Food Processing  Agrowon
यशोगाथा

Food Processing : ‘उच्चशिक्षित येवलेंचा नियोजनबद्ध यशस्वी प्रक्रिया उद्योग

Agri Startup : पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील दत्तात्रेय येवले कुटुंबाची पाच एकर शेती आहे. दत्तात्रेय यांनी ‘फायनान्स’ तसेच ‘ग्रामीण व कृषी व्यवस्थापन’ या दोन विषयांमध्ये एमबीएची पदवी घेतली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Rural Entrepreneurs Success : पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील दत्तात्रेय येवले कुटुंबाची पाच एकर शेती आहे. दत्तात्रेय यांनी ‘फायनान्स’ तसेच ‘ग्रामीण व कृषी व्यवस्थापन’ या दोन विषयांमध्ये एमबीएची पदवी घेतली.

त्यानंतर पुणे- हिंजवडी येथे चार वर्षे आयटी कंपनीत नोकरीचा अनुभव घेतला. परंतु घेतलेल्या शिक्षणाचा योग्य विनियोग व्हावा, उद्योजक होऊन शेतीमाल प्रक्रियेत स्वतःची ओळख तयार करावी असे या विचारांनी त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले. अखेर निर्णय पक्का होऊन राजीनामा देत ते गावी परतले.

उद्योगाची उभारणी

नारायणगाव, मंचर हा भाग टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. साहजिकच या भागात टोमॅटो भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र जास्तीच्या आवकेमुळे अनेक वेळा दर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. काही वेळा टोमॅटो फेकून देण्याची वेळ येते. अशा वेळी या मालावर प्रक्रिया केल्यास त्याला भविष्यात चांगला दर मिळू शकतो.

त्यादृष्टीने प्रक्रियेसाठी टोमॅटो हे पीक प्राधान्याने निवडले. बंधू धनंजयही सोबत होते. उद्योग सुरू करण्यापूर्वी व्यावसायिक प्रशिक्षण घेणे गरजेचे होते. नोकरी करत असतानाच दत्तात्रेय यांचे प्रक्रियेविषयीचे ज्ञान घेणे सुरू होते.

विविध ठिकाणी भेटीही दिल्या. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र तसेच पुणे व अहिल्यानगर येथील संस्थांमध्येही आवश्‍यक प्रशिक्षण घेतले. सन २०१८ मध्ये स्टार्ट अप सुरू झाला. सुरुवातीला सर्वांत महत्त्वाचे होते भागभांडवल. त्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था, मित्र, नातेवाईक, परिवारातील सदस्यांकडून मोलाची साथ मिळाली.

उत्पादने निर्मिती

नारायणगाव येथे भाडेतत्त्वावर चार गुंठे क्षेत्रावर शेड उभारले. त्यानंतर फ्रूटमिल, पल्पर, फिनिशर, टिल्टिंग केटल, फिक्स केटल, व्हॅक्यूम पॅन, फिलिग टॅक, रेटॉट, बॉयलर, सॅचेट तसेच पाऊच पॅकिंग मशिन आदी अद्ययावत प्रकारची यंत्रे आणली. त्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च आला. आजमितीस उद्योगात एकूण सुमारे दीड कोटींची गुंतवणूक झाली आहे.

हंगामात शेतकऱ्यांकडून तर बिगरहंगामात व्यापाऱ्यांकडून टोमॅटो घेतला जातो. दररोज सुमारे दोन ते अडीच टन टोमॅटोची खरेदी होते. माल युनिटमध्ये आणल्यानंतर ग्रेडिंग, स्वच्छता करून टप्प्याटप्प्याने तो प्रक्रियेसाठी वापरला जातो.टोमॅटोपासून सॉस बनविण्याआधी ‘ब्रिक्स’ देखील तपासले जाते.

आजमितीला टोमॅटो सॉससह केचप, प्युरी, पेस्ट, रेड व ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, इमली सॉस, पिझा सॉस, व्हिनेगर, शेजवान चटणी, मिक्स फ्रूट जॅम, जेली, जिंजर गार्लिक पेस्ट एवढी उत्पादने तयार केली जातात. सर्व उत्पादनांबाबत सांगायचे तर बाजारपेठेतील मागणीनुसार किंवा दररोज दीड टनांच्या दरम्यान उत्पादन होते.

बाजारपेठ

ज्या वेळी दर कमी असतात त्या वेळी फळांवर प्रक्रिया केली जाते. यात आंबा, जांभूळ, डाळिंब, पपई, पेरू आदींचा समावेश आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नाशिक आदी ठिकाणी स्टॉकिस्ट, वितरक, रिटेलर आदींची नेमणूक केली आहे. त्यांची संख्या सुमारे सातशेपर्यंत आहे. मागणीनुसार पेट बॉटलमध्ये १०० मिलि, २०० मिलि, ६३० मिलि, एक किलो असे पॅकिंग केले आहे.

तर हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी पाच किलो कॅनचा पुरवठा होतो. ग्रेड किंवा गुणवत्तेनुसार उत्पादनांचे टेम्प्टिज आणि हेल्दिज असे दोन ब्रॅण्डनेम तयार केले आहेत. ‘बी टू बी’ पद्धतीनेही विक्री होते. एखाद्याला स्वतःच्या ब्रॅण्डनेमने उत्पादनांची विक्री करायची असल्यास ती देखील सुविधा ठेवली आहे. त्यामुळेच बाजारपेठेचा विस्तार करता आला आहे. बंधू धनंजय उत्पादनाशी संबंधित तर स्वतः दत्तात्रेय विपणन व विक्री या जबाबदाऱ्या सांभाळतात.

उलाढाल

सुरुवातीच्या टप्प्यात महिन्याला पाच-सहा लाखांची उलाढाल व्हायची. विपणन व्यवस्थेवर अधिक जोर देत आजमितीला महिन्याला एकूण सुमारे २४ ते २५ टनांच्या आसपास मालाची विक्री होते. तर १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते. उद्योग सुरू केल्यानंतर दोन वर्षांतच कोरोना काळ सुरू झाला होता.

त्या दरम्यान मोठे नुकसान झाले. त्या वेळी बऱ्याच मालाचे विक्रीअभावी नुकसान झाले.परंतु हार न मानता व न थांबता मोठ्या हिमतीने दत्तात्रेय यांनी उद्योग पुढे नेला आहे. उद्योगातून गावपरिसरातील व्यक्तींना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. सध्या कायमस्वरूपी सुमारे ८ ते १० व्यक्ती काम करतात. यात दोन महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. त्याद्वारे त्यांच्या कुटुंबांना चांगला आर्थिक हातभार लाभला आहे.

गुणवत्ता, सेवेला दिले प्राधान्य

उद्योगासाठी लागणारे सर्व परवाने, प्रमाणपत्रे तर घेतली आहेत. आम्ही उत्पादनांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर सातत्य व सेवा या दोन बाबींवर तेवढाच भर दिल्याने आजच्या स्पर्धेच्या युगातही टिकून राहणे शक्य झाल्याचे दत्तात्रेय म्हणाले.

आजची विस्तृत बाजारपेठ लक्षात घेताग्राहकांना संपूर्ण ‘रेंज’ किंवा ‘बास्केट’ देण्याच्या उद्देशाने उत्पादनांची विविधता तयार केली.त्यामुळे त्यांच्या मागण्या त्यातून पूर्ण करण्याचा उद्देश पूर्ण झाला. स्वतःच्या पाच एकरांतही प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध शेतीमालाचे उत्पादन घेण्यात येत आहे.

नव उद्योजकांना मार्गदर्शन

मागील काही वर्षांच्या अनुभवातून व ज्ञानातून दत्तात्रेय आता अन्नप्रक्रिया उद्योगातील एकदिवसीय प्रशिक्षणही घेतात. यात उत्पादन विकास ते विपणन- विक्रीपर्यंतच्या मार्गदर्शनाची सोय आहे. आतापर्यंत दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. दत्तात्रेय सांगतात, की अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उद्योगातील बाबी दाखवल्या जात नाहीत. आम्ही मात्र उद्योगातील निर्मिती प्रक्रिया देखील या प्रशिक्षणात प्रत्यक्ष दाखवण्याचे काम करतो.

दत्तात्रेय येवले ९४२०८४३७१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT