Fruit Orchard Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

गणेश कोरे

Fruit Orchard Management : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात हलक्या, माळरानाचा पट्टा डाळिंब, सीताफळ आणि अंजीर फळबागांनी भरलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फळांचे दर्जेदार उत्पादन मिळविले आहे. या तालुक्यातील सिंगापूर गावशिवारात लवांडे कुटुंबाची सात एकर शेती आहे. सुनील लवांडे यांनी २००७ ते २०१८ पर्यंत चार एकरांतील डाळिंब बागेतून चांगले उत्पादन घेतले. डाळिंबाची शेती करताना त्यांनी वाहतूक व्यवसाय सुरू केला. या दरम्यान त्यांना तेलकट डाग रोगाच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाची बाग काढून टाकावी लागली. वाहतूक व्यवसायात जम बसल्यामुळे त्यांना फळबागेकडे काटेकोर लक्ष देणे जमत नव्हते. डाळिंबानंतर जमीन मोकळी झाल्याने पत्नी रेखा यांच्या आग्रहाखातर त्यांनी चार वर्षांपूर्वी तीन एकरावर अंजिराची बाग लावली.

अंजीर बागेच्या पूर्ण व्यवस्थापनाची धुरा रेखाताईंनी स्वतःकडे घेत दर्जेदार फळ उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. अंजिराच्या बरोबरीने त्यांच्याकडे अर्ध्या एकरावर पेरू आणि दोन एकरावर सीताफळ लागवड आहे. या बागा सात वर्षांच्या आहेत. पाण्याच्या उपलब्धतेसाठी दोन विहिरी आणि २०० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३० फूट खोलीचे शेततळे आहे. यामुळे वर्षभर पाणी उपलब्ध होते. सर्व फळबागेस ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. सध्या सीताफळ बागेत पालकाचे आंतरपीक घेतले आहे.

अंजीर बागेचे व्यवस्थापन

रेखाताईंनी तीन एकर लागवडीचे तीन टप्पे केले आहेत. एकूण तीन एकर क्षेत्रावर ६०० अंजीर झाडांची लागवड आहे. यामध्ये तीन महिन्यांच्या टप्प्याने बागांचे छाटणी व्यवस्थापन करत वर्षभर फळांच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे गणित बसविले आहे.

पहिल्या टप्यात जूनमध्ये छाटणी केलेली बाग ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये, ऑगस्टमध्ये धरलेली बाग डिसेंबर, जानेवारी आणि ऑक्टोबरमध्ये धरलेली बाग फेब्रुवारी- मार्च महिन्यांत फळ उत्पादनात येते. सरासरी तीन ते चार महिने फळांचे उत्पादन मिळत राहते. या टप्प्यामुळे बागेचे व्यवस्थापन आणि फळांची काढणी सोपी होते. दराचाही फायदा मिळतो.

एका एकरातील झाडांना दोन ट्रॉली शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खताची मात्रा दिली जाते. यानंतर रोटर मारून वाफ्यांची मशागत केली जाते. प्रत्येक झाडाला बेसल डोस दिला जातो.

झाडांची ५० टक्के पानगळ झाल्यानंतर संपूर्ण पानगळ करून घेतली जाते. यानंतर पाटपाण्याने पाणी दिले जाते. यानंतर छाटणी घेतली जाते.

दर १५ दिवसांनी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी केली जाते. याच दरम्यान प्रत्येकी चार- पाच दिवसांनी ठिबकने पाणी दिले जाते. काहीवेळा पाट पाणी दिले जाते. महिनाभरात फुटवे फुटण्‍यास सुरुवात होते. पुढे वाढीच्या टप्यात पानांबरोबर अंजिराची जोडी दिसण्यास सुरुवात होते. बागेत तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत फवारण्या केल्या जातात. या फवारण्या गरज आणि हवामानानुसार दर १५ दिवसांनी सुरू असतात. तीनही टप्प्यांमध्ये खत, पाणी आणि कीड, रोग व्यवस्थापनावर काटेकोर लक्ष दिले जाते. त्यामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते. छाटणीनंतर तीन महिन्यांनी हंगाम सुरू होऊन २०० झाडांपासून सरासरी १८ टन फळांचे उत्पादन मिळते.  

सासवड बाजारपेठेत विक्री

रेखाताईंचा मुलगा विशाल शेती व्यवस्थापनाबरोबरच अंजीर फळांच्या विक्री व्यवस्थापन पाहतो. पहाटे सहा ते आठ या वेळेमध्ये अंजिराची काढणी झाल्यानंतर प्रतवारी करून क्रेट सासवडच्या बाजारात विक्रीसाठी नेले जातात. सासवडमध्ये अंजिराचा स्वतंत्र बाजार भरत असल्याने पुणे जिल्‍ह्यासह विविध शहरांतील व्यापारी खरेदीसाठी येतात. या बाजारात अंजीर फळांना प्रति किलो ५० ते १०० रुपये दर मिळाला आहे. रेखाताईंना सरासरी प्रति किलो ७० रुपये दर मिळतो. अंजीर फळबागेतून चांगले आर्थिक स्थैर्य रेखाताईंना मिळाले आहे.

बचत गटाची सुरुवात

रेखाताईंनी गावातील बारा शेतकरी महिलांना सोबत घेऊन श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी बचत गटाची सुरुवात केली आहे. गट नवीन असल्याने सध्या आर्थिक बचतीवर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काळात सीताफळ, अंजीर प्रक्रिया उद्योगाची सुरुवात करण्याचे गटाने नियोजन केले आहे.

बागेची देखभाल

फळांचा हंगाम सुरू असो वा नसो, रोज पहाटे सहा वाजता रेखाताई अंजीर, पेरू आणि सीताफळ बागेत फेरफटका मारतात. फळझाडांची पाहणी करताना कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर पुढे तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणींचे नियोजन केले जाते. हंगामामध्ये सर्व कुटुंबीय फळ काढणी, प्रतवारीमध्ये व्यस्त असते. सकाळी ६ ते ८ या वेळेत अंजीर काढल्यावर प्रतवारी आणि क्रेटमध्ये पॅकिंग करून बाजारात पाठविले जाते. फळ तोडणीच्या हंगामामध्ये त्यांच्या बागेत सहा महिलांना रोजगार मिळतो. फळांची तोडणी, प्रतवारी आणि पॅकिंगसाठी पती सुनील, मुलगा विशाल आणि सून सुचेता यांची चांगली मदत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT