Desi Seed Bank
Desi Seed Bank Agrowon
यशोगाथा

‘कृषिसखीं’ची देशी बियाणे बँक

सुदर्शन सुतार

सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सांगवी (मार्डी) गावापासून आतमध्ये चार किलोमीटरवर मसला खुर्द हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. या परिसराला तीन गाव तलावाचे कार्यक्षेत्र लाभले आहे. त्यामुळे गावात पाण्याची स्थिती बऱ्यापैकी आहे. शिवाय तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूरसारख्या बाजारपेठा नजीक असल्याने या गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळपिकांकडे कल आहे. विशेषतः भेंडी, सिमला मिरची, हिरवी मिरची यासह खरबूज, कलिंगड, द्राक्ष लागवड या भागांत दिसते.

साधारण २००९ मध्ये गावामध्ये स्वयंम शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण्यासह अन्य उपक्रम सुरू झाले. गावातील महिला शेतकरी सौ. शैलजा नरवडे यांनी काही उपक्रमशील महिलांना एकत्रित करत यात सहभाग घेतला. त्यातूनच सौ. नरवडे यांनी कृषी सखी मंडळ हा वीस महिलांचा बचत गट तयार केला. सध्या गटाच्या अध्यक्षा सौ. शैलजा नरवडे आणि पार्वती नरवडे सचिव असून, जयश्री नरवडे, सीना भालेकर, अनिता खानापुरे, संगीता खानापुरे, छाया खराडे, उज्वला इंगळे, लक्ष्मी झाडबुके, मनीषा ठोंबरे, मनिषा इंगळे, इंदूबाई खराडे, सुरेखा घाडगे, साराबी सय्यद, कविता नरवडे, मनीषा नरवडे, प्रियांका नरवडे, इर्शाद सय्यद, सारिका नरवडे, श्यामल गौड या महिलांचा गटात सहभाग आहे. पहिल्यांदा महिलांना गटाचा उपक्रम नवीन होता. पुढील टप्यांत बचत आणि छोटे-छोटे व्यवसाय करत महिला सदस्यांची प्रगती सुरू झाली. २०१० च्या दरम्यान तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राशी गटाचा संपर्क आला. तसेच शासनाच्या कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि उमेद अभियानाशी गट जोडला गेला. गेल्या काही वर्षांत उपक्रमशील आणि लौकिकप्राप्त असा बचत गट म्हणून ओळख तयार झाली आहे.

Desi Seed Bank

विविध प्रकारच्या देशी बियाण्यांचे नमुने

कृषी विज्ञान केंद्र, उमेदची साथ ः
दहा वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कणेरी मठामध्ये एका कार्यक्रमाला जाण्याचा योग या गटातील महिलांना आला. तेथे सदस्यांनी देशी गाईवर आधारित सेंद्रिय पद्धतीच्या शेतीची माहिती घेतली. त्यातूनच पुढे सखी अन्नसुरक्षा शेतीपद्धतीचा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर केंद्र शासनाने नीती आयोगांतर्गत पोषणमूल्य आधारित शेती असा उपक्रम सुरू केला. यामध्ये परसबाग आणि सेंद्रिय पद्धतीच्या शेतीला प्रोत्साहन देण्यात येते. पण त्यासाठी देशी बियाण्यांच्या उपलब्धतेची अडचण होती. यातूनच गटाला देशी बियाणे उत्पादनाची संकल्पना सुचली आणि देशी बियाण्यांच्या संवर्धनात महिला उतरल्या. कृषी विज्ञान केंद्राने तांत्रिक मार्गदर्शन आणि ‘उमेद''ने बाजारपेठेसाठी साहाय्य केले. कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षा मरीवाळीकर, उमेद अभियानच्या प्रांजल शिंदे, अभिजित पांढरे, गुरू भांगे, कृषी विभागाचे महेश तीर्थकर, श्री. शिंदे, स्वयम शिक्षण प्रयोगच्या नसीम शेख यांची गटाला चांगली मदत मिळत आहे. आज दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण देशी बियाणे उत्पादक म्हणून कृषिसखीचा ब्रॅण्ड तयार झाला आहे.

गटातर्फे बियाणे उत्पादन ः
बियाणे उत्पादनासाठी गटातील प्रत्येक महिलेला काही पिके ठरवून दिलेली आहेत. त्याप्रमाणे वर्षभर त्यांनी बियाणे तयार करायचे असे नियोजन आहे. त्यामुळे जास्ती किंवा कमी बियाणे मिळेल, असा प्रश्न राहत नाही. बियाण्यांची गटाकडून एकत्रित खरेदी केली जाते. बाजारातील दरानुसार त्याला रक्कम दिली जाते. पुढे सर्व बियाण्यांचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग सर्व महिला मिळून करतात. गटामार्फत त्याची विक्री झाल्यानंतर त्यातील नफाही पुन्हा याच महिलांमध्ये वाटून घेतला जातो.

Women Self Group

कृषीसखी मंडळातील सदस्यांचे भेंडी लागवड क्षेत्र

बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी ः
गटातील महिलांकडून बियाण्यांची थेट खरेदी होत नाही, त्या आधी त्याची उगवणक्षमता तपासली जाते. त्यासाठी महिला सदस्यांकडून बियाणे आल्यानंतर कोकोपीट भरलेल्या ट्रेमध्ये बियाणे टोकले जाते. पुढच्या सात-आठ दिवसात हे बियाणे ट्रेमध्ये किती टक्क्यापर्यंत उगवले आहे, हे तपासले जाते. त्यात किमान ९० टक्क्यांपर्यंत ते उगवल्यास संपूर्ण बियाणे खरेदी होते. अन्यथा ते बियाणे नाकारले जाते.

टनामध्ये बियाणे विक्री ः
केंद्र शासनाच्या नीती आयोगांतर्गत असलेल्या उपक्रमामुळे प्रत्येक जिल्ह्यात परसबाग आणि पोषण मूल्याधारित शेती प्रयोगासाठी देशी बियाण्यांची मागणी आहे. त्याशिवाय वैयक्तिक शेतकरीही त्यांची खरेदी करतात. त्यात कृषिसखीच्या बियाणे बँकेला पहिली पसंती मिळते. आतापर्यंत उस्मानाबादसह सोलापूर, यवतमाळ, वाशीम, अकोला, नगर जिल्ह्यांत बियाण्यांची विक्री झाली आहे. कृषी प्रदर्शने, महोत्सवातूनही विक्री केली जाते. २०१९ मध्ये ५७ क्विंटल, २०२० मध्ये तब्बल ४ टन ५० क्विंटल, गेल्या वर्षी २०२१ मध्ये २ टन ८० क्विंटल आणि यंदा आतापर्यंत ३ टन ५० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. अगदी काही क्विंटलमध्ये सुरू झालेली विक्री टनांत पोहोचली आहे.

३३ प्रकारचे देशी बियाणे
प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीने देशी बियाणे संवर्धन हा या पूर्ण संकल्पनेचा उद्देश असल्याने गटातील सर्व महिलांनी त्याचा विचार करूनच काम सुरू केले. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता प्रत्येकीने आपल्याकडील अर्धा गुंठा ते एक एकर या पद्धतीने, तर कोणी आंतरपीक म्हणून बियाण्यांचे उत्पादन घेतात. तूर, उडीद, मूग, भगर, राळे यासह धने, पालक, चुका, मेथी, करडई, भेंडी, वांगी, टोमॅटो, शेवगा, दोडका, घेवडा, भोपळा या सारख्या ३३ प्रकारच्या देशी बियाण्यांचा संग्रह गटाच्या बँकेकडे तयार झाला आहे.

बियाण्यांचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग
बियाणे एकत्रित केल्यानंतर सर्व सदस्या स्वतःच सगळ्या बियाण्यांचे पॅकिंग करतात. त्यात १६ प्रकारच्या बियाण्यांचे २५० रुपयांचे एक पाकिट आणि ३३ प्रकारच्या बियाण्यांचे एक हजार रुपयांचे एक पाकिट असा दर आहे. मागणीनुसार हवे त्या बियाण्यांची स्वतंत्रपणे विक्री केले जाते. बियाण्याचे पॅकिंग आणि ब्रॅण्डिंगही चांगल्या पद्धतीने केले आहे.

‘‘सर्व महिला सदस्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही देशी बियाण्यांमध्ये काम करू शकलो. शेतीसोबत चांगला जोडव्यवसाय म्हणून आम्हाला हा व्यवसाय फायद्याचा ठरला आहे.’’
सौ. शैलजा नरवडे,८८८८९५०८५८(अध्यक्ष, कृषिसखी महिला मंडळ, मसलाखुर्द)
‘‘परसबागा आणि पोषणमूल्य आधारित शेतीपद्धतीसाठी देशी बियाण्यांची उपलब्धता महत्त्वाची आहे. पण बाजारपेठेत भाजीपाल्याचे देशी बियाणे छोट्या पाकिटामध्ये सहसा मिळत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही ही संकल्पना राबवली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’
सौ. वर्षा मरीवाळीकर, ७५८८५२७५९५(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT