Hurda Agrowon
यशोगाथा

Jowar Hurda : हुरड्यातून घसघशीत कमाई

सुदर्शन सुतार

सुदर्शन सुतार

Jowar Farming : ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील हुरडा पार्टीची बातच काही और आहे. साधारण १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेला हा हंगाम गावोगावच्या शिवारात रंगत असून, तो सध्या अंतिम टप्प्यात आहे. डोलणारी शिवारे, पेटविलेल्या हुरड्याच्या भट्ट्या, भाजली जाणारी ज्वारीची कोवळी, लुसलुशीत दाणेदार कणसं आणि हातानं मळल्यानंतर तयार झालेला हुरडा, जोडीला शेंगदाणा चटणी, गूळ, गोडी शेव, शेंगदाणा, लसूण-तिळाची चटणी, रेवडी, वांग्याची भाजी...

अशा हुरड्याच्या पार्टीची रंगतच काही और असते. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांत हुरड्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यातही मंगळवेढा आणि बार्शीची ज्वारी अधिक प्रसिद्ध आहे.

कृषी पर्यटन केंद्रे आकर्षण

पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा शहरांमधून खास हुरडा पार्टीसाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यात सुमारे पंधरापर्यंत कृषी पर्यटन केंद्रे खास हुरड्यासाठी तयार झाली आहेत.

प्रति केंद्रावर दररोज किमान १०० ते १५० ग्राहक हुरड्याचा आनंद घेतात. शनिवार, रविवार अशा सुट्ट्यांच्या दिवशी हा आकडा दुप्पट ते त्याहून अधिक पोहोचतो.

‘केव्हीके’चा पुढाकार

सोलापूरच्या कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्राकडून (केव्हीके) शेतकऱ्यांना खास हुरड्यासाठीचे वाण, दर्जेदार बियाणे पुरवठ्यासह तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. त्याचा भाग म्हणून केंद्राकडून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ४० शेतकऱ्यांना हुरड्याच्या व्यावसायिक उत्पादनासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. यात पेरणीपासून ते काढणी, थेट ‘मार्केटिंग’पर्यंतच्या विषयांचा समावेश होता.

प्रशिक्षणार्थींना परभणी वसंत आणि फुले मधुर या हुरड्याच्या खास वाणाचे प्रत्येकी एक किलो बियाणे देण्यात आले. केंद्रप्रमुख शास्त्रज्ञ व कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे तसेच विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी यामध्ये मार्गदर्शन केले. सुमारे ९५ ते १०० दिवसांत ज्वारी हुरड्यात आली. प्रति अर्धा एकर क्षेत्रातून तीन ते साडेतीन क्विंटलपर्यंत हुरडा अशी उत्पादकता मिळाली.

थेट ग्राहकांना विक्री

प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना हुरड्याचे दर्जेदार उत्पादन घेऊन चांगली कमाई करता आली. काहींनी शेतात हुरडा पार्टी, काहींनी कृषी पर्यटन केंद्रांना विक्री असे ‘मार्केट’ शोधले. काहींनी रस्त्याकडेला स्टॉल उभारले. प्रति किलो १८०, २०० ते २५० रुपयांपर्यंत दर मिळाला. कणसांची प्रति किलो १५० रुपये दराने विक्री झाली. विक्री व्यवस्था अधिक प्रभावी व्हावी यासाठी कृषी विज्ञान केंद्राने खास पॅकिंगमधून हुरडा देण्याची कल्पना शेतकऱ्यांच्या गळी उतरवली.

मक्यातील घटक व वनस्पतिजन्य तेलातील घटक यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या (कॅरिबॅग) गुलबर्गा (कर्नाटक) येथून तयार करून घेतल्या व त्या शेतकऱ्यांना पुरवल्या. त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता चांगली असल्याने त्यातील हुरड्याची टिकवण क्षमता चांगली राहते व त्याला गंध येत नाही.शेतकऱ्यांनी एक, दीड ते दोन किलोपर्यंत असे पॅकिंग या पिशवीचे केले.

हुरडा उत्पादकांचे अनुभव आम्ही दरवर्षी हुरडा उत्पादन घेतो. ग्राहकांनाही त्याची माहिती झाली आहे. त्यामुळे ‘मार्केटिंग’साठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत. मागणीनुसार घरपोच हुरडा देतो. कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण व हुरड्याच्या वाणाचे बियाणे उपलब्ध झाले. या हुरड्याच्या विक्रीतून घसघशीत पैसे मिळाले आहे.
मळसिद्ध कोकळगी, ९६८९१२६०३४, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर,
नवी मोटारसायकल घेतली माझी केवळ दोन एकर आठ गुंठे शेती आहे. मागील वर्षापासून हुरडा उत्पादन घेतो आहे. यंदाही अर्धा एकर क्षेत्रातून चांगली आर्थिक कमाई करणे शक्य झाले आहे. सोलापूर शहरातील कंबर तलावानजीक स्टॉल उभारून थेट विक्री केली. कृषी प्रदर्शनातही तो ठेवला होता. हुरडा विक्रीतून नवी मोटारसायकल घेऊ शकलो याचा आनंद आहे.
बसवराज बिराजदार, वांगी, ता. दक्षिण सोलापूर ७४९८५८७८४१
अनेक वर्षांपासून हुरडा उत्पादकांना दर्जेदार उत्पादनापासून ते मार्केटिंग-विक्रीपर्यंत प्रोत्साहन देतो आहोत. कमी कालावधीत शेतकऱ्यांना खात्रीशीर उत्पादन व उत्पन्न देऊ शकणारा हा उद्योग आहे.
डॉ. लालासाहेब तांबडे, प्रमुख शास्त्रज्ञ व कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
हुरडा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन महत्त्वाचे होते. आम्ही दिलेल्या प्रशिक्षणातून यंदा ३५ शेतकऱ्यांनी हुरडा उत्पादन घेत कौशल्याने त्याचे ‘मार्केटिंग’ व विक्रीही केली. शेतकऱ्यांचे हे अनुभव सर्वांसाठीच उत्साहवर्धक आहेत.
अमोल शास्त्री, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर ९४२२६५७७२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT