Solar Energy Agrowon
यशोगाथा

Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

सुदर्शन सुतार

सुदर्शन सुतार

Success Story of Solar Energy Farming : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीपासून १० किलोमीटरवर बेंबळे (ता. माढा) हे सुमारे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. क्षेत्र सुमारे तीन हजार हेक्टर, पैकी २७०० हेक्टर क्षेत्र वहिवाटीखाली असून, शेतकऱ्यांची संख्या २५०० पर्यंत आहे.

भीमा नदीचा काठ आणि उजनी धरणाच्या चहूबाजूंच्या कालव्यामुळे बेंबळे परिसराला पाण्याचा शाश्‍वत स्रोत मिळाला आहे. त्यामुळे या भागात ऊस, केळी ही पिके प्रामुख्याने दिसून येतात. शिवाय केळी, द्राक्ष, पेरू, डाळिंब व अन्य फळपिकांचाही समावेश आहे. साहजिकच शेतीसाठी विजेची मागणी सर्वाधिक असते.

भारनियमनावर काढला तोडगा

अन्य गावांप्रमाणेच बेंबळेतील शेतकऱ्यांना भारनियमन किंवा पुरेशा दाबाने वीज न मिळण्याची समस्या सतत भेडसावायची. सुमारे सात वर्षांपूर्वी गावातील निवृत्त तालुका कृषी अधिकारी हनुमंत भोसले आणि प्रगतिशील शेतकरी जयवंत भोसले या बंधूंनी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे ठरवले.

त्यासाठी सौरऊर्जाचलित पंपांचा वापर करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. सरकारने शेतकऱ्यांसाठी अटल सौरऊर्जा योजना सुरू केली आहे. परंतु पुरेशा माहितीअभावी शेतकऱ्यांचा त्यास म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. मग भोसले बंधूंनी योजनेची पूर्ण माहिती देण्यासह त्याचा अर्ज

भरून देण्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली. त्या वेळी सौरपंपाच्या तीन, पाच आणि साडेसात एचपी क्षमतेनुसार ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळायचे. भोसले बंधूंनी स्वतःच्या शेतात पंप बसवून

पाण्याचा उपसा सुरू केला. ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हळूहळू शेतकरी तिकडे वळू लागले. गावातील सिद्धेश्‍वर शिंदे यांनीही शेतकऱ्यांना या संकल्पनेचे महत्त्व विषद करण्यात मदत केली.

वीजबिलात मोठी बचत

आज बेंबळे शिवारात ५५० पर्यंत सौरऊर्जेवरील शेतीपंप सुरू आहेत. त्यामुळे शिवारातील ऊस, केळी, डाळिंब आदी शेतांमध्ये त्याची पॅनेल यंत्रणा पाहण्यास मिळते. एका विजेवरील पंपाला प्रति तीन महिन्यांत पाच हजार रुपये बिल येते. या हिशेबाने एका पंपाचे वार्षिक बिल २० हजार रुपये येते.

गावातील एकूण ५५० पंपाच्या वार्षिक वीजबिलाचा विचार करता ११ कोटी रुपयांपर्यंत बिलात बचत गावातील शेतकऱ्यांनी करून दाखवली आहे. ही बचत शेतीतील नफ्यात भर घालणारी ठरली आहे.

शेतीसाठी दिवसा मिळते वीज

पूर्वी गावात पाच तास किंवा त्याहूनही अधिक काळ भारनियमन व्हायचे. बागायती पिकांमुळे पाणी उपशासाठी विजेची मोठी गरज असताना शेतकऱ्यांना सतत ये जा करणाऱ्या विजेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागे. अनेकदा रात्री-अपरात्री पाण्यासाठी जागरण व्हायचे. त्यातूनही पिकांचे नुकसान ठरलेले असायचे, अनेकदा द्राक्ष, डाळिंब बागांना मोठा फटकाही सहन करावा लागला. पण आता

सौरपंपांमुळे दिवसा सहा ते आठ तासांपर्यंत पूर्ण क्षमतेने वीज मिळते. गावात सौरंपपांविषयी आता मोठी जागृती झाली आहे. शासनाचा महाऊर्जा विभाग आणि महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी या योजना सध्या कार्यान्वित आहेत. त्यासाठी गावातील आणखी ५०० शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यांनाही योजनेचा लाभ मिळाल्यास बेंबळे हे शेतीसाठी ५० टक्के सौरंपप वापरणारे गाव ठरणार आहे.

बेंबळेतील शेतकऱ्यांचे अनुभव

दिवसा वीज मिळू लागल्याने भारनियमनाची सर्वात मोठी समस्या सुटली आहे. आम्हाला विद्राव्य खते व पाणी यांचा समन्वय योग्य प्रमाणात करून ‘फर्टिगेशन’ करणे सोपे झाले आहे. योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
विजय पवार, सरपंच ९९६००२३०९९
माझ्याकडे आंबा, ऊस ही पिके आहेत. साडेसात आणि पाच एचपी क्षमतेचे दोन सौरपंप आहेत. पंधरा एकरांपैकी आठ एकराला सौरपंपांनी पाणी देणे शक्य होत आहे. अन्य शेतकऱ्यांनाही मी त्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
हनुमंत भोसले (निवृत्त कृषी अधिकारी) ७५८८१६३८६९
माझ्याकडे १५ एकर शेती आहे, माझ्याकडे साडेसात एचपी, पाच एचपी आणि तीन एचपीचे असे तीन सौरपंप आहेत. आता ऊस, केळी, शेवगा ही पिके माझ्याकडे आहेत. दिवसा वीज मिळत असल्याने आणि योग्य दाबाने वीज मिळत असल्याने माझा मोठा प्रश्‍न सुटला आहे.
जयवंत भोसले ९९२१०३७४०१
पाच वर्षांपासून दोन सौर पंपांचा वापर करून ऊस घेत आहे. दिवसा वीज मिळण्याबरोबर वीजबिलात मोठी बचतही झाल्याचा अनुभव घेत आहे.
राजेंद्र कोळेकर
मी केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेतो. सौरपंपासाठी अर्ज केला असून अद्याप मंजूर व्हायचे आहे. सध्या विजेची मोठी समस्या भेडसावते आहे. सौर पंपामुळे माझ्या अडचणी सुटणार आहेत.
सोमनाथ हुलगे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT