Mango Production Agrowon
यशोगाथा

Mango Farming : वयाच्या ७८ व्या वर्षीही युवकाच्या उत्साहाने शेती

गणेश कोरे

Mango Farming Success Story : दशरथ थोरवे यांची पुणे जिल्ह्यातील शिरोली (ता. जुन्नर) येथे सुमारे साडेआठ एकर शेती आहे. यात वडिलोपार्जित पावणेतीन एकर व खरेदी केलेली अशी मिळून साडेआठ एकर शेती आहे.

त्यांचे वय ७८ वर्षे आहे. पण युवकांनाही लाजवेल असा त्यांचा शेतीतील उत्साह आहे. सन १९७० मध्ये कृषी महाविद्यालय, पुणे येथून ते पदवीधर झाले. पुढे ते भूविकास बॅंकेत नोकरीचा अनुभव घेऊ लागले.

नोकरीत असताना शेतीची ओढ त्यांना अस्वस्थ करीत होती. पाच वर्षांनंतर नोकरी सोडूनचे पूर्णवेळ शेती करू लागले. सन १९९० च्या सुमारास शिरोली परिसरात द्राक्षबागा वाढू लागल्यानंतर तेही या पिकाकडे वळले.

साधारण २०१५ पर्यंत या पिकाने त्यांना आर्थिक स्थैर्य दिले. एकेदिवशी मजूरटंचाईमुळे स्वतः बागेत फवारणी करीत असताना रसायनांची बाधा होऊन डोळ्यांना त्रास झाला. त्यातून डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली.

संकटात अजून भर म्हणून की काय द्राक्ष शेतीला गारपीट, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार यांचा फटका बसत होता. अखेर द्राक्ष बागा काढून अन्य फळबागा घेण्याचा निर्णय थोरवे यांनी घेतला.

केसर आंब्याची लागवड

द्राक्षाला पर्यायी व तुलनेने सुकर पीक म्हणून आंबा लागवडीचा निर्णय घेतला. जुन्नरचे वातावरण देखील या पिकाला पोषक होते. सन २०१५ मध्ये १२ बाय ८ फूट अंतरावर केसर आंब्याच्या सुमारे दोन हजार कलमांची लागवड केली.

चार वर्षांनी व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला एक, दोन, चार टन असे करीत यंदाच्या हंगामात एकूण साडेआठ ते ९ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. बाजारपेठेत न जाता स्थानिक व्यापाऱ्यालाच ९० रुपये प्रति किलो दराने विक्री साधली.

आंब्याच्या ४० जातींचा संग्रह

थोरवे केवळ केसर आंब्यापुरते थांबले नाहीत. त्यांना आंब्याच्या विविध जातींचा संग्रह करण्याचा छंद जडला आहे. देश-परदेशातील मित्र व ऑनलाइन या माध्यमातून आंब्याच्या सुमारे ४० जातींची लागवड केली आहे.

प्रत्येक जातीची दोन ते तीन झाडे आहेत. हापूस, राजापुरी, निरंजन, तोतापुरी, रत्ना, सिंधू, बदाम, दशहरी, चौसा, टॉमी अटकिन्सन, थाई लाँग, मल्लिका, आम्रपाली, सुवर्णरेखा, वनराज, सोनपरी अशी विविधता आहे.

सफरचंदाची गोडी

उतरत्या वयातही थोरवे यांची प्रयोगशीलता टिकून आहे. त्यांनी दोन गुंठ्यांत हिमाचल प्रदेशातून रोपे मागवून सफरचंदाच्या ४५ झाडांची लागवड शेडनेटमध्ये केली आहे. काही झाडे वाढीच्या अवस्थेत आहेत तर काहींनी फळधारणा सुरू झाली आहे.

एकूण मिळून २० किलोपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. मात्र व्यावसायिक विक्री हा हेतू नाही. तर आपण पिकविलेल्या सफरचंदांची गोडी घरच्यांना व मित्रमंडळींना अनुभवण्यास देण्याचा आनंद वेगळाच असल्याचे थोरवे सांगतात.

शेतीत रमलेले थोरवे

थोरवे यांची पत्नी पुष्पा या देखील बॅंकेतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. थोरवे सांगतात की पत्नीला शेतीचा पूर्वी काही अनुभव नव्हता. पण आज त्यांनाही शेतीचा लळा जडला आहे. त्यांची समर्थ साथ असून आम्ही जोडीने शेतीचा दररोज आनंद घेतो.

घरापासून जवळच शेत असून तेथे आपल्या इलेक्ट्रीक वाहनातून ते येतात. स्वतःसह आपल्या मित्रांनाही आनंदी करण्याची थोरवे यांची वृत्ती आहे. सन १९७० च्या कृषी पदवीच्या बॅचच्या सर्व मित्र मंडळी व कुटुंबीयांचे ‘गेट टूगेदर’ ते दरवर्षी मे मध्ये ते आपल्या शेतात आयोजित करतात.

त्यावेळी आंब्याचा हंगाम असल्याने आमरसाची मेजवानी ते सर्वांना देतात. सोबत सर्वांना आंब्याची पेटी देखील भेट देतात. मुलगा मिलिंद वास्तुशास्त्र अभ्यासक असून तो व्यवसायात रमला आहे,. मुलगी लग्न होऊन पुण्यात स्थायिक झाली आहे.

ॲव्होकॅडो फळाचा प्रयोग

शेतीत फळांची विविधता ठेवण्याच्या आवडीतून व वेगळा काही प्रयोग करण्याच्या ध्यासापायी थोरवे यांनी ॲव्होकॅडो फळाच्या लागवडीचा प्रयोग केला आहे. यासाठी वसई येथील त्यांच्या मित्राने मार्गदर्शन देण्यासह रोपे दिली आहेत.

हे मित्र वसईला या फळाची यशस्वी लागवड करून त्यातून यशस्वी उत्पादन घेत आहेत. सन २०१६ मध्ये दोन झाडांची लागवड करण्याचे धाडस केले. हे झाड आपल्या वातावरणात तग धरू शकते असा विश्‍वास आल्यानंतर २०१७ मध्ये पाऊण एकरात १४० झाडे लावली.

त्यांचे कष्टपूर्वक संगोपन करून ही झाडे आता सात वर्षे वयाची झाली आहेत. त्यांना फळधारणा सुरू झाली आहे. पुढील वर्षी व्यावसायिक उत्पादन सुरू होऊन तीन क्विंटलपर्यंत उत्पादनाचा अंदाज आहे. ॲव्होकॅडो या फळाची विक्री मॉलद्वारे होते.

त्यामुळे विविध मॉल्ससोबत थोरवे यांनी चर्चा केली आहे. मॉल्सचे प्रतिनिधी नारायणगांव परिसरात फळे भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. त्यातील काही प्रतिनिधींनी बागेला भेट दिली असून फळांची चव घेतली आहे. पॅकिंगचेही प्रयोग सुरू आहेत.

दशरथ थोरवे, ९०९६९४६७३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT