पर्यटक थेट शेतात स्ट्रॅाबेरीचा आस्वाद घेताना
पर्यटक थेट शेतात स्ट्रॅाबेरीचा आस्वाद घेताना  
यशोगाथा

स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम

विकास जाधव

महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांना शक्य होऊ लागले आहे.  महाबळेश्वर तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी सर्वत्र प्रसिद्ध आहे. लागवडीसाठी परदेशातून मातृरोपे आणली जातात. जूनमध्ये ही रोपे येतात. या काळात महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने वाई तालुक्यातील अनेक गावात करार पद्धतीने जमीन घेऊन लागवड केली जाते. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या सहकार्याने दीडशेच्यावर पॉलिहासेसची उभारणी झाली आहे.  यंदाची स्थिती  यंदाच्या हंगामात मातृरोपे वेळेत आल्याने लागवडीचे नियोजनही वेळेत झाले. तालुक्यात सुमारे २३०० ते २५०० एकर तर जावली, वाई, सातारा, करेगाव तालुक्यांत सुमारे एक ते दीड हजार अशी एकूण साडेतीन हजार एकरांवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. यंदा हार्वेस्टची सुरवात समाधानकारक दराने झाली. थंडीत येणारे एकमेव फळ असल्याने त्यास मोठी मागणी असते. सद्यस्थितीत तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुमारे ९० ते ९५ टक्के आटोपला आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशांकडेच हंगाम शिल्लक असून तो जूनपर्यंत चालेल असा अंदाज आहे. दिवाळी, नाताळ या सणांवेळी महाबळेश्वर, पाचगणीस पर्यटकांची गर्दी असते. त्याचा फायदा स्ट्रॉबेरी उत्पादकांना होतो. स्ट्रॉबेरी बहार कालावधीत साधारणपणे पाच ते सहा टप्पे शेतकऱ्यांना मिळतात. यंदा डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तीन ते चार वेळा कडाक्याची थंडी पडल्याने एका टप्प्यात काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र दरातील स्थिरतेमुळे ते कमी प्रमाणात जाणवले.  फळाचे दर 

  • हंगामाच्या सुरवातीस आलेली स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम. त्यामुळे मागणी जास्त 
  • या काळात प्रति किलो ३०० ते कमाल ४०० रुपये, मध्यावर २५० ते १००- १५० रुपये व अंतिम टप्पात ३५ ते ४० रुपये दर 
  • हंगामाच्या अंतिम टप्प्यात बहुतांशी माल प्रक्रियेसाठी. यापासून जॅम, जेली चॅाकलेट आदींची निर्मिती 
  • जानेवारी, फेब्रुवारीत महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांतून प्रति दिन ६५ ते ७० टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी 
  • स्ट्रॉबेरी महोत्सव फायदेशीर  हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर कमी होतात. या काळात चांगले दर मिळवण्यासाठी अखिल भारतीय स्ट्रॉबेरी उत्पादक संघ व श्रीराम फळ प्रक्रिया संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्ट्रॅाबेरी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी होते. यात पर्यटकांना स्ट्रॉबेरी स्वतःच्या हाताने तोडून मोफत खाण्याची सवलत दिली जाते. यातून पर्यटकांना वेगळा आनंद मिळतो. घरी घेऊन जाण्यासाठी किलोला शंभर रुपये असा दर असतो. यातून नवा ग्राहक व नवी बाजारपेठही तयार होते.  प्रीकूलिंगचा फायदा  पूर्वी स्ट्रॉबेरी कोरूगेटेड बॅाक्स व पनेटमध्ये पॅक करून बाजारपेठेत पाठवली जाई. तिची टिकवणक्षमता दोन दिवस आहे. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोचवण्यात अडचणी यायच्या. यावर उपाय म्हणून भिलार येथील ग्रामपंचायच तसेच वाई येथील किसनराव भिलारे यांनी प्री कूलिंगची यंत्रणा उभी केली. कोरूगेटेड बॉक्समधील ही स्ट्रॉबेरी या यंत्रणेत शून्य ते चार अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड केली जाते. ही प्रक्रिया सुमारे चार तास चालते. या यंत्रणेत बॉक्स व फळांतील उष्ण हवा बाहेर काढली जाते. फळांचा तजेलदारपणा टिकून राहतो. फळ चार दिवसांपर्यंत टिकते. आयुष्यमान वाढल्यामुळे कोलकता, जयपूर, चेन्नई, दिल्ली अशा शहरांपर्यंत पोचेपर्यंत दर्जा टिकून राहतो.  हवाईमार्गे पाठवताना सुमारे २० किलो क्षमतेच्या थर्माकोल बॉक्स व जेल आइस पॅकचा वापर होतो. यात ०.४ अंश सेल्सिअस तापमान टिकून राहते. साधारणपणे ४०० ते ४५० टनांपर्यत प्रीकूलिंग केले आहे.  रेफर व्हॅनचा वापर  हैदराबाद, बंगळूर, गोवा, मुंबई, अहमदाबाद, सुरत, पुणे आदी शहरांत शीतवाहनाद्वारे (रेफर व्हॅन) दोन अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्ट्रॉबेरी पाठवली जाते. व्हॅनमधून यंदा सुमारे ६०० टन माल पाठवल्याचा अंदाज आहे. या दोन्ही यंत्रणेमुळे स्थानिक बाजारपेठेत आवक व्यवस्थित राहिल्याने दर स्थिर राहिले. दूरवरची बाजापेठ मिळवता आली. प्रति किलो प्रीकूलिंगसाठी पाच रुपये तर वाहतुकीसाठी २० रुपये खर्च होतो. हा खर्च वाढला तरी फळाचा टिकाऊपणा वाढून दरांमध्ये फायदा घेता आला. परदेशांतही काही प्रमाणात स्ट्रॉबेरी पाठवणे शक्य झाले.   

    यंदाच्या हंगामातील चित्र  स्ट्रॉबेरीचे दरवर्षी एकरी सात ते आठ टनांपर्यत उत्पादन मिळते. एकरी दोन लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. यंदा थंडीचा अपवाद वगळता चांगले वातावरण पिकाला मिळाले. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादनात एकरी एक- दोन टन वाढ झाली. प्रति किलोस सर्वाधिक ३०० रुपये, किमान दर ३५ रुपये तर सरासरी ६० ते ७० रुपये दर मिळाला. महाबळेश्वर तालुक्यातील उलाढाल बारा कोटी रुपयांच्या पुढे झाली. तीव्र दुष्काळाचा परिणामही दिसून येत आहे. पाणी कमी पडू लागल्याने हंगाम थांबवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. संरक्षित पाणी असणारेच मेअखेरपर्यंत हंगाम सुरू ठेवतील.  प्रतिक्रिया  शेतकरी व ग्राहक यांना थेट जोडण्यासाठी स्ट्रॉबेरी महोत्सव महत्त्वाचा ठरतो.  मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा चांगले दर मिळावे हा त्यामागील उद्देश असतो. यंदा प्रखर उन्हाळ्यामुळे थोडा कमी प्रतिसाद मिळाला.  -बाळासाहेब भिलारे  अध्यक्ष, अखिल भारतीय स्ट्रॉबेरी उत्पादक संघ  यंदा थंडीमुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. अपवाद वगळता एकूण हंगाम चांगला राहिला.  -गणपत पार्टे - ९४२३०३३८०९  अध्यक्ष श्रीराम फळप्रकिया सहकारी संस्था, भिलार.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

    Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

    Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

    SCROLL FOR NEXT