Goat Farming Agrowon
यशोगाथा

Goat Farming : नियोजनबद्ध शेळीपालनातून मिळवले यश

पुणे जिल्ह्यातील शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथील संतोष सोमोशी यांनी सोजत जातीच्या शेळीपालनाचा व्यवसाय ‘सात्विक गोट फार्म’ नावाने आकारास आणला आहे. बंदीस्त व मुक्त गोठा (फार्म) पध्दतीची नियोजनबद्ध रचना, स्वच्छ वातावरण व एकूण नेटके व्यवस्थापन ठेवले. ग्राहकांचे ‘नेटवर्क’ वाढवून विक्री व्यवस्था उभारत वर्षाला काही लाखांची उलाढाल करण्यापर्यंत संतोष यांनी यश मिळवले आहे.

गणेश कोरे

पुणे जिल्ह्यात शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथील संतोष सोमोशी यांची सात एकर शेती आहे. ऊस, कांदा, सोयाबीन (Soybean), फुले आदींची शेती (Flower Farming) ते करतात. शेतीला पूरक म्हणून सुमारे नऊ वर्षे त्यांनी म्हैसपालन (Buffalo Rearing) आणि दुग्धव्यवसाय (Dairy Business) केला. या काळात टप्प्याटप्प्याने ३० म्हशींपर्यंत गोठा विस्तारही केला. मात्र दुधाच्या दरातील चढउतार, पशुखाद्याचे (Animal Feed) सततचे वाढणारे दर व एकूण खर्चामुळे व्यवसायातील आर्थिक गणित बसेना.

नाईलाजाने हा व्यवसाय थांबवला. दरम्यान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी ‘गोट फार्म’ उभारला होता. त्यापासून संतोष प्रेरित झाले. अधिक सर्वेक्षण व अभ्यासाअंती हाच व्यवसाय सुरू करण्याचे निश्‍चित केले. हे वर्ष होते २०१६ चे. गोठ्याचेच रूपांतर ‘गोट फार्म’ मध्ये केले. त्यासाठी सुमारे साडेतीन लाखांचा खर्च केला. यामध्ये अर्ध बंदिस्त दोन मजली शेड उभारले. राजस्थान येथून सोजत जातीच्या १०० शेळ्या आणि चार नर पिल्ले आणून व्यवसायास सुरुवात केली.

व्यवसायातील ठळक बाबी

- ४३ बाय ३५ फुटांचे अर्धबंदिस्त तर ६० बाय ३३ फुटाच्या मुक्त संचार शेडची उभारणी केली आहे.

मोठ्या शेळ्या आणि बोकडे यांच्यात भांडण होऊन ते जखमी होण्याची शक्यता असते. मोठ्या वयाच्या शेळ्यांमुळे पिलांना पुरेसे खाद्य मिळत नाही. त्यासाठी वयानुंसार वेगवेगळे म्हणजे मोठे ३, मध्यम २ आणि लहान दोन कप्पे किंवा विभागणी केली आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने खाद्य, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापन तसेच पिल्लांची देखरेख ठेवणे सोपे झाले आहे. साहजिकच पिल्लांना पुरेसा आहार मिळाल्याने वाढ चांगली होऊन वजन वाढण्यास मदत झाली आहे.

-सकाळी ८ वाजता शेळ्यांना बंदिस्त शेडमधून मुक्तसंचार शेडमध्ये सोडले जाते. त्यावेळी गोळीपेंडचा खुराक दिला जातो. त्यानंतर शेडची स्वच्छता होते. साधारण १० वाजता चारा आणि पाणी दिले जाते. पुन्हा जनावरांना बंदिस्त शेडमध्ये बांधले जाते. संध्याकाळी चार वाजता पुन्हा मुक्त संचार शेडमध्ये सोडले जाते.

-वर्षभर ओला आणि सुका चारा उपलब्ध व्हावा यासाठी बांधावर सुबाभूळ (५० झाडे), तुती, साग, शेवरी आणि शेवगा यांची प्रत्येकी पाच झाडे लावली आहेत. लसूणघास, नेपिअर गवत यांची अर्धा

एकरावर लागवड केली आहे. झाडांचा पाला दररोज हिरवा चारा म्हणून उपयोगात येतो. सुक्या चाऱ्यात कडबा, सोयाबीन, हरभरा, तुरीचा भुस्सा दिला जातो.

-वर्षभर वेगवेगळया रोगांसाठी पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केले जाते. त्यामुळे शेळ्या आजारास बळी पडण्याची प्रमाण कमी होते. ‘पीपीआर’ लस मे ते नोव्हेंबर दरम्यान, आंत्रविषार मे, लाळ्या खुरकूत सप्टेंबर तर धनुर्वाताची लस डिसेंबरमध्ये दिली जाते. तीन महिन्यांतून एकदा तोंडावाटे जंतनाशकाची मात्रा दिली जाते. ती शेळी- बोकडाच्या वय आणि वजनानुसार ठरविली जाते. भूक आणि वजन वाढीसाठी टॉनिक दिले जाते. दैनंदिन आहारात मिनरल मिश्रण दिले जाते.

विक्री व्यवस्था

पिलांचे संगोपन १० ते १२ महिने केल्यानंतर आणि वजन ७० ते १०० किलोपर्यंत झाल्यानंतर बोकड विक्रीयोग्य होते. दोन दाती किंवा त्याहून अधिक दात असलेल्या बोकडांना बकरी ईदसाठी मागणी असते. सन २०१७ मध्ये मुंबई- मस्जिद बंदर येथे या सणावेळी संतोष यांनी बाजारात स्टॉल उभारला. त्यात ७० बोकडांची विक्री केली. तर कोंढवा (पुणे) येथे २०१८ मध्ये उभारलेल्या स्टॉलमध्ये ६० बोकडांची विक्री झाली होती. साधारण ४००, ४५० ते ५०० रुपये प्रति किलो (जीवंत बोकड)असा दर मिळाला.

शेडमध्येच पैदास व विक्री

कोरोना संकटात बोकडांचे बाजार बंद होते. यामुळे विक्रीसाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या. या दरम्यान स्थानिक पातळीवरच व्यापाऱ्यांना आणि काही घरगुती ग्राहकांना बोकडांची विक्री केली. तर बोकड आणि शेळ्यांची घरीच पैदास केली. पुढे १५ बोकड आणि सात शेळ्यांची विक्री करण्यात यश आले. आता ही पैदास कायम ठेवली असून सध्या ३० शेळ्या आणि ६ ते ७ बोकड (पिल्ले) आहेत.

घरच्या सदस्यांचे योगदान

दैनंदिन व्यवस्थापनात आई कृष्णाबाई आणि पत्नी कविता यांची मोठी मदत होते. सकाळी शेड स्वच्छ करणे, शेळ्यांना मुक्तसंचार जागेत सोडणे, ओला- सुका चारा देऊन बंदिस्त शेडमध्ये आणणे या कामांची मुख्य जबाबदारी दोघीजणी एकमेकांच्या समन्वयातून करतात.

लेंडीखत व कोंबडीपालन ः

व्यवसायातून वर्षभरात सुमारे १० ट्रॉली लेंडीखत उपलब्ध होते. त्याचा शेतीतीच वापर होतो. त्याची विक्री केल्यास प्रति ट्रॉली सरासरी ६ हजार रुपये उत्पन्न मिळण्याची संधी आहे. शेड दुमजली असल्याने तळमजल्यावरील जागेचा पुरेपूर वापर करीत तेथे देशी कोंबडीपालन सुरू केले आहे. सध्या १० ते १२ कोंबड्या आहेत. येत्या काळात ही संख्या १०० पर्यंत नेण्याचे नियोजन आहे.

-संतोष सोमोशी- ९८५०६०२५९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT