Land Dispute : हरीला नोकरी मिळाल्यानंतर आठ दिवसांतच पोलीस चाळीमध्ये दोन खोल्यांचे शासकीय निवासस्थान मिळाले. नोकरीचे ठिकाण अतिशय जवळ आणि राहण्याची सोय यामुळे हरी अतिशय लवकरच मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात रुळला. पहिली नोकरी मिळाल्यावर जसा सगळ्यांना आनंद होतो तसाच आनंद हरीला झालेला होता.
पहिल्या पगारातून आईला साडी, वडिलांना नवे कोरे धोतर घेऊन जेव्हा हरी गावी गेला तेव्हा कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. हळूहळू नोकरीचे दिवस सरत होते तसतशी हरीची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. थोड्या दिवसातच हरीचे लग्न जमले आणि मुलगा मुंबईला सरकारी खात्यात नोकरीला आहे म्हटल्यावर अतिशय धूमधडाक्यात हरीचे लग्न झाले. त्याकाळी हुंड्यामध्ये आलेला मोठा रेडिओ आता त्याच्या मुंबईच्या खोलीच्या खिडकीमध्ये दिवस रात्र गात होता.
दिवाळीमध्ये जेव्हा हरी घरी आला त्यावेळी आपल्या शेतात काय काय करता येईल, याची त्याने वडिलांबरोबर चर्चा केली. पहिल्यांदा तर विहीर खोदायला घेतली. एक विहीर खोदायला दोन हजार रुपये खर्च होत होता. तब्बल सहा महिने काम चालले आणि विहिरीचे सगळे पैसे हरीने दिले होते. विहिरीला चांगले पाणी लागले आणि सगळ्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. हरीच्या नोकरीमुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारत होती आणि त्याची जाणीव आजूबाजूच्या संगेसोयऱ्यांना, भाऊबंदकीला व्हायला लागली होती.
हरीचे वडील आणि आई आता नवे नवे स्वप्न पाहू लागले. पुढच्यावेळी हरी गावी आला की भैरोबाच्या यात्रेसाठी सगळ्यात जास्त वर्गणी द्यायची गळ वडिलांनी घातली. हरीचा पण नाइलाज झाला. त्या काळी १०१ रुपये वर्गणी हरीने दिली. हरीचा धाकटा भाऊ गिरीश नुकताच दहावी पास झाला होता. अकरावीला त्याला तालुक्याला घालायचे का, मुंबईला हरीकडे ठेवायचे यावर कुटुंबामध्ये बरीच चर्चा झाली. शेवटी खर्च कमी होण्यासाठी व काहीतरी हातभार तुमच्या कामाला पण लागेल असा विचार करून गिरीशचे शिक्षण मुंबईमध्ये हरीच्या घरी राहून करायचा निर्णय झाला.
हरी पण अतिशय खुश झाला.फक्त हरीला नोकरीमध्ये आठ वर्षे झाली होती. मुंबईच्या शिस्तबद्ध आयुष्याला हरी रुळला होता. हरीच्या बायकोची थोडी कुरबुर होती. परंतु हरी मात्र बायकोच्या माहेरच्या घरी पण लक्ष देऊ लागला होता. बघता बघता हरीचा सर्वांत धाकटा भाऊ गणपत सुद्धा शिकायला मुंबईला हरीच्या घरी आला. दोन्ही भावांचे शिक्षण आणि नोकरी मिळेपर्यंतचा सगळा खर्च हरीने केला होता. धाकटा गणपत थोड्या दिवसांत तात्पुरती नोकरी सोडून गावी परतला आणि त्याने शेती करायचे ठरवले.
हरीची बघता बघता ३५ वर्षे सेवा होत आली. हरी आता सब इन्स्पेक्टर झाला होता. ते त्याचे शेवटचे प्रमोशन. दोन वर्षे नोकरी राहिली तेव्हा त्याने गावी बंगला बांधायला घेतला. सात-आठ महिन्यांत बंगला बांधून झाला. आता हरी गावी राहायला येणार याची जाणीव त्याच्या भावांना झाली. त्याच्या भावाने बंगला बांधून झाल्यावर विजेचे कनेक्शन घ्यावे लागेल, असे सांगून त्याच्याकडून एक कुलमुखत्यार लिहून घेतले. बांधलेल्या बंगल्यामध्ये थोड्या दिवसांनी विजेचे कनेक्शन तर आले.
परंतु प्रत्यक्ष जेव्हा हरी रिटायर झाला तेव्हा मात्र पुढच्या आठवड्यात गावी ट्रकने सामान आणायचा विचार करीत होता. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्या बंगल्याला कुणीतरी कुलूप लावले असे त्याच्या भावाने त्याला सांगितले. हरीला आता काहीच कळत नव्हते. तो थेट पोलीस चौकीत गेला. पोलीस कर्मचारी म्हणून त्याला इतर पोलिसांनी सहकार्य केले. परंतु त्याच्याकडे बंगल्याची कागदपत्रे मागितली.
हरीच्या जवळ जमिनीच्या बद्दल आणि बंगल्याबद्दल कसलीच कागदपत्रे नव्हती. भावाला विचारले तेव्हा ज्या जागेवर बंगला बांधला ती जमीन भावाच्या नावावर असल्याचे कळून चुकले. शिवाय विजेच्या कनेक्शनसाठी जे कुलमुखत्यार त्याने करून दिले होते त्याआधारे भावाने हा संपूर्ण बंगला त्याच्या स्वतःच्या जावयाला विकून टाकल्याचे स्पष्ट झाले. आयुष्य पोलिसामध्ये काढलेल्या हरीचा एफआयआर सुद्धा आता दाखल होऊ शकत नव्हता!
मागच्या पिढीमध्ये असंख्य अधिकाऱ्यांनी व विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या जमिनी मेव्हणीच्या नावाने घेतल्या त्या जमिनी पण परत आल्या नाहीत आणि मेव्हणी पण परत घरी आली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.