Women Empowerment Agrowon
यशोगाथा

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

कृष्णा जोमेगावकर

Success Story : नांदेड जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यात कोलाम आदिवासींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. घनदाट जंगल असलेल्या या तालुक्यात कसण्यासाठी वन पट्टे दिले आहेत. परंतु यात घेतलेले पीक जंगली प्राण्यांकडून फस्त केले जाते. यामुळे आदिवासी लोकांना जंगलातून मध, डिंक, तेंदूपत्ता गोळा करणे, लाकडे गोळा करणे तसेच मोहफुले जमा करणे, जंगली बांबूपासून टोपले, तट्या तयार करणे हा व्यवसाय करावा लागतो. काजीपोड येथील महिला बांबूपासून विविध वस्तू बनवत मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने (उमेद) महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

उमेदकडून पाठबळ

किनवट तालुक्यातील जवरला गट ग्रामपंचायत अंतर्गत काजीपोड हा २७ उंबऱ्यांचा आदिवासी पाडा आहे. येथील दामबाई भीमराव कोडापे, सुनीता लक्ष्मण आत्राम यांच्या सारख्या अनेक महिला पारंपरिक पद्धतीने जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनांवर अवलंबून होत्या. काही महिला बांबूपासून टोपली, तट्या बनवून आपला उदरनिर्वाह करीत. यातून जेमतेम भागायचे. परंतु त्यांना आता उमेदच्या माध्यमातून जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. उमेदचे किनवट तालुका व्यवस्थापक गौतम वावळे आणि प्रभाग समन्वयक ईश्‍वर आडे यांनी येथील महिलांना समूहानेे एकत्रित येण्याचे आवाहन केले. दामबाई कोडापे यांनी पाड्यातील महिलांना प्रेरित करून समूहाची नोंदणी केली.

‘अनुसया स्वयंसाह्यता’ नावाने समूहाची नोंदणी

काजीपोडच्या दामबाई कोडापे यांनी दहा महिलांना सोबत घेत २०१९ मध्ये ‘अनुसया स्वयंसाह्यता समूहा’ची नोंदणी केली. यामध्ये अध्यक्ष दामबाई कोडापे, सचिव सुनीताबाई आत्राम, तर ललिताबाई आत्राम, कमलाबाई आत्राम, आईबाई आत्राम, कमला मडावी, अनिता पोयाम, ज्योती आत्राम, संगीताबाई कोडापे, भीमबाई मडावी या सदस्या आहेत. समूहाचे मांडवी येथील भारतीय स्टेट बँकेत खाते काढण्यात आले. महिलांना बचतीची सवय होण्यासाठी दर महिन्याला शंभर रुपये प्रमाणे प्रति महिला बचत करण्याचे ठरविण्यात आले. समुहातील महिलांना उमेदकडून प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले.

बांबूपासून वस्तू निर्मितीविषयी प्रशिक्षण

महिलांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. यामध्ये बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू निर्मिती, त्यावर नक्षीकाम, तयार वस्तूंचे पॅकेजिंग, ब्रॅन्डिंग, लेबलिंग, मार्केटिंग तसेच ग्राहकांसोबत कसे बोलायचे इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

तीस हजार रुपयांचे खेळते भांडवल

उमेद अभियानाच्या माध्यमातून अनुसया महिला स्वयंसाह्यता समूहास दोन वेळा पंधरा हजार रुपये असे तीस हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध झाल्यामुळे समूहाच्या व्यवसायास ऊर्जा मिळाली. ‘उमेद’च्या माध्यमातून समूहातील महिलांना मुंबई, नाशिक, पुणे अशा अनेक ठिकाणी प्रदर्शनाला जाण्याची संधी मिळाली. नाशिक येथे आयोजित जनजाती गौरव दिवस, वन स्टेशन वन प्रॉडक्ट अंतर्गत किनवट रेल्वे स्टेशन येथे समूहाचे स्टॉल लावण्यात आले होते.

भेटीवेळी वस्तूंची खरेदी

नांदेड येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आलेले उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत व मध्यप्रदेशचे पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष विनोद गोटिया यांनी आम्ही बनविलेल्या वस्तूंची खरेदी केली. तसेच पंधरा हजार रुपयांच्या वस्तूंची ऑर्डर दिल्याचे समूहातील महिला अभिमानाने सांगतात.

पाच लाखांची उलाढाल

आजपर्यंत सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या वस्तूंची विक्री समूहाने केली आहे. सध्या समूहातील प्रत्येक महिलेला पाचशे रुपये रोज दिवसाकाठी मिळत आहेत. यातून व्यवसायाची प्रगती होऊन आर्थिक उत्पन्नात, जीवनमान सुधारण्यात मदत झाली आहे. समूहातील प्रत्येक महिलेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचे दामबाई कोडापे यांनी सांगितले.

तेलनिर्मिती उद्योग

समूहाने बांबूच्या वस्तू बनविण्यासोबतच इतरही व्यवसाय करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत लाकडी घाणा मिळाला आहे. या घाण्यावर समुहाच्या महिला तेलनिर्मिती करतात. तेलाची साडेतीनशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाते.

५२ प्रकारची उत्पादने

गटातील महिला बांबूपासून सुमारे ५२ प्रकारची उत्पादने तयार करून त्यांची विक्री करतात. यात प्रामुख्याने खुर्च्या, टेबल, विविध प्रकारचे पेन, लॅम्प स्टॅन्ड, आकाशकंदील, विविध प्रकारच्या टोपली, लहान मुलांची खेळणी, सजावटीचे साहित्य, टोपी, स्टूल, चाळणी, फुलांची परडी अशा बांबूपासून आकर्षक वस्तू बनविण्यात येतात.

विविध ठिकाणी स्टॉल

महालक्ष्मी सरस, मुंबई या राज्यस्तरीय प्रदर्शनात उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉल लावला होता. पंचायत समिती किनवट अंतर्गत राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये समुहाने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच नांदेड येथील ‘शासन आपल्यादारी’ या कार्यक्रमांत सहभाग घेण्यात आला.

ईश्‍वर आडे, ९३७३९ १६११४ (प्रभाग समन्वयक, काजीपोड, ता. किनवट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Agriculture Processing : ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

SCROLL FOR NEXT