Fruit Orchard Agrowon
यशोगाथा

Fruit Orchard : फळबाग पीक पद्धतीतून कुटुंबाने उंचावले अर्थकारण

 गोपाल हागे

Buldana Story : बुलडाणा जिल्ह्यात फलोत्पादनाचा चांगला विकास झाला आहे. देऊळगाव राजा तालुक्यात शिवणी आरमाळ हे गाव आहे. येथील मांटे कुटुंबाने फळबाग पीक पद्धतीतून शेतीचा विकास साधला आहे. गणेश हा कुटुंबातील तरुण पिढीचे नेतृत्व करतो. त्याने ‘पॉलिटेक्निक’ शाखेतून शिक्षण घेतले आहे.

शिक्षणानंतर नोकरी न करता वडिलोपार्जित शेतीतच त्याने वडील व काकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे सुरू केले. विदर्भात द्राक्षशेती फारशी पाहण्यास मिळत नाही. पण या कुटुंबाने सन २००० पासून द्राक्षशेती जोपासली आहे.

सन २०१७ नंतर जुनी बाग काढून दोन एकरांत नवी लागवड केली आहे. काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात द्राक्ष बागा सर्वत्र विस्तारल्या होत्या. मात्र आता बोटावर मोजण्याइतक्याच बागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यात मांटे यांची बाग ओळखली जाते.

पीकपद्धती

गणेश फळबाग शेतीची संपूर्ण सूत्रे सांभाळतात. द्राक्षाव्यतिरिक्त खरबूज व कलिंगड अशी दोन मुख्य पिके घेण्यात येतात. सन २००६ पासून या पिकांमध्ये सातत्य ठेवले आहे. रब्बी हंगामाला सुरुवात होताच ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने या दोन्ही पिकांची लागवड होते.

आठ-दहा दिवसांच्या अंतराने लागवडीचे नियोजन असल्याने बाजारपेठेत अधिक काळापर्यंत माल उपलब्ध करणे शक्य होते. दरवर्षी दोन्ही पिकांचे मिळून सुमारे सहा एकर क्षेत्र असते. खरबुजाचे एकरी १२ ते १४ टनांपर्यंत, तर कलिंगडाचे २० ते त्याहून अधिक टनांपर्यंत उत्पादन मिळते. खरबुजाला किलोला २० रुपयांपर्यंत, तर कलिंगडाला १० रुपयांपर्यंत दर मिळतो.

फळबागांना सिंचनासाठी प्रामुख्याने ठिबकचा वापर केला जातो. तीन विहिरी, एक शेततळे घेतले आहे. तीन पंप व एक सौरपंप सोबतीला आहे. यामुळे भारनियमनाची समस्या कमी झाली आहे.

मागेल त्याला शेततळे योजना, सूक्ष्म सिंचन, २२ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र, मळणीयंत्र आदी सामग्रीसाठी कृषी विभागाच्या अनुदानाचे पाठबळ मिळाले आहे. शासनाच्या विविध अभियानांतर्गतही कुटुंबाचा वेळोवेळी सहभाग असतो.

एकत्र कुटुंबाची ताकद

शिवणी आरमाळ गावात गणेश यांचे आजोबा काही वर्षांपूर्वी कामासाठी आले. तेव्हा ते सुतार काम करीत गावातच स्थायिक झाले. मेहनतीच्या जोरावर या कुटुंबाने मग शेतीवर भर देत टप्प्याटप्प्याने शेतीचे क्षेत्रही वाढवत नेले. आज कुटुंबाकडे सुमारे १० एकर शेती आहे.

तीन एकर क्षेत्र मागील वर्षातच खरेदी केले. कुटुंबात आज आठ सदस्यांचा समावेश आहे. त्यात गणेशसह त्याचे शिवदास (वडील), अंजना (आई), रामदास (काका), रेखा (काकू), वैष्णवी (बहिण), शिवम (भाऊ), नंदाबाई (आजी) आदी सदस्यांचा समावेश आहे. बहुतांश सदस्य शेतीत असल्याने मजुरी समस्येची तीव्रता व त्यावरील खर्चात बचत केली आहे.

द्राक्षाची थेट विक्री

द्राक्षाची बाग रस्त्याच्या बाजूला असल्याचा फायदा कुटुंबाने घेतला आहे. येथून दिवसभर वाहनाची येजा सुरू असते. त्यामुळे हंगामात रस्त्याकडेला स्टॉल उभारून द्राक्षांची थेट विक्री केली जाते.

त्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर पहिला व शेवटचा आठवडा असे गोड्या छाटणीचे नियोजन होते. जेणेकरून टप्प्याटप्प्याने माल विक्रीस यावा. काही वर्षांपासून ही विक्री व्यवस्था असल्याने ग्राहक तयार झाले आहेत. बाजारभावापेक्षा किलोला पाच रुपये कमी दराने थेट विक्री होते. त्याचा मांटे यांच्याबरोबर ग्राहकांचाही फायदा होतो.

एकूण उत्पादनापैकी ८० टक्के विक्री थेट होते. त्याचबरोबर काही प्रमाणात खरबूज, कलिंगडाची विक्रीही स्टॉलवरून होते. बहुतांश माल चिखली, खामगाव, बुलडाणा बाजारात पाठवला जातो.

गणेश मांटे या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शेतीत उतरण्याचा घेतलेला निर्णय केवळ धाडस नव्हे, तर आता एक आदर्श ठरला आहे. फळबाग शेतीचे चांगल्या प्रकारे नियोजन केले की त्यातून चांगले अर्थकारण तयार करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
समाधान वाघ, कृषी पर्यवेक्षक, देऊळगाव राजा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT