Pomegranate Farming Agrowon
यशोगाथा

Pomegranate Farming : दुष्काळात डाळिंबातून केली अवघड वाट सोपी

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Success Story of Pomegranate Farming : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यात वाकूळणी गाव आहे. येथील भगवानराव अवघड यांची साडेआठ एकर शेती आहे. आई सुभद्राबाई, वडील सुखदेवराव, पत्नी रंजना, मुलगा जय व मुलगी भक्‍ती असं सहा जणांचं त्यांचं कुटुंब आहे. त्यापैकी भगवानराव पत्नी व चिरंजिवासह शेतीचं संपूर्ण व्यवस्थापन बघतात.

पूर्वी ते मोसंबी उत्पादक होते. सन २०१२ च्या दुष्काळात सहा एकरांतील मोसंबीची बाग गेली. पण ही बाब धीरानं व हिमतीनं घेत पीकबदल करण्याचा निर्णयघेतला. अभ्यासातून डाळिंब हे पीक दुष्काळी स्थितीत व बाजारपेठेतील मागणीच्या स्थितीतअधिक आश्‍वासक वाटलं.

बागविस्तार

सुरुवातीला बाग उभारणीची सर्वतोपरी काळजी घेतली. खोल नांगरणी करून पाळ्या देत जमीन चांगली केली. सन २०१२ च्या दुष्काळानंतर दोन एकरांत १४ बाय ८ फूट अंतरावर व २०१४ मध्ये पुन्हा अशी टप्प्याटप्प्याने लागवड वाढवली.

अलीकडे २०२२ मध्ये अडीच एकरांवर नवी लागवड केली. आजमितीला उत्पादनक्षम सहा एकर व नवी अशी मिळून साडेआठ एकर डाळिंब क्षेत्र आहे. भगवानरावांनी स्थानिक समस्या लक्षात घेऊन मृग बहराची निवड केली आहे.

कारण या बहारातील फळे जेव्हा बाजारात येतात त्या वेळी त्यांची एकूण आवक तुलनेने कमी असते. शिवाय पावसाळा काळात शेतातील वाहतूक थोडी अडचणीची असते.

व्यवस्थापन

फळांची नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये काढणी झाल्यानंतर डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढील व्यवस्थापन सुरू होते. बागेच्या विश्रांतीचा काळ सुरू होतो. तो दोन महिन्यांचा असतो. बागेला जिवामृत स्लरी देण्यावर अधिक भर असतो. यात पीएसबी, केएमबी या जिवाणूंचा वापर होतो.

महिन्यातून दोन वेळा प्रति झाड एक लिटर याप्रमाणे एकरी २०० ते ३०० लिटरपर्यंत स्लरी देण्यात येते. मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर होतो. बागेच्या विश्रांती काळात खोडकिडा व मर यांना प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक व बुरशीनाशक यांच्याद्वारे खोड स्वच्छ धुतले जाते. कोरफड स्लरीचाही एकरी १० लिटर या प्रमाणे वापर होतो.

सतत पावसात फवारणी शक्‍य नसल्यासकॉपर डस्टची धुरळणी केली जाते. ऑक्‍टोबरच्या उन्हापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक झाडावर आच्छादनाचा वापर होतो. फळ काढणीला येण्यापूर्वी महिनाभर आधी सरकी पेंड स्लरी, पोटॅश जिवाणू यांचा वापर होतो. थंडीत कॅल्शिअम, बोरॉनची फवारणी होते.

पंधरा १५ मार्चपासून बाग ताणावर सोडली जाते ती १५ मेपर्यंत. विश्रांती काळातील व्यवस्थापनहे काडी पक्‍व होण्यासाठी तसेच काडीत अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरते असे भगवानराव सांगतात. वीस मेच्या दरम्यान ताण तोडण्यासाठी ठिबकद्वारे पाणी दिलं जातं. शिवाजीराव घावटे यांचे बहुमोल मार्गदर्शन सातत्याने मिळते.

पाणी व्यवस्थापन

दोन विहिरी आहेत. सन २००९ मध्ये शेततळे घेतले आहे. मृग बहर असल्याने मेच्या सुरुवातीला पाण्याची गरज भासते. शेततळे व विहिरीद्वारे ती पूर्ण होते. पावसाळा काळात पाऊस कमी पडल्यास दोन दिवसाआड दीड ते दोन तास ते ठिबकने पाणी दिले जाते.

एका बागेत आठ लिटर प्रति तास ‘डिस्चार्ज’ असलेले ऑनलाइन ड्रीपर’ तर दुसऱ्या बागेत दोन लिटर प्रति तास ‘डिस्चार्ज’ असलेल्या इनलाइन ड्रीपरचा वापर केला आहे. पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचे प्रयत्न आहेत. दोन वर्षे पाण्याची कमतरता आल्याने बंडलरूपी उसाच्या पाचटाचे आच्छादन करूनही बाष्पीभवन टाळण्याचा प्रयत्न केला.

मजूर व्यवस्थापन

भगवानरावांच्या पत्नी रंजना यांच्याकडे मजुरांच्या साह्याने केल्या जाणाऱ्या सर्व कामांची जबाबदारी आहे. शेतीतील सर्वांत जिकिरीचे व अवघड असणारे हे काम रंजनाताई महिलांसोबत स्वतः: राबून कौशल्याने पार पाडतात.

कोरोनाच्या संकटात मजूर मिळत नसल्याने भगवानराव, रंजना व मुलगा जय यांनी स्वतः सगळी कामे करून बागेच्या संगोपनात कोणताही खंड पडू दिला नाही. डाळिंबाव्यतिरिक्त सोयाबीन, हरभरा अशी पिकेही असतात.

उत्पादन, बाजारपेठ

जुन्या झाडांमधून एकरी १५ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. अलीकडील तीन वर्षांत एकूण उत्पादनक्षम बागेतून ३६ ते ५२ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. तर किलोला १०० ते १३० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. दोन वेळा ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन निर्यातदारांच्या माध्यमातून परदेशी निर्यात करण्याची संधीही भगवानरावांना मिळाली.

सन २०१८ व २०१९ मध्येज्या वेळी देशांतर्गत बाजारात ५० ते ६० रुपये प्रति किलो दर होता. त्या वेळी निर्यातीसाठी १२० रुपये दर भगवानरावांना मिळाला. वाकूळणीत सुमारे ३५ ते ४० जण डाळिंब उत्पादक आहेत. त्यांपैकी ७ ते ८ जणांचे डाळिंब निर्यातीसाठी पाठवण्यात आले. अलीकडील काळात देशांतर्गत बाजारातच चांगले दर मिळू लागल्याने निर्यातीची गरज न आल्याचे भगवानराव सांगतात.

भगवानराव अवघड ७३५०३२११३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT