Agriculture  Agrowon
यशोगाथा

Integrated Farming : माळरानावर प्रयोगशील, एकात्मिक शेती

Agriculture Success Story : धालवडी (ता. कर्जत, जि. नगर) येथील पोपटराव जगताप यांनी माळरान विकसित करून त्यावर प्रयोगशील शेती फुलवली आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी केळी पिकात हातखंडा तयार करून थेट ग्राहकांनी विक्रीचे धोरण अवलंबिले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सूर्यकांत नेटके

Experimental Agriculture : नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. तालुक्यातील कूळधरण हे मूळ गाव असलेले पोपटराव शिवाजी जगताप यांनी गावापासून दोन किलोमीटरवरील धालवडी येथे पाच एकर माळरान शेती विकत घेतली. त्यांचे तीन भावांचे कुटुंब आहे. ते एकत्र असताना सुमारे सतरा वर्षांपूर्वी घेतलेले हे क्षेत्र वाटणीत पोपटरावांकडे आले आहे. सध्या त्यातील प्रत्येकी दीड एकरात केळी व कांद्याचे उत्पादन घेतले आहे.

अर्ध्या एकरांवर चाऱ्यासाठी गवत, तेवढ्यात क्षेत्रात शेततलाव तर पशुपालनासाठी दहा गुंठ्यांवर मुक्तसंचार गोठा बांधला आहे. शेतीसह पशुपालनात पत्नी वर्षा यांचा मोलाचा सहभाग असतो. मुलगा ओंकार बीएस्सी ॲग्रीचे, तर दुसरा मुलगा माउली बारावीचे शिक्षण घेत आहे. दोघांचीही शेतीत शक्य तशी मदत होते. पोपटरावांना केळी खोडव्यासह सेंद्रिय पद्धतीने कांदा व अन्य पीक उत्पादनासाठी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, मंडळ कृषी अधिकारी श्री. घालमे, कृषी सहायक दत्ता सुद्रिक मार्गदर्शन करतात.

थेट विक्रीला दिले प्राधान्य

पोपटरावांनी खरेदी केलेल्या जमिनीचा विकास करून २००८ मध्ये एक एकरांत केळीची लागवड केली. दोन खोडव्यांनंतर काढणी करून ते पुन्हा नवी लागवड करायचे. पहिले चार वर्षे केळीची जागेवर व्यापाऱ्यांना विक्री केली. त्या वेळी प्रति किलो साडेचार रुपयांपर्यंत दर मिळायचा. एकरी ३० ते ४० टनांपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले. सन २०१३ मध्ये त्यांनी ग्रॅंडनैन वाणाच्या केळीची लागवड केली मात्र त्या वर्षी दोन रुपये प्रति किलोवर दर घसरले.

मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी स्वतःच केळी पिकवून थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पत्र्याच्या शेडच्या घरात साध्या पद्धतीने थर्माकोल व प्लायवूडचा वापर करून ३०० क्रेट केळी बसतील असे सह टन क्षमतेचे शीतगृह तयार केले. परिसरात बाजारपेठेचे गाव असलेल्या कूळधरण परिसरात स्टॉल उभारून विक्री सुरू केली.

या पद्धतीमुळे आता किलोला १२, १५ रुपयांपासून ते कमाल १८ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. व्यापाऱ्यांना विक्री करण्याच्या तुलनेत आता ३० ते ४० टक्के अधिक नफा मिळू लागला
आहे. दर आठवड्याला मागणी असेल तेवढ्या केळीची तोडणी करून व ती पिकवून विक्रीचे नियोजन केले जाते. मागील नऊ वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले आहे.

शेती व्यवस्थापन

सन २०१३ मध्ये दीड एकरात सहा बाय पाच फूट अंतरावर केळीची लागवड केली आहे. त्याचा
खोडवा जपला आहे. दरवर्षी एकूण क्षेत्रात पंधरा टन शेणखत व तेवढीच साखर कारखान्यातील मळी यांचा वापर होतो. उन्हाळ्यात एकत्रितपणे दोन महिने मुरवल्याल्यानंतर पाऊस पडल्यानंतर प्रत्येक झाडाला दहा किलोप्रमाणे त्याचा वापर होतो.

शिवाय पालापाचोळा व तणांचे अवशेष जागेवर कुजवले जातात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून गांडुळांची संख्या वाढली आहे. केळीसह कांदा व अन्य पिकांमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर अधिक असल्याने मालाचा दर्जा उत्तम मिळतो आहे. टिकवण क्षमता व त्यामुळे दरही चांगला मिळत असल्याचा पोपटरावांचा अनुभव आहे.

केळीप्रमाणे कांद्यातही याच प्रकारे सेंद्रिय व्यवस्थापन केले जाते. त्यातून एकरी १५ ते २०
टनांपर्यंत उत्पादन घेणे शक्य झाले आहे. कलिंगड, खरबूज उत्पादनाचेही प्रयोग केले आहेत.
सतरा वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर होतो. पाणीटंचाईच्या काळात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाच्या मदतीने अर्धा एकर क्षेत्रावर ६५ लाख लिटर क्षमतेचा शेततलाव उभारला आहे.

पशुपालनाची जोड

दहा वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे.
केळीमध्ये चार वर्षापासून रासायनिक खतांचा वापर जवळपास थांबवला आहे सेंद्रिय खतांमध्ये
प्रामुख्याने शेणखत, गोमुत्रापासून तयार केलेल्या स्लरीचा वापर होतो. पूर्वी एक-दोन गायी
होत्या, टप्प्याटप्प्याने वाढ करीत आजमितीला आठ गायी, सहा कालवडी व पाच म्हशी आहेत.

दररोज ७० ते ७५ लिटर दूधसंकलन होते. विक्री थेट ग्राहकांनाच होते. दोन लाख रुपये खर्च करून मुक्तसंचार गोठा बांधला आहे. दरवर्षी पन्नास टनांपेक्षा अधिक मिळणाऱ्या शेणखताचा केळीसह सर्वच पिकांना वापर होतो. चाऱ्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी मक्याचे उत्पादन घेतात. गरजेनुसार बाहेरून खरेदी करून दरवर्षी ४० ते ५० टन मुरघास तयार करतात. शेळीपालनाचीही जोड दिली असून सध्या सुमारे ३५ शेळ्या आहेत.

‘केव्हीके’कडून पुरस्कार

बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्‍वस्त सुनंदाताई पवार व आमदार रोहित पवार यांनी जगताप यांच्या शेतीला भेट देऊन कौतुक केले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘‘अप्पासाहेब पवार प्रोग्रेसिव्ह फार्मर’’ या पुरस्कारासाठीही जगताप यांची निवड झाली आहे.

पोपटराव जगताप, ९३५९८०८२८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT