Poultry Business Agrowon
यशोगाथा

Poultry Business : ‘सातपुडा देशी’ कोंबडीचे यशस्वी व्यावसायिक पालन

Chandrakant Jadhav

Jalgaon Poultry Story : खानदेश हा सातपुडा पर्वतालगतचा प्रदेश आहे. सातपुड्यात पशुधन, पक्ष्यांच्या विविध जाती आहेत. त्यातूनच जळगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र पाटील, डॉ. बाळरवी सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी सातपुडा देशी या नावाने कोंबडीचे वाण विकसित केले. त्यास केंद्र शासनाची मान्यताही मिळाली आहे.

बीएस्सी ॲग्री व एमबीए झालेले आदित्य पाटील यांनी वडील रवींद्र यांच्या मार्गदर्शनातून याच कोंबडीचे सन २०१३ पासून व्यावसायिक पालन सुरू केले. आई संध्या पाटील यांची साथ, दोनगाव (जि. जळगाव) येथील यशवंत ॲग्रीटेकचे संचालक बापूसाहेब सूर्यवंशी, रूपेश देशमुख, डॉ. बी. एस. सूर्यवंशी यांचेही सहकार्य आदित्य यांना मिळते.

व्यावसायिक कोंबडीपालन

आदित्य कुटुंबीयांसोबत जळगाव येथे वास्तव्यास आहेत. चहार्डी (ता.चोपडा) या मूळ गावी त्यांचा १२ हजार पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म आहे. व्यवस्थापनासाठी सहा जण कार्यरत आहेत. ४० हजार रुपये मजुरीवर दर आठवड्याला खर्च होतात. पशुखाद्याचा पुरवठा जळगाव येथून होतो. खाद्यात पक्ष्यांना आवश्यक अन्नघटक असल्याची तपासणी केली जाते.

सुरुवातीला या पोल्ट्रीसाठी १२ लाख रुपये कर्ज घेतले. १०० टक्के कर्जाची फेड पाच वर्षांत केली आहे. पाळधी येथे पक्ष्यांची हॅचरी आहे.

दोन्ही फार्ममध्ये पक्ष्यांची अत्यंत दक्षता घेतली जाते. दर महिन्याला लसीकरण व किडींपासून बचावासाठी फवारणी होते. अनेक वर्षांच्या अनुभवातून मांसल पक्षी, प्रजनन व हॅचरी याबाबत माहिती प्रसार आदित्य करतात.

पाल (ता. रावेर), येथील कृषी विज्ञान केंद्र, आगा खान संस्था (बडवानी, मध्य प्रदेश) येथे त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. सायंकाळी उशिरापर्यंत ते व्यवस्थापनात व्यस्त असतात. अलीकडे कडकनाथ कोंबडी संगोपनही सुरू केले आहे.

उत्पादन व विक्री

सुरुवातीला मांसल पक्ष्यांची विक्री केली. पुढे २०१८ च्या दरम्यान अंडी उत्पादन सुरू केले. त्यात चांगले यश आले. सातपुडा देशी पक्ष्याचे वय २० आठवडे झाल्यानंतर अंडी उत्पादन सुरू होते. पुढे ते सत्तराव्या आठवड्यापर्यंत चालते. एकूण कालावधीत पक्षी १८० अंडी देतो. त्यानंतर मांसल पक्षी म्हणून विक्री केली जाते. '

आदित्य यांच्या फार्ममध्ये दर महिन्याला सुमारे ८० हजार अंड्यांच्या आसपास उत्पादन घेतले जाते. हॅचिंगसाठी त्यांची पाठवणी गोवा सरकार, हरिद्वार, राऊरकेला, उत्तराखंड आदी भागात होते. प्रति नग १३ ते १६ रुपये दर मिळतो.

कोंबड्यांचे उत्पादन चक्राकार (सायकल) पद्धतीने सुरू असते. दर आठवड्याला ४० हजार पिलांचे उत्पादन होते. बुलडाणा, संगमनेर, गोध्रा, स्थानिक आदी विविध ठिकाणच्या वितरकांना पुरवठा होतो. त्याचा १८ ते २३ रुपये प्रति नग दर असतो. ‘डिलिव्हरी’साठी तीन पिकअप व्हॅन्सची सुविधा आहे.

सातपुडा देशी कोंबडीची वैशिष्ट्ये

-गावरान कोंबड्यांशी मेळ घालणारा संकरित वाण.

-सातपुडा पर्वत, खानदेशात आढळणाऱ्या देशी कोंबड्यासारखाच दिसतो

-शरीररचना आकार, डोक्यावरील तुरा व चवही गावरान पक्ष्यासारखीच.

-भारतात गावरान पक्ष्यांपासून विकसित संकरित पक्ष्यांचे पाय विविध रंगी. परंतु सातपुडा देशी पक्ष्याचे पाय गावरान पक्ष्यासारखेच पिवळसर अशी तज्ज्ञांची माहिती.

-व्यवस्थापन आदर्श असल्यास पक्ष्याचे वजन ६० दिवसांत एक किलोपर्यंत पोचते. या कालावधीत अडीच किलो एकूण खाद्य लागते.

-कोंबड्याचे वजन सहा महिन्यांत ४.५ किलो, तर कोंबडीचे वजन ३.५ किलो.

-पक्षी काटक. बर्ड फ्लू, मानमोडीसारख्या आजारांना बळी न पडणारा. मरतुकीचे प्रमाण अल्प.

-अंड्यांची चवही गावरान कोंबडीच्या अंड्यांसारखी. आकार व रंगही तसाच.

प्रदर्शनात सातपुडा देशीचा डंका

शिर्डी (जि. नगर) येथे पशुसंवर्धन विभागातर्फे २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत महापशुधन एक्स्पोचे आयोजन झाले. त्यात राज्य, परराज्यांतील १२७० पशुधन आले होते. तेथे जळगाव जिल्ह्यातून पशुसंवर्धन उपायुक्तालयाने कुक्कुट या गटात सातपुडा देशी पक्ष्याचा सहभाग नोंदवला.

या वेळी रोगप्रतिकारक्षम, अंडी उत्पादनक्षम, वाढीस जोमदार व पोल्ट्री व्यवसायासाठी उत्कृष्ट असे मत तज्ज्ञांनी नोंदविले. प्रदर्शनात या पक्ष्याला प्रथम क्रमांकही मिळाला.

उच्चशिक्षित कुटुंब

आदित्य यांचे आजोबा हरी नारायण पाटील ९५ वर्षांचे असून, ते आपल्या काळातील पदवीधारक आहेत. त्यांनी आपल्या सर्व पाचही मुलांना उच्च शिक्षण दिले. आदित्य यांची पत्नी प्रियांका व्यवस्थापन शाखेतील पदवीधारक असून, त्या पतीला ‘अकाउंट’संबंधी मदत करतात.

आदित्य यांचे लहान बंधू समीर अमेरिकेत बॉस्टन येथे संगणक अभियंता आहेत. भावजय दीक्षाही संगणक पदवीधारक व बोस्टन येथेच नोकरीस आहेत.

संपर्क - आदित्य पाटील - ९८९०९०९००३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT