Nilesh Shinde Success Story
Nilesh Shinde Success Story Agrowon
यशोगाथा

Groundnut Farming : भुईमूग शेतीत प्रगतिशील होण्याकडे वाटचाल

श्यामराव गावडे

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील युवा शेतकरी नीलेश कमलाकर शिंदे (Nilesh Shinde) यांनी अभ्यास व धडपडीवृत्तीतून प्रगतिशील शेतकरी होण्याकडे वाटचाल केली आहे. २०२१-२२ या वर्षी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत खरीप भुईमूग उत्पादनात (Groundnut Production) त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. हा प्रयोग २० गुंठ्यांत केला असला तरी हेक्टरी उत्पादकता ७२ क्विंटल २९० किलो अशी मिळाली आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील पेठ हे मुख्य गाव व त्यापुढे तीन किलोमीटरवर वाघवाडी आहे. या ठिकाणी नीलेश शिंदे या युवा शेतकऱ्याची ७२ गुंठे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यामुळे नोकरी निमित्त कुटुंब बाहेरगावी राहिले. सेवानिवृत्तीनंतर ते पुन्हा गावी येऊन शेतात घर बांधून राहू लागले. अलीकडेच वडिलांचे निधन झाले. नीलेश यांच्यावर घर व शेतीची जबाबदारी आली. घराशेजारीच वाघवाडी फाटा येथे तालुका कृषी विभागाचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी असलेली शेतकऱ्यांची वर्दळ, शेतीशाळा नीलेश यांच्या पाहण्यात येत. त्यातून नव्या तंत्रांची माहिती होऊ लागली. आपणही शेतीत प्रयोग करावे असे त्यांना वाटू लागले. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी त्यांची धडपडीवृत्ती, चिकाटी पाहिली. मग संपूर्ण पाठबळ व मदत दिली. कृषी विभागाच्या काही योजना शेतावर राबविल्या.

पीक स्पर्धेत सहभाग

कृषी विभागाच्या प्रेरणेने नीलेश यांनी मागील वर्षी (२०२१- २२) राज्यस्तरीय खरीप भुईमूग पीक स्पर्धेत भाग घेतला. यात राज्यातील १२ शेतकऱ्यांचा समावेश होता. नीलेश सुमारे तीन ते चार वर्षांपासून १० ते २० गुंठ्यात हे पीक घेतात. स्पर्धेसाठी त्यांनी सुरुवातीपासूनच चांगली तयारी केली. वीस गुंठे क्षेत्र निवडले. व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी पुढील प्रमाणे.

-कृषी विभागाच्या मदतीने गुजरातमधील वाण मिळाले.
-जमीन मध्यम असून चांगली मशागत केली.
-अडीच ते तीन ट्रॉली शेणखताचा वापर. रोटरच्या साह्याने खत एकजीव केले.
-सुमारे दोन टन जिप्समच वापर.
-पॉवर टिलरच्या साह्याने एक मीटर रुंदीचे गादीवाफे (बेड) तयार केले. डीएपी एक बॅग, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि गंधक प्रत्येकी पाच किलो असा वापर.
-जिवाणूखताची बीजप्रक्रिया. आऱ्या अधांतरी राहू नयेत म्हणून बेडच्या दोन्ही बाजूंना
दहा सेंटिमीटर अंतर सोडले. १७ जूनच्या दरम्यान टोकणी. दोन ओळींत ३० सेंटिमीटर तर दोन रोपांतील अंतर दहा सेंटिमीटर ठेवले.
-तिसाव्या व साठाव्या दिवशी १९-१९-१९ व सूक्ष्म अन्नद्रव्यांची व शेंगा भरण्याच्या वेळी ०-०-५० खताची फवारणी.
-दोन भांगलणींद्वारे शेत तण विरहित ठेवले. सुमारे ९५ ते १०० व्या दिवशी काढणी.

उत्पादन व उत्पन्न

पीकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला. नीलेश यांनी हेक्टरी ७२ क्विंटल २९० किलो उत्पादनासह (ओले) राज्यात पहिला क्रमांक मिळवण्याचे जाहीर करण्यात आले. वीस गुंठ्यांत हे उत्पादन
सुमारे २४ क्विंटल होते. प्रत्यक्षात त्याआसपास मिळाले आहे. क्विंटलला सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. एकरी सुमारे २० हजार रुपये खर्च आला. पुरस्काराचे वितरण अद्याप व्हायचे आहे. मात्र नीलेश प्रयत्नांबाबत समाधानी आहेत.


प्रयोगातून समजते उत्पादनाची क्षमता

भुईमुगाची अर्ध रब्बीत (ऑगस्टमध्ये) लागवड करून दरवर्षी एकरी १२ ते १५ व कमाल १८ क्विंटल (वाळलेले) उत्पादन घेण्यात केहाळ (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील मधुकरराव घुगे राज्यात प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले, की पीकस्पर्धेतील प्रयोग व त्यांच्या उत्पादनाचे काही गुंठे क्षेत्रात मोजमाप होते. तथापि, त्यातून एकरी उत्पादनक्षमता लक्षात येते. त्यानुसार व्यवस्थापन करून तेवढे उद्दिष्ट गाठता येते.

भाजीपाला ठरतोय आधार

शिंदे कुटुंबाला भाजीपाला शेतीचा मोठा आर्थिक आधार लाभला आहे. दहा गुंठे क्षेत्रावर कारली, दोडका, मेथी, पालक, मिरची, वांगे, गवार आदी आठ प्रकारच्या भाज्यांची बारमाही शेती ते करतात.
रस्त्याकडेलाच घर असल्याने टेबल मांडतात. हा परिसर इस्लामपूर शहरापासून दोन किलोमीटरवर
असल्याने ‘मॉर्निंग वॉक’साठी येणारे अनेक नागरिक ताजा भाजीपाला खरेदी करूनच घरी परततात.
त्यातून रोजचे तीनशे ते चारशे रुपयांपर्यंतचे उत्पन्न हाती येते. कोरोनाच्या काळात अशीच विक्री फायदेशीर ठरली. फळबाग लागवड योजनेतून बांधावर शेवगा लागवड केली आहे. एक म्हैस असून, ग्राहकांना प्रति लिटर ६० रुपये दराने दुधाचे रतीब घातले जाते. त्यातूनही उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळाला आहे.

ऊसशेती व सुपर केन नर्सरी

कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार ऊस तज्ज्ञ बाळकृष्ण जमदग्नी यांनी विकसित केलेल्या
सुपर केन नर्सरीचा प्रयोग सुरू केला आहे. उसातला त्यांचा अनुभव अलीकडीलच आहे. दर्जेदार रोपे तयार करून उसाचे एकरी उत्पादन वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यापूर्वी एकरी
५५ टनांपर्यंत उत्पादन ते घेत. स्वतःकडील रोपे वापरून मागील वर्षी एकरी ६८ टन उत्पादन घेतले आहे. आई रेखा व पत्नी मनीषा यांची मोलाची मदत होते. कृषी विभागाचे विकास पाटील, संजय खारगे, सुनीता शिवदास, तानाजी पाटील यांचे सहकार्यही लाभले आहे.

नीलेश शिंदे, ९८८१७८८१२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain : राज्यात पावसाचे वातावरण कायम; देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

Bungalow Dispute : पोलीसाने बंगला बांधला, पण...

World Bee Day : मधमाशी संवर्धन काळाची गरज

Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे...

Soybean Varieties : मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्यपूर्ण सोयाबीन वाण

SCROLL FOR NEXT