Agriculture Innovation: लातूर येथे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी रस्त्यांवरून वाहून वाया जाणाऱ्या पाण्याचे (रोड रेन वॉटर हार्वेस्टिंग) फेरभरण करणारे शोषखड्डा तंत्र विकसित केले आहे. लातूर तालुक्यात गंगापूर ते निवळी या दहा किलोमीटर अंतरात दुतर्फा हा उपक्रम राबवत एकूण ७० शोषखड्डे बांधण्यात आले आहेत. त्यातून भूजल तसेच रस्त्यांच्या बाजूस शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरची पाणीपातळी वाढली आहे. शिवाय पाणी साचल्याने रस्त्यांची होणारा दुरवस्थाही थांबण्यास मदत झाली आहे.
अनेक वेळा पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहून वाया जाते. अति पाण्याने खड्डे पडून रस्ते खराबही होतात. हेच वाया जाणारे अडवणे शक्य आहे. दुसरी बाब म्हणजे शेतीसाठी अनियंत्रित उपसा केल्याने भूजलाची पातळीही खोल गेली आहे. परिणामी, फेरभरणाचे विविध उपाय हाती घ्यावे लागले आहेत. लातूर तालुक्यातील अनेक गावे अतिउपसा क्षेत्रात येत असून शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीचाही लाभ बंद झाला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी रस्त्यावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब मुरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
अधीक्षक अभियंत्याची तंत्रनिर्मिती
मूळचे बीड येथील डॉ. सलीम शेख सध्या लातूर येथे सार्वजनिक बांधकाम मंडळात अधीक्षक अभियंता पदी कार्यरत आहेत. ते स्थापत्य अभियंता असून त्यांनी एमटेक व डॉक्टरेट या उच्च पदव्याही प्राप्त केल्या आहेत. रस्त्यांवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी शोषखड्ड्यांद्वारे अडवण्याचे म्हणजेच रोड रेन वॉटर हार्वेस्टिंगचे तंत्रज्ञान त्यांनी तयार केले आहे. सन २०२१- २२ च्या सुमारास त्यांनी या संशोधन प्रकल्पास सुरुवात केली.
त्यास जिल्हा नियोजन समितीतून २९ लाख ९८ हजार ९९ रुपयाचा निधी मंजूर झाला. त्या अंतर्गत गंगापूर ते निवळी रस्त्यावर सावरगाव, गंगापूर, चिंचोलीराव दरम्यान दहा किलोमीटर अंतरात उजव्या बाजूस ३३ तर डाव्या बाजूस ३७ असे एकूण ७० शोषखड्डे बांधण्यात आले. जुलै, २०२२ च्या काळात हे काम पूर्णत्वास गेले.
प्रकल्पाची फलश्रुती
ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ या काळात घेतलेल्या प्रयोगांचे निरीक्षण करण्यात आले. ऑक्टोबर २०२२ पर्यंत या परिसरात ८८६ मिमी. पाऊस झाला. शोषखड्डा परिसरात पडलेल्या पावसाचे फेरभरण झाले. यात ११ कोटी १७ लाख लिटर पाणी मुरले. तीस शेतकऱ्यांच्या १३ विहिरी व तीस बोअरच्या पाणी पातळीचे निरीक्षण करण्यात आले.
सन २०२१ मधील पाणी पातळीची तुलना केल्यानंतर सुमारे पाच- सहा फूट उंचीने भूजल पातळी वाढण्याचे आढळले. त्याचा फायदा अंकोली, सावरगाव, चिंचोली, चिंचोलीराव वाडी, गंगापूर व खंडापूर शिवारातील शेतकऱ्यांना झाला. एरवी पावसाच्या जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी केवळ १५ टक्के पाणी जमिनीत मुरते. मात्र डॉ. शेख यांच्या प्रयोगात हेच ८० टक्के पाणी जमिनीत मुरविण्यात यश आले आहे.
...असे वापरले शोषखड्डे तंत्र
रस्त्यांच्या बाजूच्या नाल्यांमध्ये सुमारे प्रत्येकी २५० ते ३०० मीटरवर बारा फूट रुंद, १५ फूट लांब व बारा फूट उंचीचे शोषखड्डे खोदले. त्यात दोन ते अडीच फूट उंचीचे चार थर करून विशिष्ट आकाराचे दगड (खडी) विटांचे तुकडे भरले. खड्ड्यांभोवती दोन- अडीच फूट उंचीचे कडे तयार केले. खड्डे पाण्याने भरले की त्यातूनही वाहून जाणार. मात्र पाण्याची १५ सेंटिमीटर पातळी राहावी यासाठी खड्ड्यांमध्ये पीव्हीसी पाइपचा योग्य वापर केला. बांधकाम व्यवस्थित राहावे यासाठी काँक्रीटचा थर केला.
रस्त्याकडेला जी गटार आहेत त्यांचे खोली व सरळीकरण करून ते शोषखड्ड्यांना जोडून घेतले. त्यामुळे शोषखड्डा भरल्यानंतर अतिरिक्त पाणी पुढे वाहत जाऊन दुसऱ्या शोषखड्ड्यात जाण्याची सोय झाली. रस्त्यांवरील शंभर टक्के पाणी शोषखड्ड्यात जात आहे का, त्याला कुठे अडथळा तर येत नाही नाही ही बाब कटाक्षाने पाहिली. बाजूच्या शेतातील पाणीही त्यात येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही ठिकाणी खड्ड्याला शेताच्या बाजूने पाइपचा वापर करून पाणी शोषखड्ड्यात घेण्यात आले.
...असे होते ‘रोड रेन वॉटर हार्वेस्टिंग’
पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जळकोट तालुक्यात केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर सावरगाव - होकर्णा या प्रमुख जिल्हामार्ग क्रमांक २५ च्या कडेला यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान काही अंतरात २४ शोषखड्डे बांधण्यात आले आहेत. कव्हा ते लामजना पाटी रस्त्यावरही शोषखड्डे घेण्यात आले आहेत. इमारतीच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे फेरभरण (रुफ वॉटर हार्वेस्टिंग) करण्याच्या पद्धतीत थोडा बदल करून वर्षा रस्ते जलसंचयनाचे (रोड रेन वॉटर हार्वेस्टिंग) हे तंत्रज्ञान आहे.
पावसाचे पाणी वेगाने जमिनीत वेगाने मुरवण्यासाठी कमी- जास्त आकाराच्या दगडाचे थर देण्यात आले आहेत. या शोषखड्डा रचनेत डांबरी रस्त्यावरुन पाणी वेगाने रस्त्याच्या मुरुमाच्या बाजूच्या व उताराने रस्त्याकडेच्या भागात येते. वरील बाजूस लहान तर तळाला मोठ्या आकाराचे दगड आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वरील चाळीस मिलिमीटर आकाराच्या दगडाचा थर फूटभर काढून पुन्हा भरण्यात येतो. यामुळे साचलेली माती व काडीकचरा निघून जाण्यास मदत होते.
पेटंट प्रक्रियावस्थेत
रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोग विविध ठिकाणी होतात. मात्र दहा किलोमीटर अंतरामध्ये गावांच्या परिसरात मुख्य रस्त्यांवरून वाहून जाणारे पाणी अडवण्याचा हा प्रयोग वेगळा असल्याचे डॉ. शेख सांगतात.
त्यामुळे शासकीय पेटंट कार्यालयाकडे त्याच्या पेटंटचा अर्ज केला असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही हा उपक्रम आवडला असून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचाही हा उपक्रम राबवण्याचा मानस आहे.
कमी खर्चातील खड्डानिर्मिती
प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात शाखा अभियंता विजय आवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले, की प्रति शोषखड्डा तयार करण्यासाठी सुमारे ६० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. रस्ता व रस्ता दुरुस्ती खर्चाच्या तुलनेत हा खर्च कमी आहे. या प्रयोगाच्या यशानंतर एडीबी बँक, केंद्रीय मार्ग निधी तसेच नाबार्डमधून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांतूनही हे शोषखड्डे घेण्यात येत आहेत.
या प्रकल्पाचा परिणाम म्हणून माझ्या शेतातील विहीर व बोअरची पाणीपातळी वाढली आहे. महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पाणी टिकून राहात आहे. असाच प्रत्यय दहा किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांना आला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शोषखड्ड्यात साठलेली माती बाजूला काढून आम्ही त्यांची काळजी घेतो.
अच्युत गोपाळराव दरेकर ९२८४०६९०३९ शेतकरी, चिंचोली (ता. जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.