Indian Agriculture  Agrowon
यशोगाथा

Sunday Farmer : अनुभवातून शिकतोय शेती...

कुडित्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील स्थापत्य अभियंता शिवाजी शंकर कुंभार यांनी शेतीच्या आवडीतून दुर्गम भागातील डोंगरी जमीन लागवडीखाली आणली. वर्षभर हंगामी भाजीपाला पिकांची लागवडकरून हॉटेलसाठी भाजीपाल्याची स्वयंपूर्णता मिळवली. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेतीच्या प्रगतीकडे कुंभार यांनी वाटचाल सुरू केली आहे.

Raj Chougule

कुडित्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील शिवाजी शंकर कुंभार यांनी १९९२ ला स्थापत्य अभियंता अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्यक्षात व्यवसायाला सुरुवात केली. कुंभार हे नळ पाणीपुरवठा योजनांचा (Water Supply Scheme) आराखडा तयार करण्याचे काम करतात. गोठा बांधकाम (Herd Construction) , आरसीसी घर रचना, कृषिपंपाचे हेड काढून देणे अशा कामामुळे दररोज त्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क येऊ लागला.

यातून शेतीमधील नवनवीन प्रयोग पाहून त्यांना स्वतःच्या शेतीमध्ये बदल करावासा वाटू लागला. शेतकरी शेतीचे नियोजन कसे करतात? त्यांचे अर्थकारण कसे चालते याबाबतदेखील माहिती त्यांना चर्चेतून मिळत होती. स्वतःच्या व्यवसायात व्यस्त असतानाही त्यांनी आवड म्हणून शेत जमीन खरेदी करण्याचे ठरवले. खरंतर व्यवसाय आणि शेती याची सांगड घालणे हे आव्हान होते.

कुडित्रे फॅक्टरीजवळ त्यांची स्वतःची वडिलार्जित एक एकर जमीन आहे. यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी तीस किलोमीटर लांब अंतरावरील कोलीक (ता. पन्हाळा) येथे डोंगर उताराची चार एकर जमीन खरेदी केली. कोलीक हा अति पावसाचा प्रदेश असल्यामुळे तिथे भात, नाचणीशिवाय कोणत्याही प्रकारची पिके फार येत नाहीत. पण कुंभार यांनी या ठिकाणी जमिनीची योग्य बांधबंदिस्ती करून शेतीचे नियोजन केले.

अभियंता असल्याचा झाला फायदा ः

कुंभार हे अभियंता असल्याने शेत जमीन विकसित करताना चांगला फायदा झाला. जमीन सपाटीकरण, बांधबंदिस्ती करण्यासाठी तीव्र उतार आणि सखल भागाचा अभ्यास करून त्यांनी यंत्राच्या वापरावर होणारा अतिरिक्त खर्च टाळला. जमीन तयार करताना जादा होणारा मुरूम, माती खोल भागात वापरली.

योग्य प्रकारे तांत्रिक आखणी केल्याने जमीन आणि वाफे तयार करण्यासाठीचा सुमारे ५० टक्के खर्च वाचला. जमीन तयार करण्याचे मोठे आव्हान पेलल्यानंतर यात कोणते पीक घ्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र आडसाली ऊस लागवड या जमिनीत करावी असा सल्ला शेतकऱ्यांनी दिला.

आडसाली ऊस लागणीमुळे हिवाळा, उन्हाळी हंगामात ऊस पिकाची वाढ चांगली होते. पावसाने होणारे नुकसान कमी होते हे लक्षात आल्यानंतर आडसाली ऊस लागवडीस प्राधान्य दिले. शेतीची योग्य मशागत करून चार फुटी सरी घेऊन आडसाली हंगामात को-८६०३२ जातीची लागवड केली. दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी दोन मजुरांची मदत घेतली जाते.

शेतीचे नियोजन ः

स्थापत्य अभियंता असलेले कुंभार हे आठवड्यातील पाच दिवस आपल्या व्यवसायात असतात. शनिवार, रविवार हे दोन्ही दिवस ते कोलिक गावातील शेतीत असतात. शनिवारी गेल्यानंतर पहिल्यांदा मजुरांशी चर्चा करून कोणती संभाव्य कामे आहेत याबाबत नियोजन केले जाते

यानुसार पिकातील आंतरमशागत, पाणी, कीडनाशकांची फवारणी याबाबत चर्चा केली जाते. यानुसार कामकाजास सुरुवात होते. विशेष करून खतांचा योग्य वापर आणि कीडनाशकांची फवारणी ही स्वतःच्या देखरेखीने करतात. खासगी सल्लागाराकडून त्यांनी ऊस शेतीचे वेळापत्रक करून घेतले आहे. यानुसार प्रत्येक खत मात्र आणि पाणीपुरवठाच्या वेळा या निश्‍चित केल्या जातात.

चढ-उताराची जमीन असल्याने शेतीला पाणी देण्याचे आव्हान असते. कुंभार यांनी यातूनही मार्ग काढत सरी लेव्हल करण्याला प्राधान्य दिले. पाणी देताना ते स्वतः उपस्थित असल्याने सगळ्या क्षेत्राला पुरेशा प्रमाणात पाणी जाईल याची दक्षता ते घेतात. कोणत्या सरीमध्ये चढ-उतार आहे याचा त्यांना अंदाज असल्यामुळे पाणाचे नियोजन व्यवस्थित होते.

योग्य व्यवस्थापनातून कुंभार यांनी हलक्या जमिनीतही एकरी ४० टनांपर्यंतची मजल गाठली आहे. लावण आणि खोडवा ही दोन्ही पिके घेतात. पुढील वर्षी पीक फेरपालट म्हणून ते भात आणि नाचणीची लागवड करणार आहेत. शेतापर्यंत पाइपलाइन केल्यामुळे पाण्याची टंचाई भासत नाही. सध्या कोलिक येथील शेतीबांधावर त्यांनी नाचणी आणि वरीची लागवड केली आहे. येत्या काळात कृषी पर्यटन सुरू करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

हॉटेलसाठी भाजीपाला ः

कुंभार यांचे बंधू युवराज यांचे कुडित्रे येथे हॉटेल आहे. गेल्या सहा वर्षांपासून कुंभार कुटुंबाने घराशेजारीच असणाऱ्या अर्ध्या एकर शेतीमध्ये हॉटेलसाठी लागणाऱ्या भाजीपाल्याच्या उत्पादनास सुरुवात केली. यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, शेवगा आणि हंगामी भाजीपाला लागवड करण्यात आली.

यामुळे वर्षभर भाजीपाला उपलब्ध असतो. भाजीपाला उत्पादनासाठी आई पार्वती, पत्नी सौ. शीतल, भाऊ युवराज आणि चुलते नामदेव यांची मदत मिळते. घरच्या शेतातून हॉटेलसाठी लागणाऱ्या बहुतांशी भाजीपाल्याचा खर्च त्यांनी वाचवला आहे. ऊस शेतीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटला आहे. गोबरगॅसमुळे घरी स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलिंडर घेणे बंद झाले आहे.

शेतीचा मांडतो ताळेबंद...

कोणत्याही बांधकामाचे सुरुवातीला इस्टिमेट तयार करावे लागते. तीच पद्धत शेती करताना कुंभार यांनी वापरली. गुंतवलेले भांडवल आणि मिळणारा नफा याचा ताळमेळ घातला जातो. प्रत्येक टप्प्याचा हिशेब तयार करून शेती नियोजन ते करतात. काही वेळा हवामान बदलाचा फटका त्यांना बसतो.

परंतु सध्याच्या काळात समाधानकारक उत्पादन ऊस शेतीतून मिळत असल्याचे कुंभार यांनी सांगितले. शेतीमधील मिळणारे उत्पन्न ते शेतीच्या विकासामध्येच गुंतवतात. स्थापत्य अभियंत्याचे काम करत असताना कुंभी कासारी साखर कारखान्याच्या सभासदांना ते पाणी पंप बसविण्यासाठी हेड काढण्याचे काम नाममात्र शुल्कामध्ये करून देतात. यातून त्यांचा शेतकऱ्यांशी चांगला स्नेह जुळला असल्यामुळे पीक व्यवस्थापनात योग्य मार्गदर्शन मिळत असते.

संपर्क ः शिवाजी कुंभार: ९४२३८ ५९३५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT