Livestock Conservation : धुळे जिल्ह्यात म्हसदी (ता. साक्री) येथे धीरजकुमार राजमल सोनवणे यांची वडिलोपार्जित कोरडवाहू १६ एकर शेती आहे. डोंगराळ भाग असल्याने उन्हाळ्यात पाणी, चाराटंचाई असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेती करणे व त्यातून नफा मिळविणे कठीण असते. धीरजकुमार यांनी बीएस्सी कृषी व त्यानंतर ‘बायोइन्फॉर्मेटिक्स’ विषयातून एमएस्सीची पदवी घेतली. लहानपणापासूनच त्यांना पशुधनाची आवड होती. त्यातूनच पुणे येथे ‘बायफ’ संस्थेत ते नोकरीत झाले. पशुपालन आणि पैदास या क्षेत्रात नोकरीचा १२ वर्षे अनुभव घेतला. सन २०२१ मध्ये राजीनामा देऊन गावी पूर्णवेळ शेती करण्यासाठी ते परतले. आई प्रमिला व वडील राजमल हे दोघेही निवृत्त शिक्षक. त्यांची प्रेरणा मिळाली.
सुरू झाले डांगी गोवंश संगोपन
डांगी गायीचे संवर्धन, संगोपन व पैदास यावर सोनवणे यांनी मुख्य भर दिला आहे. अर्थात, नोकरीत असतानाच म्हणजेच २०१० पासूनच त्यावर काम सुरू केले होते. घरचीही मोजकी डांगी जनावरे होतीच. सोनवणे सांगतात, की शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला डांगी गोवंश दुर्मीळ होत चालला आहे. मागील पशुगणनेत त्यांची राज्यातील संख्या दोन लाखांच्या दरम्यान होती. आता पैदासक्षम जनावरांची संख्या ५० हजारांपर्यंतही नसावी. या गोवंशाचे महत्त्व वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. डांगी पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यातील पारंपरिक व्यवस्थापन, संधी, धोके, नफा-तोटा असा सर्वांगीण अभ्यास त्यांनी केला आहे.
सोनवणे यांचे डांगी गोवंश संगोपन (ठळक बाबी)
वीस डांगी गायी व दोन डांगी वंशाचे वळू यांच्यापासून सुरुवात. आजघडीला २४ गायी व १० नर वासरे. यात दोन वळू.
दिवसभर पशुधन मुक्तसंचार करते. फक्त रात्री संगोपनगृहात बांधले जाते.
वासरांसाठी स्वतंत्र ३० फूट बाय २० फूट, तर वळूंसाठी २० फूट बाय २० फूट आकाराचे संगोपनगृह.
व्यायलेल्या व गाभण गाईसाठीही स्वतंत्र संगोपनगृह.
चारा साठवणुकीसाठी ५० बाय २५ फूट आकाराचे गोदाम.
दोन बारमाही मजूर कायम तैनात. त्यांचे निवासस्थान संगोपन केंद्रानजीकच.
औषधे, पशुखाद्यासाठी स्वतंत्र साठवणगृह.
वंशावळ, प्रजनन, लसीकरण, खाद्य, दूध उत्पादन, व्यवस्थापन अशा सर्व सविस्तर नोंदी
नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन केल्या जातात. (रेकॉर्ड कीपिंग)
दूध उपादनक्षमता वाढविण्याचे प्रयत्न
सोनवणे सांगतात, की डांगी गाय प्रति दिन सरासरी साडेचार ते पाच लिटर दूध देते. मात्र त्यांची दूध उत्पादनक्षमता वाढवता येणे शक्य आहे. माझ्याकडील सुमारे नऊ गायी अशा आहेत, की दिवसाला त्या साडेबारा लिटरपर्यंत दूध देतात. दूध उत्पादनक्षमता लक्षात घेऊन गायींची शारीरिक ठेवण व रचनेनुसार वळू कसा असावा हे निश्चित केले. त्यातून दूध निर्मिती वाढविण्याचा प्रयत्न केला. गायींची निवड करून वंशावळीनुसार त्यांच्या पैदाशीची शास्त्रशुद्ध आखणी केली आहे. शिक्षण, नोकरीतील अनुभवात जनुकीय शास्त्राचा झालेला अभ्यास यात लाभदायी ठरला. संगणकीय विश्लेषण केलेल्या माहितीचा वापरही प्रत्यक्ष शेतात केला.
हैदराबाद येथील संस्थेत चाचणी
सोनवणे म्हणाले, की गायींच्या रक्ताचे नमुने हैदराबाद येथील पशू जैविक संस्थेस दिले. तेथील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून केलेल्या बदलानुसार गाईची पुढील पिढी जन्माला आली. या संस्थेकडे सुधारित दहा कालवडी आणि दोन वळू संगोपनासाठी पाठवले. तेथे कालवडींनी पहिल्याच वेतात दिवसभरात आठ ते साडेआठ लिटर एवढे दूध वासरे पाजून दिले. त्याच कालवडींपासून जन्माला आलेली नर वासरे संबंधित संस्थेतून माझ्या गोसंवर्धन केंद्रात आणली. डांगी गोपालकांना त्यांची पुढे वळू म्हणून विक्री केली आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
‘बायफ’चे माजी पशू पैदास तज्ज्ञ डॉ. सुरेश गोखले, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयाचे शास्त्रज्ञ डॉ.धनराज चौधरी, पीक संरक्षण विषयाचे शास्त्रज्ञ डॉ.पंकज पाटील, धुळे येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मिलिंद बनगे, डॉ. शंकर अस्वार, डॉ. मंगेश हेमाडे, डॉ. रामचंद्र भगत, नारायण फडके, डॉ. विनोद पोतदार, डॉ. मनोज आवारे, राजेंद्र कड यांचे सहकार्य व मार्गदर्शन.
कर्नाल येथील संस्थेच्या माध्यमातून म्हशींच्या जनुक कोषांवर काम करण्याबाबत व जिनोमिक तंत्राचा अभ्यास.
डांगी गोवंशाची वैशिष्ट्ये
अधिक पाऊसमान व डोंगराळ भागातील प्रतिकारक्षम वाण. त्यामुळे डांगी बैल डोंगराळ भागात शेतीची अवजड कामे सहज पार पाडतात.
तेलग्रंथी त्वचेत असल्याने पावसात आजारपण येत नाही.
मुबलक दूध देणारी गाय तयार करणेही शक्य.
शिंगे व खूर टणक. त्यांचा रंग काळा. पत्र्याची नाल खुरांना लावण्याची आवश्यकता नाही
दर १४ ते १५ महिन्याला एक वेत देते. चांगले व्यवस्थापन केल्यास १७ वेत मिळविणे शक्य असा सोनवणे यांचा अनुभव.
गायीचा रंग काळा - पांढरा, उंची कमाल पाच फुटांपर्यंत (वशिंडापर्यंत)
शिंगे मध्यम. मागील बाजूस वळलेले.
व्यवसाय झाला किफायतशीर
दूध उत्पादन हे दुय्यम आहे. नर वासरे उत्पादन हा प्राधान्यक्रम आहे. चांगल्या प्रतीची वासरे सरसकट दूध पाजूनच वाढविली जातात. गायींच्या दुधाचे ‘रेकॉर्ड’ नियमित ठेवले जाते. जिवामृत व गोमूत्र यांची २० रुपये प्रति लिटर दराने, तर प्रोमची (रॉक फॉस्फेट, कोरडे शेणखत व पीएसबी जिवाणू मिश्रण) ७०० रुपये प्रति ५० किलो गोणी या दरात केली जाते. दरवर्षी सरासरी आठ नर वासरांची विक्री केली जाते. त्यांना ८० हजार ते एक लाख रुपये दर मिळतो. काही वेळा कालवडींचीही विक्री होते. सोयाबीन, भुईमूग, मका यांच्या माध्यमातून चाऱ्याची उपलब्धता होते. शेतीतही दरवर्षी चांगला नफा होतो.
धीरजकुमार सोनवणे, ९४२१४६३६४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.