Cashew Processing Agrowon
यशोगाथा

Cashew Processing : काजू प्रक्रिया, पीठनिर्मिती उद्योगात महिला समूहाची ओळख

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली (ता. कणकवली) येथील ओमसाई महिला स्वयंसाह्यता समूहाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन प्रकिया उद्योगात टप्प्याटप्प्याने वाढ केली. बाजारपेठेचा अंदाज घेत उत्पादनांमध्ये विविधता आणि गुणवत्तेवर भर दिल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. प्रक्रिया उद्योगामुळे महिलांना वर्षभर खात्रीचा रोजगार मिळाला आहे.

एकनाथ पवार

जानवली हे मुंबई-गोवा महामार्गालगत गाव. या गावशिवारातील बहुतांश महिला कौटुंबिक जबाबदारी पार पाडत पीक व्यवस्थापनात (Crop Management) देखील सहभागी असतात. जानवली गावठणवाडी येथील बहुतांशी महिला भात शेतीच्या (Paddy Farming) बरोबरीने विविध भाजीपाल्याची लागवड (Vegetable Cultivation) करतात. साधारणपणे २०१४ मध्ये या गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामन्नोती अभियानांतर्गत (उमेद) महिला गट स्थापन करण्याची प्रकिया सुरू झाली. या अभियानांतर्गत जानवली गावठणवाडी येथील दहा महिलांनी २४ ऑगस्ट २०१४ मध्ये ओमसाई महिला स्वयंसाह्यता समूहाची (Omsai Women Self Help Group) स्थापना केली.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात ः

महिलांचा समूह स्थापन झाल्यानंतर ‘उमेद’कडून विविध प्रशिक्षणांना सुरुवात झाली. प्रक्रिया उद्योग उभारणी, उत्पादित मालाचे ब्रॅण्डिंग तसेच उत्पादनाच्या विक्रीबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व सदस्यांनी मनापासून हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शासनाकडून महिला सदस्यांना पंधरा हजार रुपयांचा फिरता निधी मिळाला. या निधीतून कोणता व्यवसाय करावा याविषयी सदस्यांनी विचार केला. सहज उपलब्ध होणारा कच्चा माल आणि बाजारपेठेत असलेली मागणीचा विचार करून वडे पीठ, घावन पीठ, मोदक पीठ, कुळीथ पीठ, डांगर पीठ आणि मालवणी मसाला बनविण्याचा निर्णय घेतला.

घरातील कामे झाल्यानंतर गटातील सर्व महिला एकत्र येऊन प्रक्रिया उद्योगामध्ये काम करू लागल्या. याचबरोबरीने गरजेनुसार प्रत्येकाच्या घरी विविध उत्पादनांची निर्मिती सुरू झाली. व्यावसायिक दृष्टिकोनातून ही उत्पादने बनवायची असल्यामुळे गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात आले. सदस्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार १०० ग्रॅम ते ५०० ग्रॅमपर्यंत पॅकिंग करून विक्री करण्यास सुरुवात झाली.

जानवलीपासून कणकवली बाजारपेठ चार किलोमीटर अंतरावर असल्यामुळे विक्रीच्या दृष्टीने फायदा झाला. ही उत्पादने दर्जेदार असल्यामुळे टप्प्याटप्प्याने ग्राहकांकडून मागणी वाढू लागली. ग्राहकांकडून कोणत्या उत्पादनांना किती मागणी आहे, कोणत्या उत्सवात कोणत्या पिठाला मागणी मिळते याचा अंदाज महिलांना आल्यामुळे त्यांनी हंगामानुसार पिठांचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली.

फिरत्या निधीमधून मिळालेल्या रकमेतून महिलांचा प्रक्रिया उद्योगात चांगला जम बसला होता.त्यामुळे या महिलांनी पीठ आणि मसाल्यांसोबत आणखी काही उत्पादनेनिर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी दोन लाख रुपयांची गरज होती. महिला समूहाने कर्जासाठी बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव दिला. महिला समूहाची व्यावसायिक पत पाहून बँकेने समूहाला दोन लाखांचे कर्ज मंजूर केले. या रकमेतून पीठ चक्की खरेदी करण्यात आली. गटाने विविध पिठांच्या निर्मितीबरोबरीने हळद पावडर, चणा लाडू, मूग लाडू, नाचणी लाडू अशी उत्पादने बनविण्यास सुरुवात केली.

समूहाने २०१६ मध्ये तीन लाख, २०१८ मध्ये आठ लाख आणि २०२२ मध्ये १० लाखांचे कर्ज व्यवसायवृद्धीसाठी घेतले. कर्जाची टप्प्याटप्प्याने परतफेडदेखील केली. त्यामुळे बॅंकेत चांगली पत तयार झाली. सध्या वडे पीठ ८० रुपये, घावन पीठ ६० रुपये, मोदक पीठ ७० रुपये, हळद पावडर २०० रुपये, मालवणी मसाला ८०० रुपये प्रति किलो या दराने विक्री होते. काजूगर आणि पाकळी, तुकडा ग्रेडनुसार प्रति किलो ६५० ते १२०० रुपये या दराने विक्री केली जाते. सध्या समूहाच्या अध्यक्षा अकिंता साटम आणि सचिव अर्चना राणे या उत्पादन आणि विक्रीचे नियोजन पाहतात.

भाजीपाला लागवडीला सुरुवात ः

महिला समूहातर्फे विविध उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत असताना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचा प्रयत्न सुरू आहे. पालेभाज्या, मुळा, चवळी, वाल, भेंडी, गवार आदी हंगामी भाजीपाला पिकांच्या लागवडीस महिलांनी सुरुवात केली आहे. उत्पादित भाजीपाला कणकवली शहरातील आठवडा बाजारात विक्रीसाठी जातो. ग्राहकांकडून भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेती विकासाच्या दृष्टीने गटाने पावले उचलली आहेत.

प्रदर्शनातून चांगली उलाढाल

महिला बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन पातळीवर प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात ओम साई समूहातील महिला उत्पादनांचा स्टॉल लावतात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सिंधू सरस प्रदर्शन असते. यामध्ये हा समूह दरवर्षी स्टॉल लावतो. यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. याशिवाय कोकण सरस, महालक्ष्मी सरसमध्ये देखील समूहाचा स्टॉल असतो.

गेल्या वर्षी वाशी येथे झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात समूहाने साडेतीन लाखांची उलाढाल केली. सर्वोत्तम आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर या प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणून ओमसाई समूहाला गौरविण्यात आले. ओमसाई समूहाची विविध उत्पादने दर्जेदार असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेसोबत मुंबईत देखील चांगली मागणी आहे. मुंबईतील घाटकोपर, गोरेगाव, मालाड, विरार, बोरीवली या भागांत समूहाची विविध उत्पादने विक्रीसाठी जातात.

काजू प्रकिया युनिटची उभारणी ः

महिला समूहाने टप्प्याटप्प्याने व्यवसायात वाढ केली आहे.२०१८ मध्ये समूहाने घेतलेल्या पाच लाख रुपये कर्जातून काजू प्रकिया युनिट उभारले. यातून अडीच लाखांचे प्रक्रिया यंत्र घेण्यात आले. महिला समूहाने तीन टन काजू खरेदी करून त्यावर प्रकिया करण्यास सुरवात केली. या प्रक्रिया उद्योगात सहा प्रकारच्या काजूगराची निर्मिती होते. याशिवाय चार प्रकारच्या स्वादाचे काजूगर तयार केले जातात. प्रतीनुसार दर आणि विक्रीचे नियोजन असते.

घरच्यांचे मिळाले सहकार्य ः

महिलांनी व्यवसाय करू नये म्हणून पुरुष मंडळी अडचणी निर्माण करतात, असे सांगितले जाते. परंतु या समूहातील महिलांच्या घरातील पुरुष मात्र त्याला अपवाद आहेत. महिला समूहाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी ते महिलांना चांगल्याप्रकारे सहकार्य करीत असतात. विविध प्रदर्शनात लावलेल्या स्टॉलमध्ये घरातून प्रक्रिया केलेली उत्पादने नेऊन देण्याचे काम पुरुष मंडळी करतात.

‘‘मुंबईहून गावी आल्यानंतर मी ओमसाई समूहाची सदस्या झाले. विविध प्रक्रिया उत्पादनातून समूहाची उलाढाल वाढली. चांगला नफा देखील मिळत आहे. या नफ्यातून मी घरदुरुस्ती केले. तसेच काही घरगुती उत्पादने देखील तयार करते.
अपर्णा लाड
‘‘महिला समूह स्थापन करण्यापूर्वी मी स्वतः मसाला बनवून विक्री करीत होते. परंतु समूहनिर्मितीनंतर आम्ही एकत्रितपणे मसाला निर्मितीचे काम करू लागलो. आता दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसायदेखील करतो. महिन्याला सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
नम्रता साटम
‘‘गेली आठ वर्षे ओम साई समूहाचे काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. मेहनत, दर्जेदार उत्पादनावर भर आणि प्रभावी विक्री तंत्रामुळे काजू प्रक्रिया, विविध पिठांची निर्मिती, मालवणी मसाला, हळद पावडर निर्मितीमधून गटाची वार्षिक उलाढाल बारा लाखांवर पोहोचली आहे.’’
सायली साटम, ९७०२१७९६६३ (सीआरपी, उमेद अभियान)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT