Indian Agriculture Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : बेल्जियम टू नायगाव...

विकास गाढवे

Indian Agriculture : मनमोहन श्‍यामसुंदर बजाज (वय ४०) यांची मुरूड (ता. जि. लातूर) येथे पाच एकर शेती आहे. सूक्ष्मजीवशास्त्रात पदवी, जैवतंत्रज्ञान विषयात एम.एस्सी., तर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेटची (पीएचडी) पदवी घेतली. मूळपेशींपासून (स्टेमसेल) रक्तात वाढ करणे किंवा कर्करोगाच्या उपचारानंतर वेगाने रक्त वाढवणे हा त्यांच्या ‘पीएचडी’ संशोधनाचा विषय होता.

विद्यापीठाशी संलग्न राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रात त्यांनी सहा वर्षे संशोधनही केले. त्यानंतर २०१६ ते २०१९ या काळात युरोपातील बेल्जियम देशातील ‘स्टेमसेल इन्स्टिट्यूट’मध्ये पुढील संशोधन केले. कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा, कंपवात आदी मानवी आजारांमागील अनेक कारणांपैकी आहारात पोषकतत्त्वांची कमतरता व कीडनाशकांचे अवशेष ही कारणे असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले. त्यामुळे पौष्टिक व ‘रेसिड्यू फ्री’ अन्नाची आवश्‍यकता त्यांना वाटू लागली.

परदेशातून परतले मायदेशी

‘रेसिड्यू फ्री’ अन्नाची निर्मिती करायची तर मातीही सुदृढ, निरोगी हवी. त्यादृष्टीने आपल्या गावी परतून तशी शेती सुरू करायचे मनमोहन यांनी ठरवले. पत्नी व दोन मुलांसह बेल्जियमहून ते आपल्या गावी मुरूडला परतले.

त्यांचा हा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला. परंतु मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती. मुरूडपासून सुमारे सहा किलोमीटरवर नायगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे त्यांची पाच एकर शेती आहे. यासह शेतीतील भागीदार बिभिषण व संदीप हे गोरे पितापुत्र यांच्या दोन एकरांतही सुपीक जमीन व ‘रेसिड्यू फ्री’ अन्न निर्मितीचे प्रयोग सुरू केले.

शेतीतील प्रयोग

एक एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यात कांदा, लसूण, मिरची, वाटाणा, गवार आदी आंतरपिके घेतली. बांधाजवळ डाळिंब, केळी, हळद आदी पिके थोड्या क्षेत्रात घेतली. त्यात शंभर टक्के सेंद्रिय, जैविक पद्धतीचा वापर सुरू केला. पावणेदोन एकरात को ८६०३२ जातीचा ऊस घेतला. त्यात अल्प प्रमाणातच रासायनिक खतांचा वापर केला.

मनमोहन सांगतात, की मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नघटकही पिकाला पुरेशा प्रमाणात द्यायला हवेत. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने घडून येते. उत्पादन चांगले मिळते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पिकांना लागणारे अन्नघटक मातीतून उपलब्ध करण्याचे काम जिवाणू करतात. त्यांची संख्या व जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. पुरेसे शेणखत उपलब्ध होत नव्हते.

अशावेळी परिसरात असलेल्या मित्राच्या अळिंबी प्रकल्पातील कंपोस्ट खताचा वापर सुरू केला. धैंचा, उसपाचट, ठिबकच्या माध्यमातून नत्र, स्फुरद स्थिर करणारे, पालाश उपलब्ध करणारे जिवाणू, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास आदींचा वापर नियमित सुरू केला. पालापाचोळा कुजवून गांडूळ खत तयार केले. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ३२ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. त्यासाठी ‘पोकरा’ योजनेतून अनुदान मिळाले.

गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा अनुभव

मनमोहन सांगतात, की एकूण लागवडयोग्य क्षेत्रात दुष्काळात देखील १०७ टन ऊस उत्पादन मिळाले. प्रयोगशाळेत परीक्षण केले असता या उसाचा रस तुलनेने अधिक गोड होता. त्याचे प्रमाणही जास्त होते.

केलेल्या कष्टाचे फलित मातीने दाखविण्यास सुरुवात केल्याने उत्साह वाढला. चव व टिकवणक्षमता या दोन बाबींमध्ये भाज्या सरस ठरल्या. कांदा गोड होता. सध्या ड्रॅगन फ्रूटचा २५० ते ३०० किलोचा पहिला ‘फ्लश’ निघाला आहे. त्याची चवही गोड आहे. पुणे व मुंबई येथे ती पाठवण्यात येणार आहेत. सोयाबीन बहरात आहे.

सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी प्रयत्न

येत्या काळात शेतीमालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण आणि मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई व पुणे येथे बाजारपेठ मिळवण्यासोबत निर्यातीचेही लक्ष आहे.

मनमोहन म्हणतात, की आमच्या भागात ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय गुळाला चांगली मागणी आहे. त्यादृष्टीने उत्पादन व निर्यातीचे प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो.

कौतुक आणि उत्सुकता

मोठा पगार देणाऱ्या नोकरीच्या मोठ्या संधी सोडून परदेशातून गावी आलेल्या युवकाचे मातीत राबणारे हात पाहून अनेकांना मनमोहन यांचे कौतुक व उत्सुकता वाटते. शेतीत रमण्याबरोबर मनमोहन कर्करोगावर उपचार करणाऱ्या एका कंपनीसाठी सल्लागार म्हणूनही कार्य करतात. त्यात केलेल्या संशोधनाचा ते पुरेपूर वापर करतात. वडील श्यामसुंदर बजाज, आई अनुराधा व पत्नी शिल्पा यांचे त्यांना नेहमीच पाठबळ मिळते. भाऊ मधुसूदन चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांची ‘मार्केटिंगर्टीं मध्ये मदत मिळते.

पौष्टिक अन्न औषधासारखे काम करते. सुपीक माती व जिवाणूंच्या मुबलकतेमुळे पिकांमध्ये सर्व पोषणतत्त्वे, खनिजे, जीवनसत्त्वे, रोगप्रतिकारक ‘फायटो केमिकल्स’ आदी अन्न घटक मिळतात. असे पोषणयुक्त अन्न खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. पुढच्या पिढीला सुपीक माती व निरोगी अन्न द्यायचे आहे. त्यादृष्टीने ज्ञानाचा उपयोग होईल असे कार्य करण्यासाठी परदेशातून गावी परतलो आहे.

मनमोहन बजाज, ९२७०६९६२९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT