Vegetable Agrowon
यशोगाथा

Bitter Gourd : कारले पिकात मिळवली 'मास्टरी'

सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी ऊस पट्ट्यात भाजीपाला पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. गेल्या आठ वर्षापासून मामांचे मार्गदर्शन आणि बाजारपेठेच्या अभ्यासातून अभिजित यांनी कारले पिकामध्ये मास्टरी मिळवली आहे. अलीकडे अन्य भाजीपाला पिकांची लागवडही सुरू केली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

वारणा नदीच्या काठी वसलेल्या ऐतवडे खुर्द गावाला पाण्याची कमतरता भासत नाही. मात्र सन २०१९ आणि सन २०२१ मध्ये आलेल्या वारणा नदीच्या पुरामुळे (Warana River Flood) संपूर्ण शेतीच आपल्या कवेत घेतली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढत धाडसाने उभारणारे येथील शेतकरी आहेत. गावातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक ऊस (Sugarcane) आहे. येथील अभिजित गणपतराव पाटील हे युवा शेतकरी. वडिलोपार्जित पाच एकर शेती. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे शेतीची जबाबदारी मामा प्रताप पाटील व मोठा भाऊ झुंजार हे पाहत होते. ऊस शेतीवरच कुटुंबाचा गाडा सुरू होता. दोघा भावांना शिक्षणाची आवड होती. मात्र, अभिजित यांनी स्वतः शेतीची जबाबदारी घेत मोठ्या भावाच्या शिक्षणाच्या हातभार लावला. झुंजार यांनी आपले एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले असून, सध्या कोल्हापूर येथे नोकरी करत आहे. अभिजित यांनी शेती करता करता बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. (Bitter Gourd Crop)

अनुभवच ठरला गुरू...

शेतीची जबाबदारी आली असली तरी त्याचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पाण्यात पडले की पोहायला येते, हे काही अंशी खरे असले तरी नाकातोंडात पाणी जातेच! अशा अडचणीमध्ये जो टिकून राहतो, तोच पुढे जातो. अभिजित यांनी विविध पिकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. पिकातील बारकावे जाणून घेतले. प्रत्यक्ष शेतीमध्ये राबताना चौकस बुद्धीमुळे ज्ञानात भर पडत गेली. केवळ ऊस अवंलबून राहून चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. वर्षातून एकदा ठोक येणाऱ्या पैशापेक्षा दररोज ताजे उत्पन्न कसे मिळेल, यावर भर देण्याची गरज भासू लागली. ३० वर्षापासून भाजीपाला शेती करणाऱ्या मामांची मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला पिकांतील बारकावे जाणून घेतले. भाजीपाला व्यवस्थापनातील बारकाव्यासोबतच बाजारपेठेतील दरांचेही गणित समजावून घेण्याचा प्रयत्न केला.

कारले पिकाला झाली सुरुवात...

कमी कालावधीत अपेक्षित उत्पन्न देणारे पीक म्हणून कारल्याची निवड केली. सन २०१४ च्या दरम्यान कारली पिकाला सुरुवात केली. त्यानंतर मार्केटमध्ये विक्रीही सुरू झाली. मात्र त्याच वेळी बाजारात आवक जास्त असल्यामुळे दर घसरलेले होते. स्वतःच बाजारपेठेचा अभ्यास करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग स्वतःच कोल्हापूर, मुंबई येथे बाजारात फिरून माहिती घेतली. साधारण कोणत्या हंगामात कारल्याची आवक कमी राहते, त्याचे दर काय असतात, याची माहिती घेऊन विश्लेषण केले. बाजारात आवक कमी असलेल्या काळात उत्पादन सुरू राहील, या बेताने कारले लागवडीचे नियोजन केले. एप्रिल महिन्यातच या पिकाची लागवड केली जाते. त्याविषयी माहिती देताना अभिजित सांगतात की, या पिकाला उन्हाळ्यात चांगली मागणी व दर राहतात. अन्य शेतकऱ्यांकडे असलेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे बाजारात कारल्याची आवक तुलनेने कमी राहते. तसेच रोगांचाही प्रादुर्भाव कमी राहतो. खत, पाण्याचे व्यवस्थापन चांगले केली की दर्जेदार कारले मिळते.

अन्य भाज्यांची जोड

ज्या क्षेत्रातील ऊस तोड झाली आहे, अशा ठिकाणी दरवर्षी एप्रिलमध्ये कारले लागवड केली जाते. त्याची काढणी मे अखेरपासून ऑगस्टपर्यंत होते. सप्टेंबरमध्ये बेडवर कोबी लागवड केली जाते. त्याच शेतात सप्टेंबर अखेर ऊस लागवड केली जाते. ऊस पीक सुमारे ३.५ एकर वर असते. नवीन आडसाली लागवडीपासून एकरी ८० ते १०० टन उत्पादन मिळते. खोडव्याचे ६० टनापर्यंत उत्पादन मिळते.

कारले पीक घेता घेता बाजारामध्ये अन्य भाज्यांच्याही आवक आणि दराचा अभ्यास केला. त्यातून पडवळ, टोमॅटो, कोबी, मिरची ही पिकेही फायदेशीर ठरत असल्याचा विश्वास आला. त्यामुळे जमिनीच्या उपलब्धतेनुसार कोबी, टोमॅटो, मिरची, पडवळ यांची लागवड केली जाते.

पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

वर्षातून एकदाच कारले पीक घेतात.

पॉली मल्चिंग व बेड पद्धतीचा अवलंब.

एप्रिल अखेरीस कारल्याची लागवड केली जाते.

बियाणे देऊन रोपवाटिकेतून रोप विकत घेतात. ३० गुंठ्यात २८०० ते ३००० हजार रोपे लागतात. त्यासाठी ८० पैसे प्रति रोप खर्च येतो. १५ मे पासून काढणीस सुरुवात.

भाजीपाल्याच्या नव्या संकरित जातींची एकरी उत्पादनक्षमता चांगली आहे. त्यांची लागवड करण्यावर भर.

अधिकाधिक उत्पादन ‘ए ग्रेड’चे घेण्यावर भर. म्हणजे त्याला चांगला दर मिळून उत्पन्न वाढते.

जमिनीची सुपीकता व मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठी पिकांची फेरपालट

महत्त्वाची ठरते. तसेच शेणखताचा वापर, उसाचे पाचट कुजवणे यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT