Geranium Oil Extraction Agrowon
यशोगाथा

Geranium Oil Extraction : जिरॅनियम तेलकाढणीचे सुरू केले फिरते युनिट

उच्चशिक्षित नवनाथ पाठक व सोमनाथ वांढेकर या मामा-भाच्याने नगर जिल्ह्यातील घाटसिरस (ता. पाथर्डी) येथे जिरॅनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड करून तेलनिर्मिती सुरू केली आहे. त्यापुढे जाऊन शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन तसेच तेलकाढणीची (Geranium Oil Extraction) दोन फिरती युनिट्स तयार करून त्यांना जागेवरच तेलकाढणीची सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यातून तेलाला ‘मार्केट’ व विक्री सुकर झाली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

ने हमीची वाट सोडून जोखीम वा आव्हान असलेल्या वेगळ्या क्षेत्राची वाट पकडून त्यात काम करणे सोपे नाही. मात्र जिद्द, व्यवस्थापन कौशल्य व एकमेकांच्या मदतीने ते साध्य होऊ शकते. मामा-भाच्याने ते करून दाखवले आहे. नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध वृद्धेश्‍वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटसिरस (ता. पाथर्डी) गाव आहे.

शाश्‍वत पाण्याचा स्रोत (Sustainable Water Source) नाही. अशा गावातील सर्वसाधारण कुटुंबातील नवनाथ सुखदेव पाठक (वय सुमारे ३४ वर्षे) हा मामा असून, सोमनाथ वांढेकर (वय वर्षे २२) हा भाचा आहे. नवनाथ यांचे बी.टेक. (ॲग्री) पर्यंत शिक्षण झाले. केवळ अडीच एकर शेती. त्यामुळे बियाणे कंपनीत (Seed Company) औरंगाबाद येथे ते नोकरी करतात. ‘बीएस्सी’ झालेले सोमनाथ पूर्णवेळ शेती करतात.

जिरॅनियम शेतीची वाट

नोकरीत असतानाच शेतीशी संबंधित व्यवसाय करण्याची नवनाथ यांची धडपड सुरूच होती. शिक्षण शेतीशी निगडित होते. शिवाय वेगळी वाट खुणावत होती. त्या शोधात असतानाच ऑनलाइन तसेच सांगली, सातारा व अन्य भागात जिरॅनियम या सुगंधी वनस्पतीची शेती पाहण्यात आली.

साबण, सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम उद्योग क्षेत्रात या वनस्पतीच्या तेलाला मागणी असल्याचे समजले. अधिक अभ्यासानंतर या उद्योगात उतरण्याचे नक्की केले. लखनौ येथील केंद्रीय सुगंधी व औषधी वनस्पती संस्थेत चार दिवसांचे प्रशिक्षण घेतले. चार वर्षांपूर्वी लागवड केली. आज दोन एकर क्षेत्र त्यासाठी दिले आहे. तीन वर्षांपूर्वी तेल काढणीचे युनिटही उभारले. तेलविक्रीला मुंबई येथील कंपनी खरेदीदार स्वरूपात मिळाली.

तेलकाढणी उद्योगाचा विस्तार

खरेदीदारांची गरज जास्त तेलाची असल्यास केवळ स्वतःपुरते उद्योगात राहून उपयोगाचे नाही हे नवनाथ यांनी ओळखले. त्यांनी कच्चा माल अधिकाधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अन्य शेतकऱ्यांना जिरॅनियम शेतीबाबत प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. त्यातून आज शिराळ, जवखेड, पाथर्डी, मोहोद तसेच औरंगाबाद, जालना, सिल्लोड, बीड, जळगाव आदी भागांत एकूण ६० ते ७० एकरांवर जिरॅनियम लागवड झाली आहे. या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते. शनिवार, रविवार सुट्ट्यांमध्ये व इतर वेळी फोनद्वारे उद्योगाचे व्यवस्थापन नवनाथ पाहतात. ‘फिल्ड’वरील जबाबदारी सोमनाथ सांभाळतात.

फिरते युनिट

लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी जागेवरच तेलकाढणीची सुविधा तयार केली. त्यासाठी नवनाथ यांनी प्रत्येकी साडेचार लाख रुपये किमतीची तेलकाढणीची दोन युनिट्स घेतली. प्रति अडीच तासांत सुमारे सहाशे किलो पाल्यापासून तेल काढण्याची युनिटची क्षमता आहे. संबंधित शेतकऱ्यांकडे मोठ्या वाहनातून युनिट (यंत्र) नेण्यात येते.

तेथे युनिट जोडणी होते. त्यानंतर तेलकाढणी प्रक्रिया सुरू होते. एक एकर जिरॅनियमपासून तेलकाढणीसाठी तीन ते चार दिवस लागतात. त्यासाठी यंत्रासोबत आलेल्या व्यक्ती शेतातच वास्तव्य करतात. अशा रीतीने बांधावरच ही प्रक्रिया केल्याने तेलाचा ताजेपणा टिकून राहतो. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळही वाचतो. त्यांना असे युनिट उभारण्याची म्हणजेच त्यासाठी गुंतवणूक करावी लागत नाही.

तेलाचा वार्षिक ‘आउटपूट’

जिरॅनियम लागवडीनंतर साधारण तीन ते चार महिन्यांनी पाला कापणीस येतो. एक एकर लागवड करण्यासाठी दहा हजार रोपे लागतात. त्यासाठी पन्नास हजारांपर्यंत खर्च येतो. पहिल्या कापणीला एकरी ८ ते ९ टन, तर दुसऱ्या कापणीपासून ११ ते १३ टन पाला मिळतो. एक टन पाल्यापासून सुमारे एक किलो तेल मिळते.

वर्षभरात होणाऱ्या साधारण चार वेळेच्या कापणीमधून ३५ ते चाळीस टनांपर्यंत पाला व पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत तेल मिळू शकते असे नवनाथ सांगतात. एकदा लागवड केलेले पीक साधारणपणे पाच वर्षे चालते. लागवडीसाठी मल्चिंगचा वापर होतो. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याची चांगली बचत होते. तणांपासून सुटका होते. अनेक भागांत रानडुकरे व वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होते. मात्र जिरॅनियम कोणताही प्राणी खात नाही.

रोपनिर्मिती, कंपोस्ट खत

जिरॅनियम लागवडीसाठी शेतकऱ्यांना रोपे देण्यासाठी नवनाथ पाठक यांनी रोपवाटिका सुरू केली आहे. वर्षभरात सुमारे दोन ते तीन लाख रोपे तयार केली दातात. गरजेनुसार साधारण आठ ते दहा मजुरांना त्यातून रोजगार मिळतो. तेल काढून झालेल्या पाल्यापासून वर्षाला सुमारे सात ते आठ टन गांडूळ खत तयार केले जाते. त्याचा शेतीत वापर होतो.

नवनाथ पाठक, ९९५१५४९०७०,

सोमनाथ वांढेकर, ८३७८९७१२३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT