Agricultural Policies Problems : मागील दोन-तीन दशकांपासून शासन शेती क्षेत्रासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्याचे धोरण राबवत आहे. या दरम्यानच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारने शेतीसाठी दूरगामी उपाययोजना आखल्या नाहीत. प्रत्येक सरकारने लोकप्रिय घोषणा करून शेतकऱ्यांना खुश करून त्यांची मते मिळवून परत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.
अ) शासन
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखत असताना सत्तेतील राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे स्वतःचा स्वार्थ ठेवून योजना आखत असतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर ‘एक रुपयात पीकविमा योजना’ आणि ‘मोफत किंवा अल्पदरात कृषी निविष्ठा पुरवठा योजना’ या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा कमी; मात्र शासनकर्त्यांचा फायदा अधिक होताना दिसत आहे.
विमा योजना राबवत असताना शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना आगाऊ देण्यात येतात; मात्र नैसर्गिक आपत्ती आली, तरी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळत नाही. एखाद्या वेळेस जास्तच नैसर्गिक आपत्ती येऊन सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असले तरीसुद्धा अशा परिस्थितीत जेवढी विम्याची रक्कम शासनाने या कंपनीकडे जमा केली आहे, अगदी तेवढी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिली जात नाही.
या विमा कंपन्या प्रत्येक वर्षी अब्जावधी रुपयांचा नफा कमवत असल्याचे निदर्शनास येत आहे. विमा कंपन्यांच्या मालकीत राज्यकर्त्याचा सहभाग असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. नुकसान भरपाई न देता हे राज्यकर्ते विमा कंपनीच्या माध्यमातून अब्जावधी रुपयाची लूट करत असल्याचे दिसून येत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकरी हताश होतो. अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब नुकसान भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळणे आवश्यक असते; परंतु ती दिली जात नाही. म्हणून काही शेतकरी आत्महत्या करतात. तरीही या राज्यकर्त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक वाटत नाही.
मोफत किंवा कमी दरात कृषी निविष्ठा पुरविण्याची योजना शासनाकडून राबविली जाते. यामध्येही राज्यकर्ते आपल्या मर्जीतील कंपन्यांना कृषी निविष्ठा पुरवण्याचे कंत्राट देतात. निविष्ठा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्या जातात. कंपन्या शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा पुरवतात.
बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना निविष्ठा न पुरविता कागदोपत्री व्यवहार दाखवून त्याची बिले शासनाला देऊन करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो. या भ्रष्टाचारामध्ये आता उघड उघड राजकीय नेत्याचा सहभाग दिसून येत असला, तरी हे राज्यकर्ते, नेते मंडळी एवढी निर्ढावली आहेत, की त्यांना आता भ्रष्टाचार करण्याबाबत काहीही वाटत नाही. अशा बोगस योजना राबविण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाकडून दूरगामी ठोस योजना आखणे अपेक्षित आहे.
शासनाने शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठ्याकरिता उपाययोजना केली पाहिजे. शेतकऱ्यांना शेती व्यवसायाचे मार्गदर्शन देऊन त्याला सुशिक्षित केले पाहिजे. कोणत्या पिकाची लागवड करावी, याचे मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बिगरव्याजी, विनासायास कर्ज पुरवठा केला पाहिजे.
शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढण्याऐवजी विम्याची रक्कमच शेतकऱ्यांना अनुदान म्हणून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दर्जेदार शेती निविष्ठांचा पुरवठा, आधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना योग्य नफा मिळवून देणे आवश्यक आहे.
ब) प्रशासन
आपल्या देशात शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी स्वतंत्र असे कृषी खाते निर्माण करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या खात्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. परंतु यातील अनेक कर्मचारी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडत नाहीत.
त्यांची नेमणूक ही कृषीच्या उन्नतीसाठी झाली असली तरी, अनेक जण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यरत असतात. या कर्मचाऱ्यांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच प्रामाणिक कर्मचारी सोडले, तर उर्वरित अधिकारी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केवळ पैसे मिळविण्याचेच कार्य करतात.
३) व्यापाऱ्यांचा अति स्वार्थ
आपल्या देशातील उद्योग व्यवसाय, व्यापार करणाऱ्या घटकांचा देशातील जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. यातील अनेक जण प्रामाणिकपणे आपला उद्योग व्यवसाय करतात; परंतु काही व्यापारी याला अपवाद ठरतात. असे व्यापारी अति स्वार्थापोटी दुसऱ्याचे नुकसान करतात. हीच परिस्थिती शेती व्यवसायामध्येही आहे.
शेती व्यवसायामध्ये कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठा याची नेमकी माहिती शेतकऱ्यांना नसल्यामुळे तो शेतकरी अशा व्यापाऱ्यावरच निर्भर राहतो, तो प्रत्येक गोष्ट व्यापाऱ्याला विचारूनच शेतीसाठी वापरत असतो.
अशा परिस्थितीत अनेक व्यापारी योग्य सल्ला देऊन शेतकऱ्यांचा फायदा घडवून आणतात; परंतु काही स्वार्थी व्यापारी हे शेतकऱ्यांना चुकीचा सल्ला देऊन अनावश्यक कृषी निविष्ठांची विक्री करून अधिक नफा कमवण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात.
त्याचबरोबर अशा प्रकारच्या कृषी निविष्ठांची निर्मिती करणाऱ्या उद्योजकामध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. त्यातील अनेक उद्योजक हे प्रामाणिकपणे दर्जेदार निविष्ठा तयार करून शेतकऱ्यांना पुरवत आहेत, त्यातून अनेक शेतकऱ्यांचा फायदाही होत आहे;
परंतु काही स्वार्थी उद्योजक निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठा तयार करून अशा लबाड व्यापारांना हाताशी धरून त्याची अव्वाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांना विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो, तुलनेत उत्पादन कमी मिळते. त्यामुळे त्याची शेती नुकसानीत जाते.
४) शेतमजुरांची समस्या
चार दशकांपूर्वी शेतमजूर अतिशय कमी वेतनातही शेतीत काम करण्यास उत्सुक असायचे. इतके, की शेतावर कामाला येणाऱ्या कामगारांची संख्या अधिक झाल्याने काहींना परत पाठवावे लागत असे. परंतु आज मात्र स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता शेतकऱ्यांना स्वतः मजुरांच्या घरी जाऊन त्यांची विनवणी करावी लागते.
अनेक वेळा आगाऊ रक्कम देऊनही हे कामगार शेतीवर काम करण्यास तयार नसतात. कामावर आलेच, तरी ते केवळ चार-पाच तास काम करतात, पण पूर्ण दिवसाचा मोबदला घेतात. सध्या शेतमजुरीचे दर इतके वाढले आहेत, की शेतकऱ्यांसाठी ते परवडण्याजोगे राहिलेले नाहीत; मात्र शेतकऱ्यांना त्यांचा नाइलाजाने स्वीकार करावा लागतो.
आजच्या घडीला शेतकऱ्यांपुढील सर्वांत मोठी समस्या म्हणजे शेतीसाठी आवश्यक कामगार उपलब्ध नसणे, आणि उपलब्ध झालेच तर त्यांचे जास्तीत जास्त दर. यामुळे शेतकऱ्यांचे शेती व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या कामगारांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्यांना शेती करणे कठीण झाले आहे.
अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी आपला अति स्वार्थ टाळून शेतकऱ्याचे हित समोर ठेवून उद्योग-व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे यावर योग्य ते नियंत्रण ठेवून अशा स्वार्थी उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम शासनाच्या कृषी खात्याच्या मार्फत होणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान टळून शेतकरी आपल्या शेती व्यवसायात नफ्यात राहील.
(लेखक निविष्ठा उद्योगाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.