Banana Production Agrowon
यशोगाथा

Banana Production : धुळ्यातील केळी उत्पादकांचे सातत्यपूर्ण उत्पादन, बाजारपेठेत केली विशेष ओळख

धुळे जिल्ह्यातील तोंदे (ता. शिरपूर) येथील विशाल पाटील यांनी सातपुडा पर्वतालगतच्या आपल्या गोटेमिश्रित जमिनीत निर्यातक्षम केळीचे सातत्याने उत्पादन घेत बाजारपेठेत विशेष ओळख तयार केली आहे.

Chandrakant Jadhav

Dhule News : खानदेशात जळगाव जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील (Dhule District) प्रगतिशील केळी बागायतदारांनीही (Banana Producer) आपली विशेष ओळख तयार केली आहे. तोंदे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील विशाल विजय पाटील त्यापैकीच एक आहेत. त्यांची २२ एकर शेती आहे.

शेतीच्या जोडीला बांधकाम कंत्राटीचाही व्यवसाय आहे. त्यांची काही शेती काळी कसदार तर काही भुरी माती वा लाल गोटेमिश्रित आहे. विशाल यांनी विधी विषयातून पदवी घेतली आहे. सुरुवातीला काही काळ वकिली केली.

वडील विजय यांच्या मृत्यूनंतर शेतीची जबाबदारी आली. घरी पूर्वीपासून केळी पीक होते. मात्र अलीकडील काही वर्षांपासून सुधारित पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. तरडी (ता. शिरपूर) येथील मित्र किशोर शिवाजी पाटील, खरेदीदार नीलेश राजपूत (चाळीसगाव), बलरामसिंह सोलुंकी व गावातील नातेवाईक पद्माकर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

आजोबा आनंदराव व आजी बुगाबाई यांच्याकडून प्रेरणा व व्यवहारचातुर्य मिळाले. गावात अनेर नदीचा स्रोत तसेच शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांमुळे जलसाठे मुबलक आहेत. विशाल यांच्याकडे तीन कूपनलिका आहेत.

व्यवस्थापनातील सुधारणा

-व्यवस्थापनात बदल करताना मातीच्या प्रकाराचा प्राधान्याने विचार. गोटे मिश्रित जमिनीत काळ्या मातीची भर. दरवर्षी आवश्यकतेनुसार एकरी १८ ट्रॉली माती, सहा ट्रॉली शेणखत वापर.

-जमिनीचा ओलावा टिकवण्यासह पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी पांढऱ्या मातीची भर.

-पीक अवशेष जमिनीत गाडले.

-केवळ केळीवर अवलंबून न राहता शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी पपईतून फेरपालट व उन्हाळ्यात कलिंगडाचे नियोजन. त्यासाठी नवे वाण, बाजारपेठ यांचा सखोल अभ्यास.

-केळीसाठी फ्रूट केअर तंत्रज्ञान आत्मसात. लागवडीसाठी जून- जुलै (मृग बहर) हंगामाची निवड.

-दरवर्षी सहा ते सात एकरांत केळी. सात बाय पाच फूट अंतरात गादीवाफ्यावर लागवड.

-बाग कुकुंबर मोझॅक विषाणूजन्य रोगापासून (सीएमव्ही) मुक्त ठेवण्याचा प्रयत्न. त्यासाठी बागेभोवती व बांधावर स्वच्छता. बागेचे सतत निरीक्षण.

-खानदेशात थंडीत चिलिंग इंज्युरी’ होते. त्यामुळे अनावश्यक कोरडी पाने न कापता झाडाभोवती तशीच सोडली. घड झाकण्यासाठी स्कर्टिंग बॅग व कागदाचा वापर केला. त्यामुळे थंडीत बागेला ऊब मिळाली.

-विशाल यांनी अभ्यासूवृत्ती जोपासली आहे. ते घेत असलेली फळपिके जोखमीची व संवेदनशील आहेत. उत्पादन खर्च अधिक लागतो. अनेक व्यापारी व खरेदीदार कंपन्यांच्या संपर्कात ते कायम असतात. तज्ज्ञ, मास्टर शेतकऱ्यांकडे जाऊन शिकण्याची वृत्ती जोपासली आहे.

निर्यातक्षम उत्पादन व निर्यात

अलीकडील वर्षांत एकरी २७ ते ३० टनांपर्यंत उत्पादन व रास २७ ते कमाल ३५ किलोपर्यंतची मिळाली आहे. साडेदहा ते ११ महिन्यांत १०० टक्के काढणी होते. त्यानंतर खोडवा घेतला जातो. त्याचेही गुणवत्तापूर्ण उत्पादन कमी खर्चात साध्य केले जाते.

कारण रोपे, लागवड, ठिबक, व अन्य श्रमांत बचत होते. सुमारे ८० ते ९० टक्के केळीची मध्यस्थ कंपनीमार्फत इराण, इराक, सौदी अरेबिया, कतार, बहारीन येथे निर्यात होते. काढणी फेब्रुवारीत सुरू होऊन एप्रिल, मेपर्यंत पूर्ण होते.

यंदा सुरुवातीला ३० रुपये प्रति किलो, मार्चमध्ये साडेवत्तीस रुपये दर मिळाला. मागील दोन वर्षांत २० ते २५ रुपयांपर्यंत दर मिळाला.

पपई व कलिंगड

केळी काढणीनंतर फेरपालट म्हणून पपईची पाच ते सहा एकरांत लागवड असते. पूर्वी तैवान ७८६ हे वाण होते. मात्र रिंग स्पॉट व्हायरस मुळे अलीकडे १५ नंबर वाण घेतले जात आहे. तुलनेने ते विषाणूजन्य रोगाला कमी बळी पडतो.

प्रति झाड ८० ते १०० किलो उत्पादनाचे उद्दिष्ट असते. पाठवणूक उत्तर भारतात होते. आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो. मॉल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीला पपई देण्यात येते. कलिंगडाचे एकरी १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. तीनही फळांच्या गुणवत्तेमुळे व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात.

केळीचे मार्केट जोरात

नैसर्गिक समस्यांमुळे आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेशात केळी उत्पादन घटले आहे. जळगावात ‘सीएमव्ही’ रोग केळीसाठी मारक ठरला. त्यामुळे वर्षभरापासून केळीचे दर तेजीत आहेत.

निर्यातीसाठीही उठाव आहे. यंदा निर्यातक्षम केळीला विक्रमी ३२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. खानदेशात १२ निर्यातदार कंपन्यांना केळी हवी आहे. काश्‍मीर भागातील मार्ग मोकळे झाल्याने तेथेही मोठी मागणी आहे.

पंजाब, दिल्ली भागांत मॉलमध्ये दररोज २० ते २२ ट्रक मागणी असते. तर खानदेशातून दररोज १० ते १२ कंटेनर निर्यात परदेशात होत आहे. धुळ्यातून ही निर्यात तीन कंटेनरपर्यंत आहे. स्थानिक बाजारात किमान १९, कमाल २८ रुपये प्रति किलो दर आहे.

विशाल पाटील, ८००७०७२०१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam: उजनीतून ९० हजार क्युसेक विसर्ग

POS Device: खतविक्रीसाठी नवे पॉस मशिन बंधनकारक

Monsoon Rain Update: ताम्हिणी घाटात ‘रेकॉर्ड ब्रेक’ ५७५ मिमी पावसाची नोंद

Papaya Price: खानदेशात पपईचे दर १२ ते २० रुपये किलो

Farmer Support: शासन अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी :भरणे

SCROLL FOR NEXT