गत ‘उमेद’अभियानाच्या तालुका अभियान समन्वयक दीपिका जैन, प्रभाग समन्वयक शुभम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दिशा मिळाली.
काही महिला पैठणी हातमागाच्या मालक तर काही मजुरीने विणकाम करायच्या. त्यातूनच शिल्लक रकमेतून बचत करायला शिकल्या. या जमा बचतीच्या रकमेतून गटांतर्गत अर्थसाहाय्य केले जाऊ लागले. कच्चा माल खरेदी, मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी विनियोग होऊ लागला.
गावात स्थापन झालेल्या गटातूनच प्रतिमहिना प्रतिसदस्य १०० रुपये बचत सुरू झाली. त्यातून गटाकडे प्रति महिना १,००० रुपये बचत होऊ लागली. त्यातील १०० रुपये ग्रामसंघाच्या खात्यावर प्रत्येक गटाचे जमा होतात. सध्या ८० टक्के महिलांकडे स्वतःचे पैठणी उत्पादनासाठी हातमाग आहेत. या उपक्रमामध्ये दत्तकृपा, तुळजाभवानी, संतोषी माता, सदगुरू कृपा, आदर्श, विश्वशांती, समृद्धी, साईकृपा, जिजाऊ, श्रीगणेश, शिवशक्ती हे बचत गट सक्रिय आहेत.
पैठणी निर्मितीचे कौशल्य
गटातील महिलांनी उत्कृष्ट रेशीम, जर आणि पदरावरील आकर्षक व मनमोहक नक्षी असे पैठणी विणकामाचे कौशल्य मिळविले आहे. ग्रामसंघाच्या माध्यमातून पैठणी उत्पादनातील बारकावे, विक्री व बाजारपेठ यासंबंधी नव्याने माहिती मिळत आहे. पैठणीसोबत ब्लाऊज पीस, घागरा, शेरवानी आणि जॅकेटसाठी कापडनिर्मिती, शेले आदींचे उत्पादन घेतले जाते.
पैठणी विणण्यासाठी रेशीम काकडे भरणे, पदर काढणे, रंगकाम, नवीन पैठणी तयार करण्यापूर्वी सांधणी अशा कामांमध्ये महिला कार्यकुशल आहेत. ब्रोकेड व एक धोटी या प्रकारात मुनिया, ऑलओव्हर, हाप ऑलओव्हर अशा पैठणींचे विणकाम होते.
महिला मोर बांगडी, मोर पोपट, अस्वली अशा विविध नक्षीकामात पारंगत झाल्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पैठणी वस्त्रापासून विविध वस्तूंचे उत्पादन घेण्याचे प्रशिक्षण महिलांनी घेतले आहे.
कामकाजाचे काटेकोर नियोजन
प्रत्येक गटाचा अध्यक्ष आणि सचिव गटनिहाय कामकाज बघतात. बचत संकलन, व्यवहार व कर्ज नोंदी, अर्थसाहाय्य वितरण,वसुली, बँकभरणा, बँक कर्ज परतफेड, बँक व शासनाकडून मिळणाऱ्या योजनांबाबत गटातील सदस्यांशी समन्वय साधला जातो.
ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व लिपिक या सहभागी बचत गटांचे कामकाज,व्यवहार,बचत आढावा, कर्जवसुली आराखडा, गटातील समस्यांचे निराकरण, नवीन योजना व उपक्रमाची माहिती, यासह महिला आरोग्य,शिक्षण,स्वच्छता याबाबत मार्गदर्शन अशी कामे पाहतात.
सध्या जया जगदीश काटकर या ग्रामसंघाच्या अध्यक्षा आहेत, तर सचिव म्हणून कीर्ती नीलेश भरते, कोषाध्यक्ष निलोफर निसार शेख, लिपिक अफरीन शकील शेख या आहेत. ग्रामसंघस्तरावर समूह संसाधन व्यक्ती म्हणून ज्योती आंबापुरे या सर्व कामकाजाचा समन्वय आणि मार्गदर्शन ही जबाबदारी सांभाळतात.
ग्रामीण भागात संघटितपणे कामकाज, व्यावसायिक दृष्टिकोन रुजल्याने आत्मविश्वास वाढून महिला स्वावलंबी झाल्या. मुख्य सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या प्रवाहात आल्या. या व्यवसायासह काही महिला किराणा दुकान, ब्युटीपार्लर, शिवणकाम व्यवसाय करतात. एका गटामार्फत रेशन दुकान चालविले जाते.
व्यवसायाचे अर्थकारण
येवला शहरात अनेक घाऊक, किरकोळ विक्रेत्यांची दालने आहेत. याठिकाणी देशभरातील पर्यटक खरेदीसाठी येतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गटातील महिला विक्रेत्यांना पैठणी विणून देतात. काम घेतल्यानंतर महिलांना प्रत्येक हप्त्याला पैसे मिळतात. पैठणी स्वखर्चाने तयार करून विक्री केल्यास एकरकमी परतावा मिळतो. अधिक नक्षीकाम अधिक मजुरी असे सूत्र आहे.
ग्रामसंघातील काही गट जिल्हा व राज्य पातळीवरील प्रदर्शनात सहभागी होऊन विक्रीचे नियोजन करतात. दहा हजारांपासून ते तीन लाख किमतीच्या विविध श्रेणीतील पैठणीचे उत्पादन केले जाते. त्यातून महिन्याला ६ ते २५ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळते. वर्षाला जवळपास दीड कोटींची उलाढाल होते.
ऑर्डर घेतल्यानुसार पैठणी विणून वेळेवर देण्याची महिलांची हातोटी आहे. ग्रामसंघाकडे जवळपास एक लाखांची बचत आणि गटांकडे ५० हजारांपासून १ लाखांवर बचत जमा आहे.
व्यवसाय वाढीसाठी शासनाचे पाठबळ:
अकरा गटातील ४६ महिला सक्रिय विणकर म्हणून म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी १४ सदस्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून प्रत्येकी १ लाख रुपये अर्थसाहाय्य मिळाले आहे. यापूर्वी गटांनी बँकांकडून अर्थसाहाय्य घेऊन व्यवसाय सक्षम केला आहे.
मिळालेल्या शासकीय अनुदानातून नव्याने हातमाग खरेदी करून व्यवसाय वाढला आहे. पैठणी क्लस्टर निर्मिती तसेच ई कॉमर्स पद्धतीने पैठणी विक्री करण्याचा गटांचा मानस आहे. या कामात कुटुंबातील सदस्यांची मदत मिळते.
संपर्क: १) ज्योती आंबापुरे, (सामुदायिक संसाधन व्यक्ती) ८२६२८७४२९०
२) जया काटकर, (अध्यक्षा), ९२७३४९१५४९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.