Sugarcane
Sugarcane Agrowon
यशोगाथा

Agriculture : शिक्षकीपेशाबरोबरीने जोपासली शेती...

Raj Chougule

सावर्डे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सुरेश बाबासाहेब चौगुले हे चिपरी (ता. शिरोळ) येथे जि.बा. पाटील हायस्कूल येथे २००० पासून इंग्रजी विषयाचे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते जयसिंगपूरला राहतात. इथूनच दर रविवारी सावर्डे येथे जाऊन शेतीचे नियोजन करतात. त्यांच्या वाट्याला कुटुंबाची दोन एकर शेती आली आहे. शेती पूर्ण माळरानाची असल्याने पीक नियोजन करणे आव्हानात्मक आहे. या पूर्ण शेतीत त्यांनी ऊस लागवड केली आहे. शेतीला पुरेसा वेळ मिळत नसतानाही त्यांनी शेती भागाने दिलेली नाही. भागाने शेती दिल्यास पिकाचे योग्य व्यवस्थापन (Crop Management) होत नाही, त्यातून अपेक्षित उत्पन्नही मिळत नाही, या विचारातून त्यांनी शेती स्वतःच करण्याला प्राधान्य दिले. उपलब्ध वेळेनुसार पीक नियोजन (Crop Planing) बसविले आहे. त्यादृष्टीने ऊस पीक (Sugarcane) त्यांना योग्य वाटले. गरजेनुसार मजुरांच्या साह्याने आठवड्यातून एक दिवस स्वतः शेतीकामे करत त्यांनी ऊस शेती फुलवली आहे. पाणी नियोजनासाठी एक विहीर आणि एक कूपनलिका आहे.शेती बांधावर त्यांनी लिंबाची झाडे लावली आहेत.

शेतीचे नियोजन

शनिवारी शाळा सुटल्यानंतर आठवड्याची सर्व कामे सुरेश चौगुले उरकून घेतात.रविवारचा पूर्ण दिवस शेतीसाठी राखून ठेवलेला असतो. सकाळी दहा वाजता जयसिंगपुरातून २५ किलोमीटरवरील सावर्डे गावी शेतकामासाठी गेल्यावर पीक पाहणी केली जाते. भाऊ आणि परिसरातील शेतकऱ्यांच्याबरोबरीने चर्चा करून पुढील आठवड्यातील नियोजन ठरविले जाते.

चौगुले यांनी चार फुटीची सरी काढून को-८६०३२ या जातीची लागवड केली आहे. ऊस रोप लागवडीवर त्यांचा भर आहे. यामुळे मजूर आणि वेळेत बचत होते. उसाची चांगली वाढ होते. योग्य वेळी ऊस तोडणीस येतो. सध्या पाट पद्धतीनेच पाणी दिले जाते. ऊस हे व्यवस्थापनास सोपे पीक असल्याने पाणी नियोजन, खतमात्रा देणे, गरजेनुसार कीडनाशकांची फवारणीची कामे ते स्वतः मजुरांच्या सहकार्याने पूर्ण करतात. दिवसभरात मजुरांशी संवाद साधून पुढील आठवड्यामध्ये कोणती कोणती कामे अपेक्षित आहेत याबाबत सविस्तर चर्चा केली जाते. यामध्ये खतमात्रा, आंतरमशागत, पाण्याची गरज, परिसरातील शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग याबाबत चर्चा होते. याशिवाय दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत शेतीची बांधबंदिस्ती,इतर रखडलेली शेतीकामे करून घेतली जातात. ऊस लागवड आणि तोडणी या महत्त्वाच्या कामासाठी प्रसंगी रजा काढून वेळ दिला जातो. त्या दिवशी मात्र मजुरांच्या मार्फत कामे उरकून घेतली जातात.

जमीन सुपीकतेवर भर

सध्या चौगुले दोन एकर शेतीमध्ये सातत्याने ऊस पीक घेतात. यामुळे जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी साखर कारखान्यातून उपलब्ध होणारे मळीचे सेंद्रिय खत आणि शेणखत दरवर्षी जमिनीत मिसळून देतात. रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर केला जातो. यासाठी साखर कारखान्यातील कृषी तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेतला जातो. यामुळे रासायनिक खत आणि आर्थिक बचत होते. उसाची वाढ देखील समाधानकारक होते. या नियोजनातून जमिनीचा पोत चांगला राहत असल्याचा चौगुले यांचा अनुभव आहे. ऊस भरणीला येईपर्यंत मक्याची लागवड केली जाते. हा मका भावांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिला जातो.

चौगुले यांनी माळ जमिनीतही परिश्रमातून ४० टन ऊस उत्पादनाची सरासरी गाठली आहे. येत्या वर्षात एकरी ६० टनाचे उदिष्ट त्यांनी ठेवले आहे. हलकी जमीन असल्याने उत्पादनवाढीला थोडी मर्यादा आहे. तरीही चौगुले यांनी शिक्षकी नोकरी सांभाळून योग्य शेती नियोजन, जमीन सुपिकतेवर भर देत दरवर्षी ऊस उत्पादन वाढीला गती दिली आहे. उत्पादनवाढीच्या बरोबरीने जमिनीचा पोत चांगला राहावा असा त्यांचा प्रयत्न आहे. उसातून झालेला नफा शेती विकासासाठी गुंतविला जातो. यातूनच शेतीची बांधबंदिस्ती, सौर पॅनेल व्यवस्थापनाचा खर्च केला जातो.

कृषी चर्चासत्रांना उपस्थिती

चौगुले पेशाने शिक्षक असले तरी कृषी विषयक कोणतेही कार्यक्रम चुकवत नाहीत. शाळेच्या वेळा सांभाळून ते शेतीविषयक चर्चासत्रांना हजर राहतात. विशेष करून साखर कारखान्यातर्फे आयोजित ऊस उत्पादकता वाढीबाबतच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो. चर्चासत्रामध्ये ऊस तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चाकरून ऊस उत्पादनवाढीसाठी काय सुधारणा करता येईल याबाबत माहिती घेतात. ऊस शेतीच्या नियोजनात त्यांना भाऊ विजय आणि संजय यांचेही मार्गदर्शन होते. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांसोबत ते सातत्याने संवाद साधतात.

शैक्षणिक उपक्रमातही सहभाग

चौगुले आठवडाभर शाळेमध्ये असले तरी त्यांना शेतीशिवाय करमत नाही. रविवार उजाडला की ते शेतीकडे धाव घेतात. रविवारचा पूर्ण एक दिवस त्यांना आठवडाभर ऊर्जा देतो. गेल्या २२ वर्षांपासून त्यांनी हा शिरस्ता जपला आहे. लहानपणापासून असणारी आवडत त्यांना शेतीकडे आकर्षित करते. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या कामामुळे चौगुले यांना संस्थेचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील परीक्षांचे (एनएमएमएस) समन्वयक म्हणूनही काम पाहतात. चांगली आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

आंबा बागेचे नियोजन

पुढील दोन वर्षांत चौगुले यांनी ऊस शेतीपासून थोडे बाजूला होऊन हापूस आणि केसर आंबा लागवडीचे नियोजन केले आहे. यासाठी परिसरातील विविध रोपवाटिका तसेच आंबा लागवड केलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. येत्या काळात फळबाग केल्यास उत्पन्नाचा शाश्वत स्रोत कायम राहू शकेल, या विचारातून त्यांनी परंपरागत ऊस शेती बरोबरच आंबा लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

सौरऊर्जेचा वापर

चौगुले यांच्या शेतामध्ये तीन दिवसच वीजपुरवठा असतो. चौगुले हे शाळेत नोकरीवर असल्याने विजेचा कालावधी आणि नोकरीतून मिळणारा वेळ याचा मेळ बसत नाही. बहुतांशी वेळा रात्री वीज पुरवठा असतो. यामुळे दुसऱ्या गावातून येऊन ऊस पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. माळरानाची शेती असल्याने पाण्यात खंड पडून चालत नाही. यामुळे दोन वर्षांपूर्वी चौगुले यांनी सौर पंपासाठी अर्ध्या गुंठ्यांत सौर ऊर्जा पॅनेल बसवले. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला. सौर पंपामुळे आता त्यांच्या वेळेनुसार उसाला पाणीपुरवठा करणे सुलभ झाले आहे. ज्या वेळी सवड असेल त्यावेळी सौर पंपाला वीज उपलब्ध होऊन पिकाला पाणी देणे शक्य झाले. कधी कधी एका दिवसात पाणी देणे शक्य होत नाही. त्यावेळी रविवारी बांध लावून पाण्याचे नियोजन केले जाते. सौर पंपाचे पाणी दिवसभर चालले. विद्युत पुरवठा आणि सौर पंप याचा मेळ घालून पाणीपुरवठा होत असल्याने शेतीला पाणी कमी पडत नाही. शेतीसाठी विहीर आणि कूपनलिकेतून पाण्याची सोय आहे. कूपनलिकेतून पाणी विहिरीत सोडले जाते आणि विहिरीतून उपसा करून ते शेतीला दिले जाते.

- सुरेश चौगुले, ९६८९४४०२१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT