Dairy
Dairy Agrowon
यशोगाथा

Dairy : एकीच्या बळावर यशस्वी झालेला दुग्धव्यवसाय

Raj Chougule

कोल्हापूर जिल्ह्यातील बामणी (ता.कागल) येथील मगदूम कुटुंबाने एकत्रित कुटुंबाच्या जोरावर सुमारे ३५ जनावरांवर आधारित दुग्धव्यवसाय (Dairy Business) यशस्वी केला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत असल्याने त्यातून एकमेकांचे कष्ट कमी करून व्यवसाय यशस्वी व अर्थकारण पक्के करणे शक्य झाले आहे.

कोल्हापूर जिल्हा दुग्धव्यवसायात प्रगत व आघाडीवर आहे. जिल्ह्यात अनेक प्रगतिशील दुग्ध उत्पादक पाहण्यास मिळतात. कागल तालुक्यातील बामणी येथील मगदूम कुटुंब त्यापैकीच एक आहे. शिवाजी, शंकर, दिनकर व बाबूराव हे मगदूम सुमारे २५ वर्षांपासून एकत्रित राहतात. त्यांची २० एकर शेती आहे तर सुमारे ३५ जनावरांचा गोठा आहे. सुमारे २२ सदस्यांचे कुटुंब आनंदाने शेतकामांसह गोठ्याचे व्यवस्थापन चोखपणे करताना दिसते. सुमारे १५० बाय २७ फूट आकाराचा गोठा आहे. बाजूने जाळी आहे.

बंदिस्त गोठा असला तरी गायी मुक्त पद्धतीने मोकळ्या जागेत सोडल्या जातात. बारा वर्षांपूर्वी एका गायीपासून जनावरांच्या व्यवस्थापनास सुरवात करण्यात आली. आत्तापर्यंत २० गायींची पैदास गोठ्यात झाली आहे. याशिवाय दोन मुऱ्हा व दोन पंढरपुरी म्हशी घरच्या दुधासाठी आहेत. याशिवाय वासरे आहेत. कुटुंबातील सदस्य कृष्णात हे खासगी दूध संस्थेत पर्यवेक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. कृत्रिम रेतनाचा वापर करून गायींची पैदास करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे गायी खरेदीवरील खर्चातही बचत करण्यात आली आहे. गोठ्यामध्ये दररोज २५ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी देखील पाहण्यास मिळतात.

चारा नियोजन

सकाळी सहा वाजता जनावरांच्या व्यवस्थापनास सुरवात होते. गोठ्याची स्वच्छता, दुधाच्या धारा ही कामे झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य अन्य कामांसाठी वेळ देतात. सकाळ व संध्याकाळ दोन तास गोठ्यात काम चालते. गोठ्यात एकही मजूर नाही. जनावरांच्या चाऱ्यासाठी गोठ्याशेजारीच दीड एकर शेती आहे. हत्तीगवत, शाळू व अन्य चारा पिके घेण्यात येतात. हिरवा व कोरड्या चाऱ्याचे योग्य मिश्रण करून आहाराचे व्यवस्थापन केले जाते. प्रति गायीला दिवसाला २५ किलो तर म्हशीला ३० किलो चारा दिला जातो. दहा लिटर दूध देणाऱ्या गाईस पेंड व भुसा दररोज सहा किलो दिला जातो.

किफायतशीर व्यवसाय

वर्षभराचा विचार केला तर दिवसाला १०० लिटरपासून १५० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. गाईंचे दूध यंत्राद्वारे काढले जाते. खासगी दूध संस्थेस पुरवठा होतो. खर्च वजा जाता १५ टक्क्यापर्यंत नफा मिळतो. वर्षाला एखादी गाय किंवा वासरांची विक्री होते. त्यातून वेगळा नफा राहतो. दुग्ध व्यवसाय ताजे उत्पन्न देतोच. शिवाय घरच्या शेतासाठी वर्षाला सुमारे ८० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा फायदा ऊस उत्पादन वाढीसाठी झाला आहे. रासायनिक खतांचे प्रमाण व त्यावरील खर्च कमी झाला आहे. उसाचे उत्पादन गुंठ्याला दीड टन आहे.

एकीचे बळ

गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हे कुटुंब आघाडीवर आहे. ट्रॅक्टर व ‘जेसीबी’ यंत्राचा पूरक व्यवसायही करण्यात येतो. शेतीत दहा एकरांत ऊस तर उर्वरित दहा एकरांत सोयाबीन व अन्य हंगामी पिके असतात. गोठा व्यवसाय आदर्शवत आहेच पण कुटुंबातील आर्थिक व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे ठेवले आहे. दररोजच्या जमा- खर्चासाठी वही ठेवण्यात आली आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हवी तेवढी रक्कम घेण्याची मुभा आहे. या वहीत किती रक्कम घेतली व कोणत्या कारणासाठी घेतली याची नोंद मात्र ठेवावी लागते.

दररोज सायंकाळी जेवणाच्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. यावेळी दररोजच्या ताळेबंदाच्या तपशीलाची चर्चा होते. त्यानुसार पुढील दिवसांची तजवीज केली जाते. सर्वांच्या समन्वयामुळे कुटुंबाची एकी कायम राहिली आहे. याचाच सकारात्मक परिणाम दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यात झाला आहे. कुटुंबातील सत्तर वर्षीय शिवाजी हे सर्वात वडीलधारी आहेत. ते प्रामुख्याने खर्चावर देखरेख ठेवतात.

शिवाजी मगदूम- ८९९९१६१६०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT