Turmeric  Agrowon
यशोगाथा

व्यवस्थापनातून चांगल्या हळद उत्पादनात सातत्य

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील संजय देशमुख यांनी सात- आठ वर्षांपासून ८ ते १० एकरांमध्ये हळद उत्पादन घेत आले आहेत. एकरी ३५ क्विंटलच्या आसपास दरवर्षी उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नेटके नियोजन व व्यवस्थापन तंत्र याद्वारे या प्रयत्नांत त्यांना यशही आले आहे.

 गोपाल हागे

वाशीम जिल्ह्यात शिरपूर जैन या गावात संजय भीमराव देशमुख यांची सुमारे २० एकर शेती आहे. हळद हे त्यांचे मुख्य पीक आहे. दरवर्षी ८ ते १० एकर क्षेत्र ते या पिकासाठी राखीव ठेवतात. या पिकातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख झाली आहे.

हळद व्यवस्थापनातील बाबी

-सेलम हे वाण देशमुख वापरतात. दर तीन वर्षांनी फेब्रुवारीच्या दरम्यान एकरी सात ट्रॉलीपर्यंत शेणखत ते वापरतात. त्यानंतर नांगरणी करून जमीन दोन महिने तापू देतात. काही दिवसांनी जमिनीत रोटाव्हेटरचा वापर करून जमीन चांगली भुसभुशीत करून घेतात. लागवडीचे नियोजन १५ ते २५ मे च्या दरम्यान असते. त्यापूर्वी एकरी तीन बॅग्ज सिंगल सुपर फॉस्फेट देण्यात येते. त्यानंतर चार ते साडेचार फुटी बेड आखला जातो. लागवडीपूर्वी बेड चांगले ओले करून घेतले जातात. यामुळे मातीत असलेली उष्णता निघून जाते.

-कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया केली जाते. मजुरांकरवी व ते पुरेसे उपलब्ध नसल्यास यंत्राद्वारे व गट्टू असल्यास चार इंचापर्यंत खोल जाईल या पद्धतीने लागवड होते.

-लागवड झाल्यानंतर त्यानंतर एक ते दीड महिन्यांनी अशी दोन वेळा तणनाशकांची फवारणी घेण्यात येते. हळदीचे कोंब दिसू लागल्यानंतर २० ते २५ दिवसांनंतर एकरी एक पोते डीएपी देतात. पहिली भर देऊन साधारण आठ ते दहा दिवसांनी एकरी एक पोते युरिया देण्यात येतो. म्यात येतो

-सुरुवातीचे दोन ते तीन पाणी स्प्रिंकलरद्वारे दिले जाते. त्यानंतर ठिबक सिंचनाचा वापर होते.

वाढीच्या अवस्थेमध्ये ४० ते ४५ दिवसांनी १९- १९-१९, तीन दिवसांच्या आड दिले जाते. त्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी तिसरी म्हणजे शेवटची भर देण्यात येते. पुढे १२-६१-०, १३-०-४५ आदी विद्राव्य खते देण्यात येतात. मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त ह्युमिक ॲसिड,

झिंक, फेरस, मॅग्नेशिअम, निंबोळी पेंड यांचाही वापर होतो. ०.०.५० हे खत पिकाच्या शेवटच्या टप्प्यात एकरी १५ किलो दर तीन ते चार दिवसांनी पाच किलोप्रमाणे ठिबकद्वारे देण्यात येते.

-देशमुख दरवर्षी घरचेच बियाणे वापरतात. त्याची गुणवत्ता चांगली असल्याने सुमारे १०० क्विंटलपर्यंत बियाण्याचा खप दरवर्षी होतो असे देशमुख सांगतात. एकरी उत्पादन खर्च किंमान ५५ ते ६० हजार रुपयांच्या घरात असतो. दरवर्षी हवामानानुसार एकरी ३२ ते ३५ व कमाल ४० क्विंटलपर्यंत हळदीचे उत्पादन मिळते. अलीकडील काळात हळदीला सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये व कमाल आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. रिसोड व हिंगोली या बाजारपेठा आहेत.

शेतीतील अन्य नियोजन

देशमुख यांची २० एकर शेती आहे. सिंचनाच्या सोयीसाठी दोन सौर पंप व विजेवर चालणारा कृषिपंप बसविला आहे. सुमारे पाऊण एकरात शेततळे घेतले आहे. हळदीव्यतिरिक्त सहा ते सात एकरांत व अलीकडील काळात ८ ते १० एकरांपर्यंत कांदा बीजोत्पादन घेण्यात येते. एकरी सरासरी चार ते सहा क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. क्विंटलला ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत दर त्यांना मिळाला आहे. सुमारे ३५ गुंठ्यांमध्ये दोन शेडनेट्‍सची उभारणी केली आहे. त्यात फ्लॉवर किंवा कोबी व त्यानंतर ढोबळी मिरचीचे पीक घेण्यात येते. काही वर्षे पपईचेही पीक घेतले. परंतु विषाणूजन्य रोगामुळे लागवड थांबवली आहे.

संपर्क ः संजय देशमुख, ७०३०८०६०७१

केव्हीकेतर्फे हळद तंत्रज्ञान प्रसार

वाशीम जिल्ह्यात हळद पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर जिल्ह्यात लागवड होत असावी. जिल्ह्यात हे प्रमुख नगदी मसालेवर्गीय पीक म्हणून समोर येत आहे. हे लक्षात घेता वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने (केव्हीके) शाश्‍वत पद्धतीने अधिकाधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने विविध चाचण्या, प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे आणि प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदशन करण्यात येत आहे.

यामध्ये नव्या जातींचे विशेषतः कमी कालावधीत येणाऱ्या वाणांचे प्रयोग राबविण्यात आले. पीडीकेव्ही वायगाव या वाणाचे क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन शेतकऱ्यांनी घेऊन दाखविले. यासोबतच एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, मातृ कंदाची बेणे म्हणून लागवड आदींची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्यात आली. कांडी बेण्याच्या तुलनेत मातृकंद वा गट्टूची लागवड केली तर उत्पादकता जास्त येते. त्या दृष्टीने त्याची निवड करणे, जैविक तसेच रासायनिक पद्धतीने बेणेप्रक्रिया करणे, ९० सेंमी रुंदीच्या व ३० सेमी उंचीच्या रुंद वरंबा सरी (गादी वाफा) पद्धतीने लागवड करणे, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, शिफारशीत व संतुलित खतांचा वापर, सेंद्रिय निविष्ठा (शेणखत, कम्पोस्ट खत, जिवामृत आदींच्या वापरावर भर, ठिबकद्वारे रासायनिक व जैविक स्लरी देणे, लागवडीनंतर सात महिने झाल्यानंतर पाणी हळूहळू कमी करून आठ महिने झाल्यानंतर ते बंद करणे आदी बाबींबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीनेही उत्कृष्ट उत्पादन घेत आहेत.

या पिकात लागवडीसाठी, भर देण्यासाठी व काढणीसाठी मोठ्या प्रमाणत मजूर लागतात. यासाठी यंत्राद्वारे लागवड, पाॅवर टिलरच्या माध्यमातून भर घालणे आदी प्रयत्न होत आहेत. काढणीपश्‍चात तंत्रामध्ये हळद वाफेवर शिजविणे, वाळविणे व पॉलिश करणे यामधील बारकावे लक्षात घेऊन योग्य तंत्र अवलंबिणे गरजेचे आहे. त्यातून कुरकुमीन सोबतच हळदीची प्रत सुधारून अधिक दर मिळू शकतात, याची जाणीव शेतकऱ्यांना करून देण्यात केव्हीके यशस्वी झाले आहे. या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी एकरी २५ ते ३० क्विंटल वा त्याहून अधिक उत्पादकतेपर्यंत पोहोचले

आहेत.

संपर्क ः

निवृत्ती पाटील

उद्यान विद्या विषय तज्ज्ञ, केव्हीके, वाशीम

८३२९२०४५१२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT