Rural Development: परिसरातील रेशीम शेतकऱ्यांची वाढती गरज ओळखून पुणे जिल्ह्यातील निरवांगी (ता. इंदापूर) येथील अजिंक्य कांबळे या उच्चशिक्षित तरुणाने रेशीम साहित्याचे दुकान व चॉकी सेंटर सुरू केले. रेशीम शेतकऱ्यांना दहा दिवसाच्या निरोगी व सुदृढ रेशीम अळ्या उपलब्ध करण्यातून उत्पन्नांसोबतच शेतकऱ्यांची सेवाही घडत आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बारामती-नृसिंहपूर रस्त्याने वालचंदनगरपासून दहा कि.मी. अंतरावर निरवांगी गाव आहे. चार हजार लोकसंख्येच्या या गावाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षापासून शेतीसोबतच अनेक शेतकरी रेशीम शेतीसारख्या पूरक व्यवसायात उतरले आहेत. याच गावामध्ये अजिंक्य वसंत कांबळे यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अजिंक्य यांनी पाच वर्षापूर्वी एक एकरावर तुतीची लागवड करत रेशीम शेतीची सुरुवात केली.
एक एकरापासून सुरुवात
वयाच्या केवळ १९व्या वर्षी २०१९ -२० मध्ये अजिंक्यने प्रायोगिक तत्त्वावर एक एकर तुतीची लागवडीचे धाडस केले. पाच फुटी सरीमध्ये तुती रोपांची लागवड केली. मात्र पुरेशा भांडवलाअभावी सुरुवातीला अनेक समस्या आल्या. त्याच वेळी त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळत असल्याचे समजले.
त्यासाठी त्यांनी अर्ज केला. मंजुरी मिळताच या योजनेतून तुती रोपांची खरेदी, जमीन मशागत, लागवड आणि खते यांच्या खर्चासह मजुरी धरून साधारणपणे ५० हजार रुपये अनुदान मिळाले. पाच ते सहा महिन्यानंतर तुती रेशीम अळ्यांना खाण्यायोग्य पाला तयार झाल्यानंतर ५० अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली. त्यात ४७ किलो रेशीम कोष मिळाले आणि यशाचा मार्ग खुला झाला. हळूहळू त्यांनी तुती क्षेत्र तीन एकरपर्यंत वाढवले आहे.
तुतीचे योग्य व्यवस्थापन
एकदा तुती लागवड केली की पुढील दहा ते पंधरा वर्षे चालते. अन्य पिकांप्रमाणे मशागत, लागवडीचा खर्च होत नाही. मात्र उत्तम वाढीसाठी वर्षातून दोन वेळा शेणखत वापरले जाते. लागवडीच्या सुरुवातीला आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते.
त्यानंतर वातावरणानुसार दहा ते पंधरा दिवसांतून एकदा पाणी दिले तरी पुरते. रोग किडीचा प्रादुर्भावही अत्यल्प असल्याने तो खर्चही वाचतो. त्यामुळे कमी पाण्यात कमी खर्चात रेशीम शेती साधली जाते.
चॉकी सेंटरची सुरुवात
सलग तीन वर्षे रेशीम उद्योग यशस्वीरीत्या केल्यानंतर अजिंक्य यांना त्यातील अडचणी, खाचाखोचा समजल्या. रेशीम उद्योगातील सर्वात किचकट अवस्था म्हणजेच चॉकी अवस्था. हे लक्षात घेऊन जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत म्हैसूर (कर्नाटक) येथील रेशीम संशोधन केंद्रामध्ये तीन महिन्याचे चॉकी प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यातून चॉकी अवस्थेतील बाबी हाताळण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये सात हजार चॉकी रेशीम कीटक संगोपन क्षमतेचे सर्व सुविधांनी परिपूर्ण असणारे चॉकी सेंटर उभे केले. उत्तम व्यवस्थापनामुळे त्यांच्या चॉकीला शेतकऱ्यांमध्ये मागणी वाढत आहे.
चॉकी रूमचे व्यवस्थापन
चॉकी रूममध्ये आवश्यक साधनांचा वापर करत ऋतूप्रमाणे तापमान २३ ते २७ अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के या दरम्यान ठेवले जाते. विविध औषधांचा वापर आणि आवश्यक ती सर्व काळजी घेत असल्याने अळ्यांचे आरोग्य राखले जाते.
त्यांच्या आहारासाठी मशिनद्वारे तुतीच्या पाल्याचे समप्रमाणात कटिंग केले जाते. मऊ, लुसलुशीत कोवळ्या पाल्यामुळे सर्व अळ्या एकसाथ अवस्था पूर्ण करतात. त्यामुळे शेवटी एकत्रित कोष तयार होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते.
रेशीम केंद्राची सुरुवात
रेशीम शेतीसाठी आवश्यक साधनांच्या खरेदीसाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ५० ते ६० किमी दूर जावे लागे. सुमारे दोन लाख रुपये गुंतवून अजिंक्य रेशीम केंद्र सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व रेशीम साधने स्थानिक पातळीवर उपलब्ध केली आहेत. शेतकऱ्यांची छोट्या छोट्या वस्तूंसाठीची धावपळ वाचली असून, अजिंक्य यांच्या उत्पन्नालाही वार्षिक सुमारे वीस हजार रुपयांचा हातभार लागत आहे.
मार्गदर्शन व प्रशिक्षण
अजिंक्य हे कामात कष्टाळू आणि स्वभावात अभ्यासू आहेत. त्यांनी रेशीम शेतीत येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध पुस्तकांची, प्रशिक्षणाची मदत घेतली. ॲग्रोवनचे नियमित वाचक असून, अंकातील विविध विषयांची कात्रणे काढून त्यांचा संग्रह केला आहे. ९ सप्टेंबर २०२४ रोजी सातारा येथे प्रवीण रेशीम शिक्षक (डीएसटी) ची परीक्षा दिली. त्यामध्ये ए ग्रेड मिळवत उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील रुडसेट संस्थेमध्ये ‘प्रवीण शिक्षक’ म्हणून निवड झाली. तसेच भिगवण येथील एका बँकेद्वारे ३५ रेशीम शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर असे प्रशिक्षणाचे कार्यक्रम नियमितपणे होत आहेत. परिसरातील रेशीम शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना तुती व्यवस्थापनासोबतच रेशीम बॅचबाबत ते मोफत मार्गदर्शन करतात.
रेशीम शेतीमुळे मिळाला उत्पन्नाला मोठा आधार
जिल्ह्यामधील इंदापूर, बारामती, भिगवण व इतर तालुक्यामध्ये चॉकीची विक्री केली जाते. चॉकीचा विक्री दर (अंडीपुंज सोडून) १५०० रुपये प्रति ८ ट्रे (त्यात शंभर अंडीपुंज असतात.) इतका आहे. दरमहा सरासरी तीन ते चार हजार चॉकी विकल्या जातात. त्यातून ४५ ते ६० हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळते. वार्षिक उलाढाल ५ ते ६ लाख रुपये एवढी होते. या सर्व प्रवासात पुणे येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयातील डॉ. कविता देशपांडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे ते सांगतात. मार्गदर्शनासोबतच अडीअडचणीमध्ये मदतीला उभ्या राहणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच रेशीम शेतीत यशस्वी होऊ शकल्याचे अजिंक्य सांगतात. या रेशीम शेतीमुळे आमचे कुटुंब सुखाचे व समृद्धीचे दिवस पाहत असल्याचेही ते आवर्जून सांगतात.
दरवर्षी होतो यावर खर्च
मजुरी, खते, किटकनाशके, बियाणे १.५० लाख रुपये
कौटुंबिक खर्च १ लाख रुपये
शैक्षणिक खर्च १.५० लाख रुपये
आरोग्य विमा व खर्च ५० हजार रुपये
पुणे जिल्ह्यात रेशीम वाढीसाठी प्रोत्साहन
पुणे जिल्ह्यात तुतीची लागवड हजार एकरापुढे गेली आहे. शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चार लाख तीस हजार रुपये पर्यंत तर सिल्क समग्र दोन योजनेअंतर्गत रुपये तीन लक्ष पंचाहत्तर हजारपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चॉकी केंद्राची आवश्यकता होती. त्याची पूर्तता कांबळे यांचे चॉकी केंद्रामुळे होईल, अशी आशा आहे. जिल्ह्यात उत्पादित रेशीम कोषापासून धागा ते वस्त्रनिर्मितीपर्यंत उद्योग उभारण्याचे नियोजन केले जात आहे.
त्यासाठी सिल्क समग्र दोन योजनेअंतर्गत अनुदानावर ऑटोमॅटिक रेलिंग मशीन उभारणीकरिता खेड तालुक्यातील एका उद्योजकाची निवड झाली असून, मार्च २०२५ मध्ये संचालक विनय मून यांच्या सहकार्याने या अनुदानाचे वितरण केले गेले. याशिवाय बारामती येथे पहिल्यांदाच कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर असल्याचेही पुणे जिल्हा रेशीम कार्यालयातील रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी सांगितले.
- अजिंक्य कांबळे, ९३५६५४७७७३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.