Vegetable Farming Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming : अल्पभूधारक शेतकऱ्याने भाजीपाला शेतीतून साधली आर्थिक भरारी!

Vegetable Cultivation : सोमठाणा (जि. नांदेड) येथील अल्पभूधारक आनंद कदम यांनी दीड एकरात कायमस्वरूपी बारमाही भाजीपाला उत्पादनाचा ‘पॅटर्न’ राबवला आहे. वर्षभर हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकविण्यासह विविध गावांमधील आठवडी बाजारांत नेऊन स्वत: ग्राहकांना विक्री करण्याचा शिरस्ता त्यांनी पाळला आहे.

कृष्णा जोमेगावकर

Agriculture Success Story : नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील आनंद कदम हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचे वडील बळिराम यांना दोन भावांत बारा एकर जमीन होती. विभक्त झाल्यानंतर त्यांच्या हिश्‍शाला सहा एकर क्षेत्र आले. सन १९८४ मध्ये गावालगत असलेल्या या शेतीत त्यांनी विहीर खोदकाम केले.

त्यास बऱ्यापैकी पाणी लागल्यानंतर १९८५ पासून वांगे, टोमॅटो, पालक, मेथी अशी पिके बारमाही पद्धतीने घेण्यास सुरुवात केली. केवळ पिकवायचेच नाही तर आठवडी बाजारात जाऊन स्वतः थेट विक्री करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. मुलगा आनंद यांनाही वडिलांकडून शेतीचे संस्कार मिळाले.

सन २००६ मध्ये त्यांनी समाजशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चार वर्षे खासगी ‘फायनान्स’ कंपनीत नोकरी केली. परंतु शेतीचीच अधिक आवड व त्यातच खरी प्रगती त्यांना दिसू लागली. मग २०१० मध्ये नोकरी सोडून थेट शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

भाजीपाला उत्पादन पद्धत

आनंद यांनीही वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली बारमाही भाजीपाला उत्पादनाची पद्धती पुढे नेण्यास सुरवात केली. वडील पूर्वी बियाणे, रोप मिळेल तशी लागवड करत असत. परंतु आनंदयांनी त्यात बदल केला.

रोपवाटिकेत रोप मिळाले नाही तर ते आपल्या शेतात ते तयार करूनपुनर्लागवड करू लागले. आज दीड एकरात ते विविध प्रकारचा भाजीपाला घेतात यात वांगी, फ्लॉवर, कोबी, पालक, मेथी, टोमॅटो, कारले, दोडके, भेंडी, मिरची अशी विविधता असते. वडिलांप्रमाणेच थेट विक्री पद्धतीचा अंगीकार केला आहे.

त्यादृष्टीने विक्रीसाठी दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याचे नियोजन करून प्रत्येकी पाच ते दहा गुंठ्यांत टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. त्यामुळे भाजीपाला वर्षभर उपलब्ध होतो. उदाहरण द्यायचे तर आज अर्ध्या एकरात घेतलेल्या फ्लॉवरचे चार ते सहा किलोपर्यंत वजन येत आहे.

शेतीतील व्यवस्थापन

भाजीपाल्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी आनंद शेणखताचा चांगला वापर करतात. त्या दृष्टीने म्हैसपालन केले असून वर्षाकाठी चार ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत त्याद्वारे उपलब्ध होते. सहा ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत विकत घेतले जाते. शेणखतामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो. शेतात वडिलांनी १९८४ मध्ये विहीरखोदली आहे.

पारंपरिक पद्धतीने दगडात बांधलेल्या या विहिरीला चांगले पाणी असल्याने ठिबकद्वारे त्यावरच भाजीपाल्याचे सिंचन केले जाते. अलीकडील वर्षांत विहिरीवर तीन एचपी क्षमतेचे सौर ऊर्जा आधारित कृषी पंपसेट बसविले आहेत. त्यामुळे विजेच्या बिलातून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरमशागतीसाठी पॉवर वीडर तसेच तणांचे नियंत्रण करण्यासाठी सायकल कोळप्याचा वापर केला जातो.

आपल्या दीर्घ अनुभवातून आनंद व्यवस्थापनातील काही टिप्स शेतकऱ्यांना देतात. ते म्हणतात की कोबी पिकानंतर पालेभाज्या तर टोमॅटोनंतर मिरची किंवा वांग्याचे पीक चांगले येते. मिरची, वांगे यांच्यानंतर पालेभाज्या चांगल्या येतात. टोमॅटोच्या बेडवर कारल्याची लागवड करता येते. त्यामुळे लागवड खर्चात बचत होते.

काढणी व विक्रीचे नियोजन

आपल्या शेतीत आनंद व पत्नी शीला असे दोघेच मुख्यतः काम करतात. गरजेनुसार एक मजूर तैनात केला आहे. सकाळी दहापर्यंत ते मालाची तोडणी पूर्ण करतात. त्यानंतर साफसफाई, प्रतवारी व बांधणी केली जाते. आनंद यांचे गाव लोहा व नायगाव तालुक्याच्या सीमेवर आहे. येथून विविध गावे जवळ आहेत.

तेथे भरणाऱ्या आठवडी बाजारांमध्ये आनंद भाजीपाला घेऊन जातात. मंगळवारी मारतळा, बुधवारी सोमठाणा, गुरुवारी नायगाव, शुक्रवारी बरबडा, शनिवारी कहाळा, रविवारी सकाळी हळदा तर त्याच दिवशी सायंकाळी कृष्णुर अशी ही बाजारांची ठिकाणे आहेत.

दर्जेदार व ताजाभाजीपाला उपलब्ध करीत असल्याने आनंद यांचे ग्राहक ठरलेले आहेत. आठवड्यात एकही दिवस सुट्टी नसते. प्रत्येक दिवशी बाजारात माल नेणे हे कसरतीचे काम असते. बाजाराचे स्वरूप लहान असल्यास आनंद स्वतः गाडीवरून माल वाहून नेतात. बाजार मोठा असल्यास गावातील मोठ्या वाहनातून तो नेण्याची व्यवस्था केली जाते.

अभ्यासातून लागवड नियोजन

ग्राहकांकडून वर्षभरात कोणकोणत्या भाज्यांची कशी मागणी असते याचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्यानुसार बिगरहंगामी लागवडीचे तंत्र अवलंबिले आहे. ते सांगतात की उन्हाळ्यात व पवसाळ्यातपालक, मेथीला दर अधिक मिळतो.

त्यामुळे या काळात काढणीला येईल या बेताने त्यांची लागवड असते. हिवाळ्यात कारले, दोडके व काकडी या वेलवर्गीय पिकांची लागवड केली जाते. तर पावसाळ्यात व उन्हाळ्यात फ्लॉवरला अधिक दर मिळतात.

बाजारात बसून स्वतः विक्री केल्याने मध्यस्थ टाळले जातात. त्यातून दीडपट ते दुप्पट दर मिळतो. उदाहरण द्यायचे तर टोमॅटो क्रेटला बाजारात दोनशे रुपये दर असेल तरथेट विक्रीतून त्याला चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत दर मिळवण्याचे आनंद सांगतात. महिन्याला चांगला नफा हाती राहतो.

शेतीतून प्रगती

शेतीतील व त्यातही भाजीपाला उत्पादनातूनच शेतीची व घरची प्रगती शक्य झाल्याचे आनंद सांगतात. बारमाही पद्धतीमुळे दररोज ताजा पैसा हाती राहतो. पूर्वी कुटुंब कच्च्या घरात राहायचे. सव २०१४ मध्ये शेतात पक्के घर बांधले आहे. मुलगी सोनाली व प्रिया यांचे शिक्षण करता आले. एवढेच काय मोठ्या मुलीचे लग्नदेखील शेतीतील उत्पन्नातूनच केल्याचे आनंद यांना समाधान आहे.

आनंद कदम ९०४९४५०६२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT