Agri Tourism Agrowon
यशोगाथा

Agri Tourism Business : कृषी पर्यटन झाला भक्कम आधाराचा व्यवसाय

Rural Entrepreneurship : शेती संस्कृतीशी निगडित विविध सोईसुविधा, घरगुती जेवण, बोटिंग, तत्पर सेवा व आपलेपणा यातून अल्पावधीतच हे केंद्र ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. कडव यांना शेतीसाठी भक्कम पूरक व्यवसाय मिळाला आहे.

विकास जाधव 

Rural Farm Tourism Success Story : सातारा जिल्ह्यात महाबळेश्‍वर, पाचगणी, कास अशा प्रसिद्ध ठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. ग्रामीण जीवन, शेती संस्कृती शहरी लोकांना समजावी या दृष्टीने सुरू झालेल्या कृषी 3पर्यटन केंद्रांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील सायळी (ता. जावळी) येथील भरत उत्तमराव कडव यांनी आपल्या शेतात विकसित केलेले शंभूराज ॲग्रो टुरिझम केंद्र हे त्यापैकीच एक आहे. कडव यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे १७ एकर आहे. सन २०२१ मध्ये सुरू केलेले पर्यटन केंद्र सध्या १२ एकरांच्या दरम्यान विस्तारलेले आहे. भविष्यात त्यात अजून वाढ होणार आहे.

शेतीचा विकास सोडला नाही

सायळी गावाचा बहुतांश भाग कण्हेर धरणात गेल्याने येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले असून काही भाग शिल्लक राहिला आहे. याच गावातील कडव यांचे तीन भावांचे कुटुंब आहे. मोठे रामदास सातारा येथे राहतात. मधल्या क्रमांकाचे बंधू लक्ष्मण वेण्णानगर, तर सर्वांत धाकटे भरत गावी म्हणजे सायळी येथेच राहतात. भरत यांची वैयक्तिक दहा एकर शेती असून बहुतांश क्षेत्र धरणालगत आहे.

येथील शेतीत ऊस, आले, ज्वारी, भुईमूग आगी हंगामी पिके असतात. जमीन हलकी असल्याने गाळाची माती भरून ती पिकाऊ करण्यात आली. परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर- झाडी असल्याने वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा. त्यांच्याकडून नुकसान झाल्याने अनेकदा पिके सोडूनही द्यावी लागली. तरीही संकटांशी दोन हात करीत भरत यांनी शेतीचा विकास करणे सोडले नाही.

पर्यटन केंद्राची उभारणी

अतिरिक्त उत्पन्नासाठी तसेच वन्यप्राण्यांचा त्रास या कारणांमुळे शेतीला पूरक व्यवसायाचा भक्कम पर्याय असावा असे भरत यांना वाटायचे. निसर्गरम्य वातावरणाची साथही होती. ही संधी ओळखून धरणालगतच्या क्षेत्रात हुरडा पार्टी सुरू केली. हे ठिकाण सातारा शहरापासून सुमारे १५ किलोमीटवर एवढे जवळ असल्याने माहिती होईल तशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली.

हुरडा पार्टीसोबत पपई, शेंगा यांचा मेवाही पर्यटकांना मिळू लागला. आपल्याकडील निसर्ग संपदा व वृक्ष यांचा आधार घेत कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचे भरत यांनी ठरवले. या व्यवसायातील अनुभवी तज्ज्ञांना शेताच्या ठिकाणी आमंत्रित करून मार्गदर्शन घेतले.

केंद्राच्या उभारणीच्या दृष्टीने आंबा, जांभूळ, मलेशिया चिंच, चिकू, कढीपत्ता, सुपारी, नारळ, वड, उंबर अशी विविध झाडे लावण्यास सुरुवात केली. सन २०२१ च्या सुमारास ‘एमटीडीसी’ची मान्यता घेऊन ॲग्रो टुरिझम सुरू झाले देखील.

व्यवसायाचे विस्तारीकरण

आज विविध फळे व वृक्ष मिळून सुमारे १० हजारांच्या आसपास लागवड झाली आहे. संपूर्ण कुटुंबाचे कष्ट, केंद्राचे केलेले प्रमोशन, उत्तम सेवा, विविध सुविधा, घरगुती वातावरण या बाबींमुळे पर्यटक चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ लागले. यंदाचे तिसरे वर्ष असून या तीन वर्षांत सुमारे तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.

कडव यांनी केंद्र उभारणीसाठी कोणतेही कर्ज घेतले नसून येणाऱ्या उत्पन्नातून ते सुधारणा करीत आहेत. सध्या एका दिवसासाठी प्रति पर्यटक ६५० रुपये शुल्क घेतले जाते. यामध्ये चहा, नाश्‍ता, जेवण व केंद्रातील सर्व सोईसुविधा, बोटिंग यांचा आनंद दिला जातो. निवासासाठी प्रति व्यक्तीसाठी एका दिवसासाठी १४०० रुपये आकारले जातात.

केंद्रातील सुविधा

निसर्गरम्य परिसर, फळबागांसह शोभिवंत झाडांचा शांत परिसर. पक्ष्यांचा अधिवास.

शेततळे परिसरात मुलांसाठी पोहण्यासाठी संरक्षित टँक.

रेन डान्स, लहान-मोठे झोपाळे, बर्थडे पार्टी, शुभकार्यासाठी लॉन.

निवासी पर्यटकांसाठी दोन सुसज्ज रूम.

ग्राहकांच्या मागणीनुसार टेंट हाउसची सोय.

सनराईज पॉईंट, जंगल सफारी, शिवारफेरी.

घरगुती, मराठमोळे पद्धतीचे जेवण.

केंद्रावर शेती, रेशीमपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती पाहता येते.

केंद्रावरील फळे व भाजीपाल्याची थेट विक्री.

केंद्रालगत धरण असल्याने बोटिंगची सुविधा देण्यासाठी इंजिनबोट घेतली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाची अधिकृत परवानगीही घेतली आहे. पर्यटकांसाठी सुरक्षा जॅकेटचा वापर केला जातो.

पूरक शेतीवर भर

भरत शेतीला पूरक म्हणून केवळ कृषी पर्यटन व्यवसायावर थांबले नाहीत. तर अन्य पूरक उद्योगही त्यांनी सुरू केले आहेत. त्यांच्याकडे एक हजार देशी कोंबड्या आहेत. दहा गुंट्यांत तुती लागवड करून रेशीम शेती सुरू केली आहे. सध्या दोनशे अंडीपुजांची बॅच घेतली जाते. टारपोलिन पद्धतीचे मत्स्यपालन सुरू केले असून २५ टॅंकमधून तिलापिया, मरळ या माशांचे संगोपन केले जात आहे. जोडीला ससे, बदक यांचेही संगोपन होते. कण्हेर धरणात संबंधित विभागाची परवानगी घेऊन पिंजार पद्धतीने मासेपालन करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सारे कुटुंब राबते व्यवसायात

कुटुंबातील सर्व व्यक्ती शेती व पूरक व्यवसायांमध्ये राबत असल्यानेच श्रम हलके होऊन व्यवस्थापन सुकर झाले आहे. केंद्राच्या ठिकाणीच कुटुंब राहते. भरत यांना आई यशोदाबाई, पत्नी शोभा, सर्वांत मोठे बंधू रामदास, मधले बंधू लक्ष्मण, वहिनी पार्वती (रामदास यांच्या पत्नी), सुरेखा (लक्ष्मण यांच्या पत्नी), यांची मोठी मदत होतेच.

शिवाय नव्या पिढीतील पुतणे विनय, अजय, संग्राम, वेदिका तसेच भरत यांच्या मुली श्रेया, जान्हवी व मुलगा विराज हे देखील मदत करतात. बारावीत शिकणाऱ्या जान्हवीने स्वीमिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख मिळवली आहे. कुटुंबाला कृषी विभाग, पर्यवेक्षक जगदीश धुमाळ, बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे संग्राम पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते.

भरत कडव ७७७०००८१७६, ९९२१२३६४१६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT