Rural Women Entrepreneur Success Story : कोल्हापूर जिल्ह्यात हेब्बाळ-जलद्याळ हे कर्नाटक सीमेवर असलेले दोन हजार लोकसंख्येचे गाव गडहिंग्लज तालुका ठिकाणापासून २५ किलोमीटरवर आहे. शेती, दूध उत्पादन हेच गावचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. आज गावाची मुख्य ओळख झाली आहे ती बर्फीसाठी.
तीही पंचवीस वर्षांहून अधिक काळ बर्फी निर्मितीत असलेल्या साठ वर्षीय भागूबाई काशिनाथ दावणे यांच्या रूपाने. आयुष्यातील अनेक संकटांना धैर्याने तोंड देत त्यांनी अनेक वर्षांपासून बर्फी निर्मितीत सातत्य ठेवले. प्रामाणिकता, कष्ट यांच्या जोरावर व्यवसाय नेटाने चालवला.
...असे आहे व्यवसायाचे स्वरूप
काशिनाथ व भागूबाई दावणे दांपत्यांचे गावात टपरीवजा हॉटेल आहे. येथेच त्यांनी १९९६ च्या सुमारास बर्फी व्यवसायास प्रारंभ केला. सर्व भार भागूबाईंनी सुरुवातीपासून आपल्या खांद्यावर घेतला. अशिक्षित असल्या तरी व्यवहारज्ञान पक्के असल्याने त्यांचे आजपर्यंत कुठेच अडले नाही. आजतागायत त्यांच्याकडे कोणत्या वह्या नाहीत की नोंदी नाहीत. स्थानिक दुग्ध संस्था किंवा थेट शेतकऱ्यांकडून दूध घ्यायचे, जागेवरच रक्कम अदा करायची असा शिरस्ता त्यांनी ठेवला आहे.
एखाद्याचे पैसे त्वरित देणे शक्य झाले नाही, तरी आवर्जून लवकरात फेड करण्याच्या सवयीमुळे त्यांनी विश्वास जिंकला आहे. बर्फीची लोकप्रियता असल्याने दुधाच्या गुणवत्तेबाबत त्या कोणती तडजोड करीत नाही. दररोज सुमारे ६० ते १०० लिटर दुधावर प्रक्रिया होते. सिलिंडर गॅसपेक्षा चुलवणावर तयार केलेल्या बर्फीला विशिष्ट उत्तम चव येते असा भागूबाईंचा अनुभव आहे. मदतीला एक मजूर असतो.
दुहेरी कसरतीतून अर्थार्जन
दिवसभर सुरू असलेल्या कामांच्या रगाड्यात भागूबाईंची चपळता पाहण्यासारखी असते. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान बर्फी ग्राहकांसाठी सज्ज असते. परंतु सकाळी नऊ वाजल्यापासून ग्राहक हॉटेलवर येण्यास सुरुवात करतात. भागूबाई आपुलकीने त्यांना एक तास थांबा, ताजी बर्फी घेऊन जा अशी विनंती करतात.
ग्राहकही मग काही काळ प्रतीक्षा करते. दिवसातून किमान तीन आधणे काढली जातात. प्रत्येक आधणासाठी वीस लिटर दुधाचा वापर होतो. एका आधणातून बर्फीचे २०० ते २२५ नग तयार होतात. दहा रुपयांना एक याप्रमाणे विक्री होते. हेब्बाळ जलद्याळ हे गाव कर्नाटक सीमेवर असल्याने प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे बर्फीची खरेदी सुरू असते. जत्रांच्या काळात म्हणजे फेब्रुवारी, मार्च काळात बर्फीला अधिक उठाव असतो.
परिसरातील जे लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला आहेत ते गणपती उत्सव, सुट्ट्यांच्या काळात गावी येतात. परतताना ते भागूबाईंची बर्फी हमखास घेऊन जातात. एकदा एक महिला लगबगीने भागूबाईंकडे आली.
त्या वेळी बर्फी तयार होत होती. त्यांना थोडी प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. गडबडीत का आलात असे विचारताच मुंबईच्या पाहुण्यांचा फोन आला. भागूबाईंची बर्फी प्रसिद्ध आहे. दुपारनंतर ती मिळत नाही असे कळले म्हणून धावत पळत आल्याचे उत्तर त्यांनी दिले. ग्राहकांचा हा प्रतिसाद पाहून भागूबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली.
रोजची दुहेरी कसरत
दिवसभर सुरू असलेल्या या कामांच्या रगाड्यात भागूबाईंची चपळता पाहण्यासारखी असते. पती काशिनाथ आजाराने ग्रस्त असल्याने पूर्णपणे शारीरिक हालचाल करू शकत नाहीत. दावणे दांपत्याच्या मुलाचे निधन झाले आहे. तिन्ही मुली विवाहित आहेत. परंतु प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या भागूबाई व्यवसाय आणि धर अशा दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतात.
अनेक वेळा एकीकडे बर्फी तयार करायचे आणि दुसरीकडे दुपारचे जेवण बनवायचे अशी दुहेरी कसरत असते. दांपत्याची काही गुंठेच शेती आहे. त्यातून फारसे उत्पन्न हाती पडत नाही. त्यामुळे अर्थार्जनाचे मुख्य साधन बर्फी व्यवसायच आहे. मात्र वाढलेले दूधदर, उत्पादन खर्च आणि या वयातील श्रम यांचा हिशेब करता मोजकाच नफा हाती पडतो. परंतु त्यातही सुखी समाधानी जीवन जगण्याचा दांपत्याचा प्रयत्न असतो.
भागूबाई दावणे ९४२२०६६८४९
काशिनाथ दावणे ९४२३८५७६०८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.