Yarn Production Agrowon
यशोगाथा

Silk Cocoon : रेशीम कोषांपासून कच्चे धागेनिर्मितीचा स्वयंचलित प्रकल्प

देवमूर्ती (ता. जि. जालना) येथे रेशीम कोषांपासून कच्चे धागेनिर्मितीचा स्वयंचलित पद्धतीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. यामध्ये प्रति दिन ३०० किलो रेशीम कोषांवर प्रक्रिया होऊन ४५ किलो धागानिर्मिती होते. सुमारे चार राज्यांमध्ये या धाग्यांना मार्केट मिळवून वार्षिक चार कोटी उलाढालीपर्यंत या युनिटने मजल मारली आहे. रेशीम उत्पादकांनाही कोषांसाठी बाजारपेठ व स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती झाली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

राज्यातील रेशीम शेतीने (Sericulture) चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. सुधारित तंत्रज्ञान, दर्जेदार रेशीम कोषनिर्मिती (Silk Cocoon Production) आणि राज्यातच रेशीम उत्पादकांसाठी बाजारपेठा तयार झाल्याने या क्षेत्राला वेगाने चालना मिळत आहे. कोषनिर्मितीच्या पुढे जात देवमूर्ती (ता. जि. जालना) येथील ‘दिशा सिल्क’ (Disha Silk) ने आता कच्चे धागे निर्मिती (Raw Tarn Production) सुरू करून या प्रक्रिया उद्योगाची वाट अजून विस्तारित केली आहे.

उद्योगाची पार्श्‍वभूमी

राज्यातील रेशीम कोष उत्पादकांसाठी महाराष्ट्रात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ आता उपलब्ध झाली आहे. पूर्वी कर्नाटकातील रामनगरमशिवाय पर्याय नव्हता. वाहतूक, अडचणी व अनेकदा आर्थिक भुर्दंडाचा सामना त्यामध्ये करावा लागे. अनेकदा रेशीम कोष खराबही व्हायचे. याच समस्या लक्षात घेऊन माजी वैद्यकीय मंत्री व विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला.

त्यातून ‘दिशा सिल्क’ची उभारणी, अर्थात स्वयंचलित यंत्र पद्धतीने (एआरएम- ऑटोमॅटिक रिलींग मशिन) रेशीम कोषांपासून कच्चा धागा निर्मितीचे युनिट एप्रिल २०१८ मध्ये सुरू झाले. आजमितीला राज्यात एकूण पाच अशी युनिट आहेत. पैकी दोन मराठवाड्यात तर तीन अन्य विभागांत आहेत. देवमूर्ती येथील हे युनिट राज्यातील सर्वांत पहिले व प्रक्रियेत सातत्य ठेवून असलेले आहे. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून सूरज टोपे जबाबदारी सांभाळत आहेत.

धागानिर्मिती प्रक्रिया (ठळक बाबी)

देवमूर्ती येथील युनिटमध्ये रेशीम कोष आल्यानंतर उष्ण वाफेद्वारे (एअर ड्रायर) सुकविले जातात. त्यामध्ये कोषांमधील आर्द्रता शोषून रेशीम अळी वळविण्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर कोषाला ‘पिलिंग’ केले जाते. यात कोषाचा वरचा कापसासारखा मऊ भाग वेगळा काढला जातो. त्यानंतर चांगले व दुय्यम दर्जाचे कोष अशी प्रतवारी (सॉर्टिंग) होते. चांगले कोष धागानिर्मितीसाठी पुढे जातात. उर्वरित कोष ‘सिल्क शीट’ तयार करण्यासाठी उयोगात आणले जातात.

त्यानंतर ‘व्हॅक्यूम परमिएशन’ प्रक्रिया होते. यात कोषांची छिद्रे उष्ण वाफेच्या साह्याने मोकळी केली जातात. यापुढची महत्त्वाची पायरी म्हणजे चारशे चरख्यांच्या माध्यमातून धागा उकलण्याचे (रिलींग) काम होते. त्यानंतर ‘सिल्क ह्युमिडिफिकेशन’ होते. यात धाग्यात आर्द्रता निर्माण केली जाते. त्यानंतर ‘रि- रिलिंग’ होते. यात ‘रिलिंग युनिट’मधील छोट्या चरख्यावरील धागा मोठ्या चरख्यावर घेतला जातो. एखाद- दुसरा धागा तुटला असल्यास तो जोडून पुन्हा योग्य पद्धतीने चरख्यावर चढविला जातो. त्यानंतर तयार झालेल्या कच्च्या धाग्यांचे लेसिंग, पाच किलो बंडलमध्ये पॅकिंग होते. खरेदीदारांच्या मागणीनुसार ३० किलो पॅकिंगमधून धागे रवाना केले जातात.

धागा निर्मितीचा ‘आउटपुट’

जालना येथील बाजारपेठेतून ‘ग्रेड’नुसार कोष खरेदी होते. थेट युनिटवर कोष घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रतवारीनुसार व बाजारपेठेतील दरांनुसार खरेदी होते. प्रति दिवसाच्या ‘शिफ्ट’मध्ये ३०० किलो कोषांवर प्रक्रिया होते. त्पासासून ४५ किलो धागानिर्मिती होते. स्वयंचलित नसलेल्या यंत्राच्या माध्यमातून (एमआरएम) हाच आउटपुट केवळ १० किलोपर्यंत असतो.

कोरोना काळात मदतीला

कोरोना संकटात कोणताही व्यापारी कोष खरेदीसाठी जालन्यातील बाजारपेठेत येऊ शकत नव्हता. अशावेळी दिशा सिल्कने सर्व नियम तंतोतंत पाळून रेशीम कोष थेट प्रक्रिया युनिटवर खरेदी करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

धाग्यांची विक्री

युनिटमध्ये निर्मित धाग्यांची विक्री कर्नाटक (बंगळूर), तमिळनाडू (सेलम) या भागात अधिक त्याचबरोबर वाराणसी व पश्‍चिम बंगाल येथे होते. प्रति किलो पाच हजार रुपये दर त्यास मिळतो.

रोजगार निर्मिती

या युनिटमुळे देवमूर्ती परिसरातील ३५ लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून, त्यात २७ महिलांचा समावेश आहे. चीनमधील तज्ज्ञांकडून स्थानिक व्यक्तींना युनिट चालवण्याचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातून प्रशिक्षित कुशल कामगारांकडून नव्या कामगारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यंत्रसामग्री, जागा व अन्य मिळून सुमारे तीन ते चार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात झाली आहे. ‘दिशा सिल्क’ला रेशीम संचालनालय, नागपूर यांच्यातर्फे सन्मान चिन्ह व सिल्क समग्र- २ मध्ये कार्यशाळा सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळाले आहे.

- सूरज टोपे ९६८९९१०४७७, ९२८४१०१६६५

(प्रकल्प व्यवस्थापक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ः अजित पवार

Maharashtra Sugar Industry: वारेमाप ‘एफआरपी’ची स्पर्धा,आर्थिक बेशिस्त थांबवा

Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट

Farm Relief Delay: कर्जमाफीच्या फाइलवर सही करताना मात्र लकवा मारतो: हर्षवर्धन सपकाळ

Agriculture Minister Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम करा: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT