Fish Farming with paddy farming
Fish Farming with paddy farming Agrowon
यशोगाथा

Fish Farming : धानशेतीला मत्स्यपालनाचा मोठा आधार

Vinod Ingole

Fish Farming: चंद्रपूर हा दुर्गम व भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावांचा प्रदेश असेही त्यास म्हटले जाते. याच जिल्ह्यातील बोरचांदली हे सुमारे १५५० लोकसंख्येचे गाव मूल या तालुका ठिकाणापासून अवघ्या चार किलोमीटरवर आहे.

धान (Paddy) हे इथले मुख्य पीक आहे. काही शेतकरी कापूस पिकाकडे (Cotton Crop) वळले आहेत. भातशेतीत यांत्रिकीकरणासाठी (Agriculture Mechanization) काहींनी पुढाकार घेतला आहे. ‘हार्वेस्टर’च्या माध्यमातून कापणी, बांधणी आणि मळणी अशी तीनही कामे यंत्राद्वारे होतात.

धानाला शोधला पर्याय

गावात बोरचांदली येथे राजीव येनुगवार यांची वडिलोपार्जित शेती आहे. शेतीची वाटणी झाल्यानंतर राजीव यांच्या वाट्याला १६ एकर जमीन आली. सोबतच आत्याची शेतीही विकत घेतली.

आज येनुगवार यांची एकूण ३२ एकर शेती आहे. त्यात भात हेच मुख्य पीक आहे. ते जवळच्या गावी खासगी महाविद्यालयात प्राचार्य आहेत.

शेतीची आवड पहिल्यापासून जपल्याने प्राचार्यपदावरील नोकरीची जबाबदारी सांभाळत दररोज सकाळी ते शेतीला वेळ देतात. सुट्ट्यांच्या दिवशी बहुतांशी वेळेत शेतातच असतात.

येनुगवार सांगतात, की सन २०१३ मध्ये जे दर भाताला मिळायचे तेच दर आजही आहेत. म्हणजे दहा वर्षांत दरांत फरक नाही, पण उत्पादन खर्च कमालीचा वाढला आहे. त्यामुळे ही शेती किफायतशीर राहिलेली नाही.

त्यामुळे पर्यायी पूरक व्यवसायाचा शोध घेत होतो. सन २००७-०८ च्या काळात दीड एकरांतील धानाला पाणी देण्यासाठी ५०० फूट लांब, १०० रुंद आणि सहा फूट खोलीचा तलाव बांधला होता.

पावसाचे पाणी साठवणे, त्याचा पिकासाठी उपयोग करणे असा त्याचा उद्देश होता. त्यातूनच मत्स्यपालनाचा (Fish Farming) शोध लागला.

प्रगतीकडे वाटचाल

अडीच एकरांत धान वाफे होते. ते मोडून त्यात काही करता येईल का असा विचार येऊ लागला. त्यातील पाणी शेतीसाठी वापरता येणार होते. दोन लाख रुपये खर्च केला.

दोन साठवण तलाव तयार झाले. मग मत्स्यपालनासाठीचा तलाव (टॅंक) पसरट असावा अशी माहिती मिळाली.

त्यामुळे दोन तलावांमधील भाग खोदून काढत चार एकरांचा एकच तलाव करण्यात आला. चार वर्षांत टप्प्याटप्प्याने एकेक पाऊल पुढे टाकत त्यात जम बसविला असून प्रगती सुरू आहे.

...असे आहे मत्स्यपालन

१) सध्या एकूण नऊ टॅंक. (दोन जुने व बाकीचे अलीकडील काळातील) चार लहान, दोन मध्यम व तीन मोठे असे हे वर्गीकरण.

मत्स्यबीजांना योग्यप्रकारे खाद्य पुरवठा व्हावा हा त्यामागे उद्देश. पूर्वी फीड दिल्यानंतर मोठे मासेच फस्त करायचे. ही बाब लक्षात आल्यानंतर वर्गवारीचा निर्णय.

२) मत्स्यबीज लहान टॅंकमध्ये सोडण्यात येते. ५० ते ६० ग्रॅम वजनाचे झाल्यानंतर त्यांना मध्यम टॅंक व त्यानंतर चार महिन्यांनी मोठ्या टॅंकमध्ये सोडले जाते.

३) आयएमसी (इंडियन मेजर कार्प) या जातींचे मासेपालन. रोहू, कटला, मृगल, सायप्रिनस, ग्रासकार्प आदींची विविधता.

४) स्थानिक भागातील हॅचरीतून मत्सबीजे आणली जातात. जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तलाव पावसाच्या पाण्याने पूर्ण भरतात. याच काळात मत्स्यबीजे सोडली जातात.

५) तलावाच्या पृष्ठभागात रोहू, मधल्या भागात (लेअरमध्ये) कटला राहतात. खालच्या भागात सायप्रिनस आणि मृगल राहतात.

ग्रासकार्प ही जात काठाकाठाने (कॉर्नर फीडर) राहते व पाण्यालगतच्या वनस्पती खाते.

६) बाजारपेठेतील मागणी व माशांचे वजन लक्षात घेऊन कटला आणि रोहू प्रत्येकी ३० टक्‍के व अन्य माशांचे ४० टक्‍के प्रमाणात मत्स्यबीज सोडले जाते.

७) पॅलेट फीड तसेच भुईमूग, मोहरीची ढेप, धानाचा भुस्सा. लहान माशांना वजनाच्या ५ टक्‍के फीड दिले जाते

८) पक्ष्यांकडून माशांना लक्ष केले जाते. शिकारा पक्षी वरून अचानक खाली येतो आणि माशांना अलगद उचलतो.

‘फीडिंग’वेळी अधिक त्रास होतो. कारण मासे खाद्यासाठी पृष्ठभागापर्यंत येतात. त्यामुळे ‘बर्ड नेट’ लावण्याचे काम हाती घेतले आहे.

९) दोनशे मत्स्यबीजांपासून दीड वर्षे कालावधीत सरासरी ३० टक्‍के मरतूक अपेक्षित धरता ७० टक्‍के मासे मिळतात.

पाच ग्रॅम मत्स्यबीजापासून एक किलोचा मासा तयार करण्यासाठी सरासरी ८० रुपये खर्च होतो. यात खाद्य, मजुरी, बर्डनेट, वीज, औषधे यावरील खर्चाचा समावेश.

विक्री व अर्थकारण

येनुगवार सांगतात, की एकरी दोन हजार मत्स्यबीज सोडले, तर मरतूक गृहित धरून १४०० मासे

जिवंत राहतात. प्रकारानुसार एक ते तीन किलो वजनाचा मासा मिळतो. चामोर्शी (गडचिरोली), मूल तालुका व लगतच्या गावातील व्यापाऱ्यांकडून बांधावरच खरेदी होते.

सप्टेंबर- ऑक्टोबर काळात किलोला १८० ते १८५ रुपये दर मिळतो. अन्य काळात हा दर १४० ते १६० रुपयांपर्यंत व काही वेळा त्याखालीही जातो.

एकरी सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पिकांसाठी संरक्षित पाण्याचा साठाही उपलब्ध होतो.

घ्यावयाची दक्षता

गेल्या वर्षी विजेअभावी एरिएटर बंद होते. परिणामी, पाण्यातील अमोनिया वाढला. त्यामुळे तीन लाख रुपयांचे मासे मरण पावले. येनुगवार सांगतात, की मत्स्यपालनात पाण्याची मानके लक्षात घेणे गरजेचे आहे.

पाण्याचा पीएच संतुलित हवा. तो नऊच्या वर जायला नको आणि साडेसहाच्या खाली नसावा. पाण्यातील अमोनिया नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारात काही घटक उपलब्ध आहेत. ऑक्सिजन कमी झाला तरी अमोनिया वाढतो.

येनुगवार यांनी ‘पॅडल व्हील एरिएटर’चा वापर एकरी दोन यानुसार केला आहे. पाण्यामध्ये जेव्हा ते फिरते त्या वेळी पाणी वर उडते.

या प्रक्रियेतून हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळून त्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. एका एरिएटरची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत आहे. एकरात जास्तीत जास्त दोन हजार मत्स्यबीजे असावीत असा निकष आहे.

परंतु काही मत्स्यपालक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, माशांची वाढ अपेक्षित मिळत नाही, असे येनुगवार सांगतात.

धानासोबतच आंबा लागवड

१२ एकरांवर धान आहे. सोबतच तीन एकरांवर आंबा असून दशहरी, तोतापुरी, सफेद असे वाण बागेत आहेत. गेल्या वर्षी ६५ झाडांपासून दीड लाखाचे उत्पन्न मिळाले.

राजीव येनुगवार, ९५१८७६०७२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT