Silage Production Agrowon
यशोगाथा

Silage : मुरघास निर्मिती व्यवसायाची निवड ठरली सार्थ

पुणे जिल्ह्यातील करंदी (ता. शिरूर) येथील प्रदीप खेडकर यांनी खासगी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर शेती विषयातील कोणता व्यवसाय करावा या शोधात असताना मुरघास निर्मिती प्रकल्पाचा चांगला पर्याय त्यांच्यापुढे आला. सुमारे सात वर्षांपासून टप्प्याटप्प्याने प्रयत्नपूर्वक प्रगती करीत महिन्याला वार्षिक दोन हजार टनांपर्यंत उत्पादन व विक्री करण्यापर्यंत मजल मारत या व्यवसायात प्रदीप यांनी स्थिरस्थावरता मिळवली आहे. व्यवसाय निवडही सार्थ ठरली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील करंदी येथील प्रदीप खेडकर ‘कार्पोरेट’ क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीत सुरक्षाविषयक (सेक्युरिटी) क्षेत्रात नोकरीस होते. स्वतःचे काहीतरी करण्याचे ठरवून त्यांनी खासगी कंपन्यांना सुरक्षारक्षक व मनुष्यबळ पुरवठा सुरू केला. त्यांची आठ एकर शेती आहे. ते कृषी पदवीधरही आहेत. त्यांना मधुमका शेतीत (Sweet Maize Framing) रस होता. धान्यासोबत मक्याचा चाराही उपलब्ध होतो. सध्या अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने चाराटंचाईदेखील (Fodder Shortage) उत्पन्न झाली आहे. त्या अनुषंगाने त्यांना मित्राने मुरघास निर्मिती (Silage Production) व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.

व्यवसायाची पायाभरणी

या व्यवसायाचा पर्याय आश्‍वासक वाटल्यानंतर प्रदीप यांनी गावापासून दूर भाडेतत्त्वावर जागा घेतली. सुरुवातीला स्थानिक पुरवठादारांकडून मका घेण्यास सुरुवात केली. मात्र गुणवत्तेबद्दल हमी नव्हती. पुरवठादारांवर अवलंबून राहावे लागे. नियमित पुरवठ्याबाबत मर्यादा येत होत्या. अशावेळी थेट शेतकऱ्यांकडून मका घेऊन व्यवसायात सुलभता आणण्याचे ठरविले. शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार होता. प्रत्येक टप्प्यात अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांना देखील मुरघास उत्पादनाकडे वळवणे मोठे आव्हान होते. प्रदीप यांनीही आपल्या शेतात मका लागवड केली. त्यांना चांगले उत्पादन मिळाल्यानंतर गावातील माउली नप्ते व त्यांच्यापाठोपाठ अन्य शेतकरीही त्याकडे वळले. टप्प्याटप्प्याने मका क्षेत्रात वाढ होत गेली.

शेतकऱ्यांना सेवा

सुरुवातीला प्रयोग म्हणून दहा शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम सुरू केले. योग्य मार्गदर्शन, बियाणे ‘क्रेडिट’ वर देणे, लागवडविषयक मार्गदर्शन, वेळेत काढणी, वेळेत ‘पेमेंट’ आणि सर्वांत महत्त्वाचे योग्य दर अशा सुविधा शेतकऱ्यांना दिल्या. त्यातून शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास तयार झाला. आज पंचक्रोशीतील सुमारे ५० ते १०० शेतकरी मका उत्पादन घेत असून, ते प्रदीप यांच्याशी जोडले आहेत. काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर प्रति टन दोन हजार रुपये दराने त्यांच्याकडून मका खरेदी केला जातो.

गुणवत्ता जपली

गुणवत्ता व सेवा या दोन बाबी उत्तम असतील तर व्यवसायात प्रगतीला चालना मिळते. आपल्या ग्राहकांना चाऱ्याची उत्तम प्रत देण्याच्या दृष्टीने त्यावर प्रक्रिया सुरू केली. मका चिकात येते तेव्हा तोडणी होते. कामगारांकडून प्रकल्प केंद्रावर आणलेल्या मक्याची यंत्राच्या साहाय्याने बारीक कुट्टी केली जाते. गूळ, मीठ, खनिज मिश्रण व जिवाणू संवर्धक वापरून यंत्राच्या साह्याने दाब देऊन ५० किलोच्या यूव्ही (अतिनील किरण संरक्षित बॅग) संरक्षित बॅगेत मुरघास हवाबंद करून ठेवण्यात येतो. सुमारे ४० दिवसांनंतर तो वापरण्यासाठी उपलब्ध होतो. प्रदीप यांनी आपल्या दोन एकरांत हा प्रकल्प सुरू केला आहे. कोव्हिड काळात एकही दिवस सुटी न घेता अनेक गोशाळा व पशुपालकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरला.

हा चारा ग्राहकांच्या घरापर्यंत पुरवण्याची हमी घेण्यात येते. प्रथिने, तंतुमय पदार्थ, शुष्क घटक आदी घटक असलेला हा चारा जनावरांसाठी पौष्टिक ठरला आहे. त्याच्या वापरामुळे पशुखाद्य व कडब्यावरील ख़र्चही कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसोबत वर्षभरासाठी हमीभाव दिलेला असतो व लागवडीपासून काढणी पर्यंत सर्व नियोजन केलेले असते. दुभत्या जनावरांना दररोज सुमारे १० ते १२ किलो तर शेळीला दररोज एक किलो चाऱ्याची गरज भासते. अर्थात, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांना ही नेमकी गरज निश्‍चित करता येते.

स्थानिक तरुणांना रोजगार :

प्रदीप यांनी व्यवसायासाठी १२ ते १५ जणांची ‘टीम’ तयार केली आहे. यामध्ये स्थानिक व अन्य राज्यांतील कामगारांचाही समावेश आहे. ट्रॅक्टर, बॅगिंग, पॅकिंग अशी सारी यंत्रणा सज्ज केली आहे. दररोज सुमारे १० ते १२ टन मका तोडणी होते. ट्रॅक्टरमध्ये भरून मुरघास केंद्रावर आणला जातो. या व्यवसायामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

विक्री व्यवस्था

सुरुवातीला नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने आपल्या कृषी प्रदर्शनात प्रदीप यांना स्टॉल उभारण्याची संधी दिली. त्या वेळी असंख्य शेतकऱ्यांसोबत संपर्क तयार झाले. हळूहळू शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. अर्थात, हे काम आव्हानाचे होते. मात्र प्रयत्न व चिकाटी यातून आज पुणे जिल्हयासह, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि गुजरातपर्यंत मुरघासाची विक्री केली जाते. प्रति ५० किलो बॅगेचा ३२५ रुपये दर आहे. दर महिन्याला सुमारे १५० ते २०० टन तर वर्षभरात मिळून सुमारे दोन हजार टन चाऱ्याची विक्री होते. या व्यवसायातून सुमारे २० टक्के नफा मिळतो.

दुष्काळात मोठा आधार

पुणे, नगर व अन्य जिल्ह्यांतही दहा वर्षांत तीन ते चार वेळा तीव्र दुष्काळ पडला. चाराटंचाईमुळे पशुधन धोक्यात आले. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागल्या. अशा काळातही मुरघास तंत्रज्ञान वापरामुळे असंख्य शेतकऱ्यांना दुष्काळात चाऱ्याचा आधार मिळाला. तीन लाखांपेक्षा अधिक दुभती जनावरे वाचली. दुग्ध व्यवसाय टिकवता आला.

संपर्क ः प्रदीप खेडकर, ८७८८५६९६४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT