सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा झाला फायदा
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा झाला फायदा 
यशोगाथा

सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा झाला फायदा

Raj Chougule

आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते. मात्र पावसाचा लहरीपणा, रासायनिक खतांमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढून शेती परवडेनाशी झाली होती. अखेर त्यांनी सेंद्रिय शेती, वाणबदल व यांत्रिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची शेती फायद्यात आली. त्यांच्या नियोजनाबाबत त्यांच्याच शब्दांत... मी शेतीत वर्षभरामध्ये ऊस, भात, सोयाबीन, खपली गहू भाजीपाला आदी पिके घेतो. खरिप हंगामात भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिके घेतो. अलीकडे पाऊस वेळेवर पडत नाही, त्यामुळे खरिपाचे नियोजन चुकत आहे. तरीही विहिरीच्या उपलब्ध पाण्याचा वापर करून पिकांचे नियोजन करतो.

दीड एकरावर खरीप पिके आठ एकरांपैकी बहुतांश क्षेत्रात ऊस असतो. खरिपाची पिके साधारणतः दीड एकर क्षेत्रावर घेतली जातात. सध्या जिल्ह्यात वळीव पाऊस होत असला तरी आमच्याकडे मात्र पाऊस झाला नाही. सध्या शेत तयार केले आहे. जुनमध्ये भुईमूग आणि सोयाबीन घेण्याचा विचार आहे. जूनमध्ये ही लागवड केल्यानंतर आडसाली उसाची लागवड करणार आहे.

सेंद्रिय निविष्ठांना प्राधान्य इतके दिवस रासायनिक शेती करत होतो. गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहे. सेंद्रिय निविष्ठा म्हणून घनामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर करतो. घनामृत करताना देशी गाईचे १०० किलो शेण अधिक गूळ १ किलो अधिक बेसन १ किलो असे मिश्रण केले. उन्हात ८ दिवस वाळवून घेतले. आता पेरणीपूर्वी एकरी २०० किलो घनामृत शेतात टाकून कोळवून घेणार आहे. पाऊस पडल्यानंतर पेरणी करणार आहे.

ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी अलीकडे मी शेतीत यंत्राचा वापर सुरू केला आहे. यंदा ट्रॅक्टरचलित कुरीने भाताची पेरणी करणार आहे. भातावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर बंद केला आहे. कीड व रोगनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क घरीच तयार करून १ लिटर प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण करून त्याची फवारणी करतो. पीक काळात त्याच्या दोन फवारण्या केल्यास कीड-रोगांचे बऱ्याच अंशी नियंत्रण होते. आवश्‍यकता भासल्यास आणखी एखादी फवारणी करतो. भातवाढीसाठी पिकावर जिवामृताची मात्रा देतो. त्यासाठी २०० लिटर पाणी अधिक ५-१० किलो देशी गाईचे शेण अधिक ५ - १० लिटर देशी गाईचे मूत्र अधिक बेसन १ किलो अधिक वडाखालील माती १ किलो हे मिश्रण ३ दिवस ठेवून नंतर चौथ्या दिवशी पाण्याबरोबर पाटात सोडतो. आवश्‍यकतेनुसार त्याची फवारणीही करतो.

वाणबदलामुळे फायदा   पूर्वी मी जया या भातवाणाची पेरणी करायचाे. त्याचे उत्पादन जास्त मिळायचे, मात्र सुवास येत नसल्याने जास्त भाव (केवळ २५ ते ३० रुपये किलो) मिळत नसे. तसेच खायलाही तो चांगला लागत नव्हता. त्यामुळे दोन वर्षांपासून इंद्रायणी भाताची लागवड करत आहे. त्याचा सुगंध व सेंद्रिश शेतीमुळे त्याला प्रतिकिलो १०० रुपयांचा दर मिळतो. उत्पादनात हेक्टरी १ क्विंटलने घट आली (जयाचे ११ क्विंटल तर सेंद्रिय इंद्रायणीचे १० क्विंटल) तरी नगण्य खर्च व जास्त भावामुळे भात शेती नफ्याची झाली. उसाचे वाण ही २६५ वरुन ८००५ असे बदलले आहे. नवीन वाणाच्या उसाची पाने अधिक मोठी असल्यामुळे लवकर वाढून ती शेत झाकतात. परिणामी तणाची वाढ होत नाही, त्यामुळे तणनियंत्रणाच्या खर्चातही मोठी बचत झाली.  

काटेकोर नियोजन रासायनिक शेती करताना सगळ्या निविष्ठा तात्काळ उपलब्ध होत असत. पण सेंद्रिय शेती करताना पिकांना लागणारे घटक हे आधी तयार करून ठेवावे लागतात. त्यामुळे आपण किती पीक घेणार आणि त्याला किती निविष्ठा लागणार याचे नियोजन करावे लागते. मात्र ती पद्धत कमी कमी खर्चाची आणि अधिक नफा देते, असा माझा अनुभव आहे.

सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन मी सहा गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची विविध पिके घेतली आहेत. घरी ही हाच भाजीपाला वापरतो. त्यामुळे आरोग्याची चिंता नाही. मी गेल्या वर्षी सेंद्रिय गूळही ९० रुपये किलो दराने विकला आहे. येथून पुढे रसायनमुक्त शेती करून त्यातून उत्पादित होणारी उत्पादने विविध महोत्सवातून विकणार आहे.

संपर्क :९८२३५७१८१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT