Pandharpur Update : चंद्रभागेच्या तीरी २८ युगांपासून विटेवर उभे राहिलेल्या सावळ्या विठुरायाने पंढरपूरला जागतिक नकाशावर महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं आहे, याच विठुरायाची वारी म्हणजे आनंदाचा, भक्तीचा सोहळा असतो, पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व अद्वितीय आहेच.
पण आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या वर्षातील प्रमुख चार वाऱ्यांना त्यात विशेष महत्त्व आहे. त्यातही आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांसह पायी येणारे संतांचे पालखी सोहळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक श्रीमंतीचा जणू वारसा सांगतात.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या संत भावंडांसह संत तुकाराम महाराज, शेगावचे गजानन महाराज असे अनेक पालखी सोहळे पंढरपुरात येतात. शेकडो वर्षे ही वारी सुरू आहे. यात श्रीमंत, गरीब, जात-पात, रंग- रूप असा कोणताही भेद नाही. केवळ विठोबा-रखुमाई आणि माउली नामाचा जयघोष आणि टाळमृदंगाचा गजर या भक्तीला पुरेसा ठरतो.
प्रासादिक साहित्यात पेढ्याला महत्त्व
पंढरपूरचं अर्थकारण वारीच्या भोवती विणलं आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं इथे मोठी जत्राच भरते. सुमारे १० ते १२ लाख वारकऱ्यांची प्रचंड मोठी रेलचेल होते. निवास व्यवस्था, खाद्यविक्री, प्रासादिक साहित्य, खेळणी, विविध वस्तू विक्रीपोटी सुमारे दोनशे कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असावी.
त्यावरूनच इथल्या अर्थकारणाचा अंदाज येऊ शकतो. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर पंधरवडा आणि दरमहा येणारी एकादशी महत्त्वाची मानली जाते. अनेक वारकरी न चुकता वर्षानुवर्षे ही वारी करतात.
प्रसाद म्हणून चुरमुरे, साखरकांड्या, बत्तासे यांच्याबरोबर पेढ्यांचा प्रसाद आवर्जून घरी नेतात. मंदिरातही दर्शनावेळी विठ्ठल- रुक्मिणीच्या पुढ्यात पेढाच ठेवण्यात येतो. त्यामुळे इथल्या प्रसादाच्या पेढ्याला वेगळे महत्त्व आहे.
प्रतिदिन एक टन पेढ्यांची विक्री
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात प्रामुख्याने वट्टमवार, देशपांडे, लटके, वस्ताद पेढेवाले असे ब्रॅण्ड कमावलेले पेढे विक्रेते आहेत. २५ ते ५० वर्षांहूनही अधिक काळ त्यांची ओळख आहे.
येथे छोटे-मोठे मिळून पेढा उत्पादक-विक्रेत्यांची संख्या शंभरहून अधिक असावी. बहुतेक सर्व जण स्वतःच उत्पादन आणि विक्रीही करतात. प्रति व्यावसायिक प्रति दिन किमान १० ते २० किलोंची विक्री होते.
एकूण सर्व बाजारात एरवी प्रति दिन एक टनापर्यंत, तर वारी काळात हीच विक्री ३ ते ४ टनांपर्यंत होत असावी. ब्रॅण्ड टिकवताना लॅमिनेटेड, बटर पेपरचा वापर असलेल्या रंगीत बॉक्समध्ये पॅकिंग करण्याकडे व्यावसायिकांकडे लक्ष असते. त्यामुळे पेढा सुस्थितीत राहतो. गुणवत्ता टिकून राहते.
कंदी, मलई आणि केशरी पेढ्याला पसंती
पेढा निर्मिती, प्रकार व चवीत विविधता व खासियत आहे. काही उत्पादक यंत्राद्वारे तर काहीजण जुन्या पद्धतीने चुलीवर दूध आटवतात. केवळ खव्यापासूनचा साधा पेढा, मलईयुक्त, कमी साखर आणि केशर यांचे मिश्रण असलेला केशरी तर खवा जास्त भाजल्यानंतर भुरकट दिसणारा कंदी पेढा असे प्रकार येथे पाहण्यास मिळतात.
त्याशिवाय साखर लावलेला साखरी, धारवाडी पेढा व कोरडा पेढा अशीही विविधता असते. कंदी पेढा प्रति किलो ४०० रुपये आणि केशरी पेढा ४५० रुपयांपर्यंत आहे.
शेतकऱ्यांकडून खवा खरेदी
पंढरपूर तालुक्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. अनेक शेतकरी दुधाच्या थेट विक्री व्यतिरिक्त खास खवा तयार करून विक्री करतात. त्यांच्यासाठी पंढरपूरच्या पेढा उत्पादकांची खास बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. पंढरपूर परिसरातील पेहे, नांदोरे, रोपळे या गावांची तर खवा उत्पादक म्हणून ओळख आहे.
या गावातील सुमारे २०० हून अधिक शेतकरी खवा व्यवसायात आहेत. त्यातही पेहेमध्ये सर्वाधिक १०० आणि नांदोऱ्यात ५० पर्यंत खवा उत्पादकांची संख्या असावी. ते स्वतः थेट या पेढा उत्पादक- विक्रेत्यांना खव्याचा पुरवठा करतात. प्रति किलो २८० रुपयांपर्यंत त्याचा दर आहे. अनेक शेतकऱ्यांकडील खव्याची प्रतिदिन १०० ते १५० किलोपर्यंत विक्री होते.
मंगळवारी, शनिवारी खव्याचा बाजार
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी त्यांनी निश्चित केलेल्या व्यावसायिकांना खव्याचा पुरवठा करतात. त्याशिवाय पंढरपुरातील नगर परिषदेनजीक जुनी चिपत भागात दर मंगळवारी आणि शनिवारी खव्याच्या खरेदी-विक्रीसाठी खास बाजारही भरतो. त्यात छोटे-मोठे विक्रेते, मिठाई व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकही खव्याची खरेदी करतात.
संपर्क- अभय कुलकर्णी (पेढा उत्पादक, विक्रेते) ९५२७६५२९५५
शिवाजी पाटील (खवा उत्पादक) ९६३७४६४१३४
आमची २५ एकर शेती आहे, त्यात २० एकर ऊस आणि पाच एकर वैरण आहे. शेतीला पूरक दूध व्यवसाय करतो. वीस म्हशी आहेत. सर्व दुधापासून खवा तयार करून विकतो. गेल्या ५० वर्षांची आमच्या कुटुंबाची व्यवसाय परंपरा आहे. पेढा उत्पादक आणि मिठाईवाल्यांकडून त्यास मोठी मागणी असते.शिवाजी पाटील, खवा उत्पादक, पेहे, ता. पंढरपूर
पेढ्याच्या प्रसादाची वेगळी महती आहे. प्रत्येक वारकरी प्रासादिक साहित्यासोबत पेढा हा प्रसाद म्हणून घेतोच, गेल्या १५ वर्षांपासून आम्ही पेढा व्यवसायात आहोत. आम्ही स्वतःच पेढे तयार करतो. त्यात कंदी, केशरी, मलई आदी प्रकार आहेत. वस्ताद पेढेवाले असा ब्रॅण्ड असून दररोज १५ ते २० किलो विक्री होते. वारी कालावधीत त्यात वाढ होते.अभय कुलकर्णी (इचगावकर), वस्ताद पेढेवाले, पंढरपूर
आम्ही मिठाई व्यवसायात आहोत. पारंपरिक पद्धतीने म्हणजे चुलीवर दूध आटवून खवा तयार करतो व पेढा करतो. ‘हायजेनिक’ अर्थात आरोग्य स्वच्छतेच्या नियमांचे पालन करतो. पंढरपुरात आलेले वारकरी आमच्या पदार्थांच्या चवीने तृप्त व्हावेत ही आमची इच्छा असते.पांडुरंग बापट, संस्थापक, विठ्ठलकृपा स्वीट्स, बेकर्स ॲण्ड हॅाटेल असोसिएशन, पंढरपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.